सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:01 IST2025-07-09T08:00:34+5:302025-07-09T08:01:11+5:30
केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते.

सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर
नवी दिल्ली : इयत्ता सहावीच्या केवळ ५३ टक्के विद्यार्थ्यांना दहापर्यंतचे पाढे म्हणता येतात, तर तिसरीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांना ९९पर्यंतचे अंक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडता येतात, असे शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट अर्थात - ‘परख’ (पीएआरएकेएच) राष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘परख’ (पूर्वीचे राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण - एनएएस) अंतर्गत ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७८१ जिल्ह्यांमधील ७४,२२९ शाळांमधील तिसरी, सहावी व नववीच्या २१,१५,०२२ लाख विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये तिसरीतील केवळ ५८ टक्के विद्यार्थ्यांनाच दोन अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येते, हेही स्पष्ट झाले. यासाठी इयत्ता तिसरीतील १,१५,०२२ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते.
शिक्षण धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक
शिक्षणातील ही तफावत भरून काढण्यासाठी धोरण सुधारणा आणि अतिरिक्त शैक्षणिक साहाय्य देणे गरजेचे आहे, या निष्कर्षांच्या आधारे बहु-स्तरीय धोरणात्मक योजना आखण्यात येत आहे, असे शिक्षण सचिव संजय कुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ करण्यासाठी 'परख' संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचे काम दिले गेले आहे.
अहवालात काय?
तिसरीतील फक्त ५८ टक्के विद्यार्थ्यांना दोन-अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी करता येते.
सहावीत अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना पाढे किंवा मूलभूत अंकगणित नीट समजत नाही.
गणितात सर्वांत कमी गुण सहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविले - केवळ सरासरी ४६ टक्के.
केंद्र सरकारी शाळांमधील नववीचे विद्यार्थी सर्व विषयांत सरस ठरले. ६ वी च्या बाबतीत सरकारी अनुदानित शाळांमध्ये गणितात गुण कमी होते.