दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:06 IST2026-02-14T09:05:25+5:302026-02-14T09:06:05+5:30
दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे

दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार
दीपक होमकर
पुणे - सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना प्रत्यक्ष हातात देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्यास दिल्या जाणार आहेत, संगणकावर तपासून तेथेच गुण द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तपत्रिका स्कॅन केल्या जाणार असून त्या तपासणीसाठी डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षिकांना दिसणार आहेत. शुक्रवारी सीबीएसईच्या वतीने नवी दिल्लीतून सीबीएसई शाळांसाठी वेबीनार पार पडला. त्यावेळी सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली.
शिक्षकांना वैयक्तिक लॉग-इन मिळणार
भारद्वाज यांनी केलेल्या प्रझेंटेशननुसार शिक्षकांसाठी डिजिटल पोर्टल आणि सराव डिजिटल मूल्यमापनासाठी बोर्डाकडून शिक्षकांना वैयक्तिक
‘लॉगिन क्रेडेंशियल्स’ (आयटी, पासवर्ड) दिले जातील. ज्या शिक्षकांचा डेटा ओएसएस (ऑनलाइन एफिलेटेड स्कूल इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणालीत अपडेटेड आहे, त्याच शिक्षकांना हे काम करता येणार आहे.
एआय प्रणालीद्वारे पेपर तपासणार नाही
दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे. पेपर एआयद्वारे तपासले जाणार नसून केवळ संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. उत्तपत्रिका तपासणी मानवीच आहे. फक्त ते कागदाऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर उत्तरपत्रिका तपासून तिथेच गुण नोंदविणार आहेत.