नव्या प्रजातीच्या केसाळ गोगलगायीचा शोध ; ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:10 IST2025-10-16T09:09:48+5:302025-10-16T09:10:03+5:30
उत्तरेकडील पश्चिम घाटात ‘लॅगोकाईलस हायाओ मियाझाकी’ ही लॅगोकाईलस कुळाची आढळलेली पहिली नोंद आहे.

नव्या प्रजातीच्या केसाळ गोगलगायीचा शोध ; ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे मोठे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवीन प्रजातीच्या केसाळ गोगलगायीचा शोध लावण्यास ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निम-सदाहरित जंगलांमध्ये ही प्रजाती आढळली आहे. तिचे नामकरण स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. तर, लॅगोकाईलस हायाओ मियाझाकीचे कॉमन इंग्लिश नाव तिच्या अढळ क्षेत्रावरून तिलारी हेरी स्नेल असे ठेवण्यात आले आहे.
उत्तरेकडील पश्चिम घाटात ‘लॅगोकाईलस हायाओ मियाझाकी’ ही लॅगोकाईलस कुळाची आढळलेली पहिली नोंद आहे. त्यासाठी ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनकडून सातत्याने संशोधन करण्यात आले. याबाबतचा शोधनिबंध जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधनामध्ये ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक डॉ. अमृत भोसले, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि स्वप्नील पवार, राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक डॉ. दिनारझार्दे रहीम यांचा सहभाग आहे.
वैशिष्ट्ये काय?
पश्चिम घाटातील जंगलातील पानांच्या पालापाचोळ्यात आणि दगडांवर लहान गोगलगायींचा अधिवास आढळतो.
जंगलातील वणव्यांमुळे त्याला धोका निर्माण होऊन त्या नामशेष होण्याची शक्यता आहे.
लहान गोगलगायी या निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत. अन्नसाखळीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतात.