‘डेसिबल’चा उल्लेख नसणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला! आवाज फाउंडेशनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:50 IST2025-10-17T07:50:00+5:302025-10-17T07:50:18+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी चेंबूरमधील आरसीएफ मैदानात फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली.

‘डेसिबल’चा उल्लेख नसणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला! आवाज फाउंडेशनची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोणते फटाके किती मोठ्याने वाजतात, याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनांवर नसेल तर त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यासंदर्भातील कारवाई करावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी चेंबूरमधील आरसीएफ मैदानात फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली.
फटाक्यांच्या आवाजाच्या चाचणीनंतर मंडळाकडून अहवाल प्राप्त झाला नसला तरी फाउंडेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी करण्यात आलेल्या काही फटाक्यांच्या उत्पादनांवर फटाके किती आवाज करतात, याचा उल्लेख नाही. परिणामी अशा फटाक्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणावी.
फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांच्या म्हणण्यानुसार, सणांमध्ये प्रदूषण होऊ नये एवढेच आमचे म्हणणे आहे.
कारण दिवाळीत वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांचा आवाज जास्त असेल तर सर्वसामान्यांसह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होतो. माणूस ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. मात्र, त्यापुढे आवाज झाल्यास त्रास होतो. १२५ डेसिबल एवढा आवाज झाला तर कानाला दुखापत होऊ शकते.