एमबीबीएसची दुसरी फेरी; ७,६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:12 IST2025-10-06T07:12:06+5:302025-10-06T07:12:20+5:30
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा ८,३३८ जागा असून त्यासाठी सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

एमबीबीएसची दुसरी फेरी; ७,६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविल्या जात असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत केवळ ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आतापर्यंत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील ७,६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून ६३६ जागा रिक्त आहेत.
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा ८,३३८ जागा असून त्यासाठी सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीत ६,८४८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर दुसऱ्या फेरीत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना १,४११ जागांचे वाटप केले. या फेरीत कट ऑफमध्ये फारशी घट झाली नाही. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या त्यातील केवळ ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यात ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सरकारी कॉलेजांमध्ये ४,९६९ जागा आहेत. तर खासगी कॉलेजांमध्ये ३,३६९ जागा आहेत.
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान करता येईल.
तात्पुरती गुणवत्ता यादी ९ ऑक्टोबरला.
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती ९ ऑक्टोबरला जाहीर होईल.
कॉलेजांचे पसंती क्रमांक १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान नोंदविता येतील.
तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १५ ऑक्टोबरला जाहीर होईल.
विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल.