इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:55 IST2025-07-15T05:55:34+5:302025-07-15T05:55:45+5:30

प्रवेशाची चुरस वाढणार; २ लाख १४ हजार जणांनी दिली अभ्यासक्रमाला पसंती

Record student registration for engineering admissions this year | इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी अशी दोन लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती वाढल्याचे दिसून येत असून, प्रवेशासाठी यंदा चांगलीच चुरस राहणार आहे. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप फेरीसाठी नोंदणीला २८ जूनपासून सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यामध्ये गेल्या काही वर्षांतील यंदा विक्रमी अशी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी अशी नोंदणी आहे. यातून यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे असून, कॉलेजांतील रिक्त जागा भरल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर प्रवेशासाठी १,८०,१७० जागा उपलब्ध होत्या. या जागांवर १,४९,०७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यातून तब्बल ३१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या, तर २०२३-२४ मध्ये ४०,५४८ जागा रिक्त राहिल्या होत्या. 

दरम्यान, मागील काही वर्षांत इंजिनिअरिंगच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढले होते. त्यातून कॉलेजांना विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती होती. त्यातून विद्यार्थ्यांअभावी अनेक कॉलेजांवर काही अभ्यासक्रम चालविणेही अवघड होऊन बसले होते. यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी वाढल्याने प्रवेशात वाढीची कॉलेजांना आशा आहे. त्यामध्ये सर्वाधिक पसंती असलेल्या कॅम्प्युटर आणि त्यासंबंधीच्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा यंदाही अधिक राहणार असून, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे आहे.

गेल्यावर्षी ५०,५०१ जागा उपलब्ध
यंदा एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५०,६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर गेल्यावर्षी ५०,५०१ जागा उपलब्ध होत्या. 
त्यातील ४२,२०७ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी घटल्याने एमबीएच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

असे असेल वेळापत्रक
१५ जुलैपर्यंत कागदपत्रांची तपासणी.
१८ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
१९ जुलै ते २१ जुलैदरम्यान तात्पुरत्या गुणवत्ता यादीबाबत तक्रारी नोंदविण्याची मुदत
२४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

Web Title: Record student registration for engineering admissions this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.