आता शिक्षक शाळेत नाही, प्रत्येकाच्या टॅबमध्येच! ३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:01 AM2021-07-28T07:01:11+5:302021-07-28T07:01:50+5:30

समजा, जगातल्या प्रत्येक मुलाला स्वत:चा असा एक स्पेशल शिक्षक मिळाला तर? स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका यशस्वी प्रयोगातून या शक्यतेची वाट खुली झाली आहे, त्याचीच ही कहाणी!

The teacher is no longer in the school, just in everyone's tab! Will teach students in 35 ways | आता शिक्षक शाळेत नाही, प्रत्येकाच्या टॅबमध्येच! ३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार 

आता शिक्षक शाळेत नाही, प्रत्येकाच्या टॅबमध्येच! ३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार 

Next

कोरोनामुळे अख्ख्या जगात शिक्षणाचा बोऱ्या वाजला आहे. अनेक ठिकाणी शिक्षण बंद पडलं आहे. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडल्या आहेत. मुलं जे काही शिकली होती, ते सारं त्यांच्या विस्मरणात जात आहे. मागचं लक्षात नाही आणि पुढचं समजत नाही, अशी अनेक विद्यार्थ्यांची गत झाली आहे. या काळात अनेकांनी ऑनलाइन शिक्षणाचा आधार घेतला, पण शिकवलेलं विद्यार्थ्यांना कळतंय की नाही, हे समजायची कोणतीही सोय नाही. ग्रामीण भागातील मुलांना शिकवायला शिक्षक पूर्वीही नव्हते, आजही नाहीत. अशा परिस्थितीत मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं ही फारच अवघड गोष्ट झाली आहे. शाळा नाही, शिक्षक नाहीत, म्हणून काही विद्यार्थ्यांनी वेगवान अशा डिजिटल स्वयंशिक्षणाचा आधार घेतला, पण तिथेही तेच. मध्येच केव्हातरी अशी स्थिती येते, विद्यार्थी पुढेही सरकत नाही आणि मागेही जात नाही. एकाच जागी तो अडकल्यासारखा होतो. समोरासमोरच्या शिक्षणात, तेही वर्गात कमी मुलं असली तर जाणकार शिक्षक मुलांची ही अवस्था ओळखतो. विद्यार्थ्याला मागचा एखादा भाग समजला नसेल आणि त्यामुळे पुढचं समजायला त्याला अडचण येत असेल, तर असा शिक्षक त्याची अडचण ओळखतो. मागचा भाग त्याला पुन्हा समजावून सांगतो. त्यातलंही नेमकं काय त्याला कळलं नाही, ते समजावून सांगतो. अर्थात हीदेखील आदर्श गोष्ट झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला ‘मनातलं ओळखणारा’ असा शिक्षक मिळेलच असं नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्याचंच नुकसान होतं.

हीच अडचण ओळखून स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकताच एक ऑनलाइन प्रोगाम विकसित केला आहे. या प्रोग्रामचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ‘खासगी’ शिक्षक मिळू शकेल! ज्या भागात शिक्षक, शिक्षणाच्या सोयी नाहीत, अशा ठिकाणी एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हा शिक्षक पोहोचू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम अशा पद्धतीनं तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थी कुठे अडकला, एखादा भाग समजायला त्याला अडचण येत असेल, तर या शिक्षकाला लगेच ते कळतं. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या आधारे तयार केलेला हा शिक्षक विद्यार्थ्याला तो भाग पुन्हा समजावून सांगतो. त्याला व्यवस्थित कळल्यानंतरच पुढे जातो.
ऑनलाइन लर्निंग असो किंवा शाळेतलं प्रत्यक्ष शिक्षण, मुलं एखाद्या ठिकाणी अडकली, की त्यांना शिक्षकांची किंवा पालकांची गरज लागते. त्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. मुलांची हीच गरज या तंत्रज्ञानाद्वारे नेमकी ओळखली जाते.

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्सच्या सहायक प्राध्यापिका एमा ब्रन्स्किल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा एक विद्यार्थी टाँग मू यांचाही या प्रकल्पात मोठा हातभार आहे. विद्यापीठाच्या टीमनं ‘वॉर चाइल्ड हॉलंड’ या संस्थेच्या शिक्षणतज्ज्ञ आंद्रिया जेटेन यांच्या सहकार्यानं हा शैक्षणिक उपक्रम विकसित केला आहे. युगांडा, सुदान, चाड इत्यादी कायम संघर्षग्रस्त असलेल्या अविकसित भागासह बांगलादेशातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टॅबबरोबरच हे शैक्षणिक सॉफ्टवेअरही पुरवलं. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चाचणी अतिशय उत्साहवर्धक होती. काही व्हिडिओ आणि मिनी गेम्सच्या माध्यमातून ‘इंग्लिश रिडिंग स्किल्स’ त्यांनी मुलांपर्यंत पोहोचवली. शिक्षण आणि शिक्षकांपासून वंचित असलेल्या या मुलांना त्याचा फार फायदा झाला आणि त्यांच्या इंग्रजी बोलण्यात मोठा सुधार दिसून आला.

शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवणं या माफक उद्देशानं हा प्रोग्राम तयार करण्यात आलेला नाही. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेनं’ युक्त असलेला हा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक शिक्षण देईल. त्याच्या वेगानं पुढे जाईल. याचबरोबर त्याच्या सगळ्या अडचणी सोडवील. विद्यार्थ्यानं केलेली बारीकशी चूकही त्याच्या नजरेतून सुटणार नाही. प्रत्यक्ष शिक्षकच आपल्यासमोर बसून आपल्याला शिक्षण देत आहे, अशी या अ्रभ्यासक्रमाची रचना असल्यानं विद्यार्थीही झटपट पुढे जाईल. त्याच्या आकलनात वाढ होईल. मुख्य म्हणजे मानवी शिक्षक जितकं उत्तम रीतीनं समजावू शकणार नाही, त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं हा ‘कृत्रिम गुरू’ विद्यार्थ्यांना शिकवेल. ‘भविष्यातील शिक्षण’ म्हणून या पद्धतीकडे आता पाहिलं जात आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानं सगळ्यांनाच हतबल केलं असलं तरी त्यामुळेच नव्या तंत्रज्ञानाचा उगम झाला. लोक नवनवीन प्रयोग करून पाहू लागले. हे प्रयोग आता जगभर पसरतील आणि शिक्षण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य होईल, सगळ्यांपर्यंत पोहोचेल. गरिबी-श्रीमंतीचा भेदही ते मिटवतील. 

३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार! 
कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या शिक्षकानं शिकवलेलं समजणार नाही, अशी शक्यता फार थोडी आहे. कारण हा शिक्षक वेगवेगळ्या तब्बल ३५ पद्धतींनी शिकवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि त्याच्या मानसिकतेचा तो  अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे आपल्या शिकवण्यात बदल करतो. विद्यार्थ्याची प्रत्येक अडचण समजून घेतो आणि त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शनही करतो.

Web Title: The teacher is no longer in the school, just in everyone's tab! Will teach students in 35 ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.