HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:42 IST2021-06-03T15:39:21+5:302021-06-03T15:42:29+5:30
HSC Exam Cancel: राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे.

HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय
HSC Exam Cancel: राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता इयत्ता १० वीप्रमाणेच राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचंही मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं केलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करुन परीक्षा घेणं योग्य नाही. परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना परीक्षा घेऊन पाल्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा अंतिम निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत अखेर १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा निर्णय उच्च न्यायालयास कळविला जाणार आहे.
काय असेल फॉर्म्युला?
परीक्षा न घेता बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करेल. इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणे, हा एक पर्याय असला तरी गेल्यावर्षी अकरावीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.