आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:03 IST2026-04-11T06:03:03+5:302026-04-11T06:03:46+5:30

कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशिक्षण देणार; प्रशिक्षणाबाबतचे यूट्यूब व्हिडीओ देखील जारी

Now, starting this year, no student will be deprived of admission to class 11! | आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!

आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यंदापासून अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. कारण, अकरावी ऑनलाइन प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे करायचे, नियोजन कसे करायचे, याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणाबाबतचे यूट्यूब व्हिडीओ देखील उपसंचालकांकडून जारी करण्यात येत आहेत. येत्या १७ आणि १८ एप्रिल या दिवशी मुंबई विभागासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. 

इयत्ता अकरावीसाठी राज्यात सर्वच जिल्ह्यांत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने प्रवेशापूर्वीची नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या ऑनलाइन प्रवेशातील अडचणी लक्षात घेऊन, मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांसाठी प्रवेश अर्ज करताना पाळावयाच्या मार्गदर्शक सूचनांवरील यूट्यूब व्हिडीओ तयार केला आहे. तो शनिवारी प्रसिद्ध होत आहे.  

त्याशिवाय शाळांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून १७ व १८ एप्रिल या दोन दिवशी मुंबई विभागासाठी विशेष प्रशिक्षण देखील आयोजित केले आहे.

नोंदणीत बदल हवा; लेखी कळवा

कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतःच्या नोंदणीतील बदल आवश्यक असल्यास तशी माहिती १५ एप्रिल २०२६ पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरूपात विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई विभाग जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन - सकाळी १०:३० ते सायंकाळी ६:००

दक्षिण, उत्तर, पश्चिम विभाग व पालघर

  • दिनांक : १७ एप्रिल
  • स्थळ : द बी.जे.पी.सी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चर्नी रोड (पूर्व)


ठाणे, रायगड

  • दिनांक : १८ एप्रिल
  • स्थळ : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, धर्मवीरनगर,  ज्ञानसाधना मार्ग, ठाणे (पूर्व)


मुंबई विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशासंदर्भात योग्य ते निर्देश दिले आहे. तसेच आता प्रवेश कसा करावा, याबाबत जागृती व्हिडीओदेखील जारी करीत आहोत.
-राजेश कंकाळ, विभागीय उपसंचालक, शिक्षण विभाग

Web Title : इस वर्ष कोई भी छात्र 11वीं में प्रवेश से वंचित नहीं रहेगा!

Web Summary : इस वर्ष 11वीं कक्षा में प्रवेश से कोई भी छात्र वंचित नहीं रहेगा। कॉलेजों को ऑनलाइन प्रवेश पर प्रशिक्षण मिलेगा। प्रशिक्षण वीडियो जारी किए जाएंगे। 17 और 18 अप्रैल को मुंबई मंडल के लिए विशेष प्रशिक्षण। पंजीकरण परिवर्तन 15 अप्रैल तक जमा करें।

Web Title : No student will be deprived of 11th admission this year!

Web Summary : This year, no student will be deprived of 11th grade admission. Colleges will receive training on online admissions. Training videos will be released. Special training for Mumbai division on April 17th and 18th. Registration changes should be submitted by April 15th.