आता विद्यार्थी राहणार नाही ‘बॅकबेंचर’; केरळच्या शाळेत नवी बसण्याची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:21 IST2025-07-14T08:21:03+5:302025-07-14T08:21:18+5:30
केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही.

आता विद्यार्थी राहणार नाही ‘बॅकबेंचर’; केरळच्या शाळेत नवी बसण्याची व्यवस्था
कोल्लम : शाळा म्हटले की मजा, मस्ती आणि मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या बेंचवर बसण्याची धडपड आलीच. कोणत्या बेंचवर बसायचं हे आधीच ठरलेलं असते. हुशार मुलं विशेषत: शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात आणि बॅकबेंचर मुले म्हणजे मठ्ठ, ढ अशी विशेषणे लागतात. ज्या मुलांना मस्ती करायची असते, शिक्षणात फारसा रस नसतो ती मुले मागे बसतात असे म्हटले जाते. पण या विचारसरणीला छेद देणारी एक हटके कल्पना समोर आली आहे. केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही.
नवीन उपक्रमाचे मॉडेल : कोल्लम जिल्ह्यातील वालकोम येथील आरव्हीएचएसएस हे त्यांच्या वर्ग बसण्याच्या व्यवस्थेसह नवोपक्रमाचे एक मॉडेल म्हणून समोर आले आहे. वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान लक्ष देता यावे यासाठी बसण्याची व्यवस्था बदलण्यात आली असून, यात कोणीही ‘बॅकबेंचर’ नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले... : ‘स्थानार्थी श्रीकुट्टन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांनी सांगितले की, पंजाबमधील एका शाळेनेही ही कल्पना स्वीकारली आहे. मला आनंद आहे की याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.
चित्रपटापासून प्रेरणा
शाळांनी स्थानार्थी श्रीकुट्टन या चित्रपटापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये शाळेतील मुले बॅकबेंचर नसतील अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोहोचता येते, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे सहज पाहता येते आणि विद्यार्थीदेखील त्यांच्या शिक्षकांना सहजपणे पाहू शकतात.
केरळमधील आठ शाळांनी आधीच ही बसण्याची व्यवस्था स्वीकारली आहे आणि पंजाबमधील एका शाळेतही ती लागू केली आहे.