MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 18:47 IST2021-09-22T18:43:59+5:302021-09-22T18:47:02+5:30
१५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे

MPSC Exam: एमपीएससीच्या १५ हजार पदांची घोषणा हवेतच?
पुणे : स्वप्निल लोणकरच्या (swapnil lonkar) आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar on mpsc exam) यांनी ६ जुलै २०२१ रोजी विधानसभेत १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप झाल्या नाहीत. त्यामुळे १५ हजार पदांच्या भरतीची घोषणा हवेतच विरणार का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेच्या सभागृहात १५ हजार ५११ पदांची घोषणा केली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील २५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक केली आहे. ३० जुलै २०२१ वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (mpsc) रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, अद्यापही कोणत्याही विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. मागील २ वर्ष झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात आली नाही.
'२५ लाख तरुण-तरूणींची फसवणूक'-
सुमारे २५ लाख बेरोजगार सध्या आयोगाच्या नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून १५५११ पदांची भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
- महेश घरबुडे, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती
राज्यात लाखो तरुण पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी सरकारचा मुख्य अजेंडा हा तरुणांना न्याय मिळवून देणे आहे. याच धोरणानुसार सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदांच्या बाबत सर्व विभागांना मागणीपत्र ३० सप्टेंबर आयोगाकडे सादर करण्याचे सूचित केले आहे. पण एकूणच या विभागातील प्रशासकीय दिरंगाई दिसत आहे. त्यामुळे अद्याप कुठल्या ही विभागाचे मागणी पत्र गेले नसल्याचे समोर येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांची अडचण तसेच पदभरती संदर्भात मागणी करणार आहे.
- कल्पेश यादव, युवासेना