शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:30 IST2025-09-05T05:29:46+5:302025-09-05T05:30:42+5:30

महाविद्यालयांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाचे हिंदू कॉलेज आणि मिरांडा हाऊसने पहिले व दुसरे स्थान कायम राखले.

IIT Madras tops in quality of education...;National Institutional Ranking Framework Ranking of educational institutions in the country announced | शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

 नवी दिल्ली : एनआयआरएफने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) देशातील शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली असून आयआयटी मद्रासने सलग सातव्या वर्षी यात अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयएससी बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार, आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्लीने आपले स्थान यंदाही टिकवले आहे. विद्यापीठांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसऱ्या स्थानी आहे. मणिपाल विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानी राहिलेले जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ यंदा चौथ्या स्थानावर आहे. महाविद्यालयांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाचे हिंदू कॉलेज आणि मिरांडा हाऊसने पहिले व दुसरे स्थान कायम राखले. मुक्त विद्यापीठांमध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (इग्नू) पहिल्या स्थानी आहे. 

इतर श्रेणींतील अव्वल संस्था
व्यवस्थापन : आयआयएम
अहमदाबाद, गुजरात
फार्मसी : जामिया हमदर्द, दिल्ली
लॉ स्कूल्स : नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठ, कर्नाटक
दंतवैद्यकीय : एम्स, दिल्ली
वैद्यकीय : एम्स, दिल्ली
कौशल्य : सिम्बॉयसिस, पुणे
अभियांत्रिकी : आयआयटी मद्रास, तामिळनाडू
संशोधन संस्था : आयआयएस, कर्नाटक
महाविद्यालये : हिंदू कॉलेज, दिल्ली
विद्यापीठे : आयआयएस, कर्नाटक

पहिल्या दहामध्ये ९ आयआयटी
अभियांत्रिकीत पहिल्या दहा संस्थांत ९ आयआयटींचा समावेश आहे. या श्रेणीत आयआयटी मद्रास अव्वल असून दिल्ली व बॉम्बेने दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या दहांत आयआयटी व्यतिरिक्त नवव्या स्थानावर एनआयटी तिरुचिरापल्लीने स्थान मिळवले. 

एकूण १७ श्रेणी : एनआयआरएफने २०२५ साठी एकूण १७ श्रेणीत ही क्रमवारी जाहीर केली. या सर्व श्रेणीत आयआयटी मद्रास अव्वल ठरले. 

मुंबई विद्यापीठ देशात ५४व्या स्थानी 
नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने ६१व्या स्थानावरून ५४व्या स्थानी झेप घेतली आहे. 

हे असतात निकष
शिक्षणाचा दर्जा, संशोधन, नवोन्मेष, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांच्या कुटुंबीयांना केले जाणारे सहकार्य आणि संबंधित संस्थांचे निर्णय अशा निकषाआधारे ही क्रमवारी जाहीर केली जाते. 

 

Web Title: IIT Madras tops in quality of education...;National Institutional Ranking Framework Ranking of educational institutions in the country announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.