यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, दहावीच्या परीक्षेचेही तारीख ठरली!

By सीमा महांगडे | Updated: August 28, 2023 14:41 IST2023-08-28T14:41:04+5:302023-08-28T14:41:39+5:30

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक

HSC exams will start from 21st February and SSC exams will start from 1st March | यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, दहावीच्या परीक्षेचेही तारीख ठरली!

यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, दहावीच्या परीक्षेचेही तारीख ठरली!

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीचीपरीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी- बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. 

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे.

Web Title: HSC exams will start from 21st February and SSC exams will start from 1st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.