मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:31 IST2025-12-05T17:28:20+5:302025-12-05T17:31:16+5:30
जय हिंद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ या वार्षिक मीडिया संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली.

मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जय हिंद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ या वार्षिक मीडिया संमेलनाला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. रेडिटच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली, ज्यानंतर सादर झालेल्या शास्त्रीय गायन, कथ्थक आणि भरतनाट्यम् नृत्यप्रस्तुतीमुळे सभागृहात भारावलेले वातावरण निर्माण झाले.
यंदाच्या ‘कॉन्स्टीलेशन’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम प्रथमच आंतरमहाविद्यालयीन पातळीवर खुला करण्यात आला. मुंबईतील विविध महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या संमेलनाला हजेरी लावली, ज्यामुळे प्रत्येक सत्राला अधिकच रंगत आली आणि विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद दिसून आला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद
दिवसाची सुरुवात लोकप्रिय क्रिडा समालोचक रौनक कपूर यांच्या सत्राने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली, ज्यामुळे हे संवादसत्र अतिशय रंगतदार झाले.
यानंतर, 'प्रणयदृश्य समन्वयक' परिनाझ आगा यांनी 'intimacy coordination' या नवीन आणि महत्त्वाच्या क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. या व्यवसायात काम करताना आलेल्या अनेक अनुभवांची माहिती त्यांनी यावेळी दिली. नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार रिताशा राठोड, निहारीका दत्त आणि मंत्र मुग्ध यांनी आपला कला क्षेत्रातील प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला. एखादी भूमिका साकारताना त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्या भूमिकेमागची विचारप्रक्रिया याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
संपादकीय आणि चित्रपट निर्मितीवर चर्चा
मान्यवर संपादक ऐनी निजामी आणि श्रिया जमींदार यांनी त्यांच्या संपादकीय कारकिर्दीतील चढ-उतार, ‘magazine culture’ आणि प्रसार माध्यमांच्या बदलणाऱ्या प्रवाहासंबंधात विद्यार्थ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात प्रथितयश लेखक आणि दिग्दर्शक अब्बास टायरवाला, अनुपर्णा रॉय, नुपूर अस्थाना आणि रोहित नायर यांनी चित्रपट निर्मिती आणि पटकथा लेखन याबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त माहिती दिली. या सत्राला विद्यार्थ्यांकडूनही अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमंत्रित मान्यवर आणि विद्यार्थी प्रेक्षक यांच्या उत्साही सहभागामुळे 'कॉन्स्टीलेशन २५-२६' चा पहिला दिवस प्रचंड यशस्वीरित्या पार पडला आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उत्सुकता वाढली आहे.