परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:13 IST2025-08-22T08:12:41+5:302025-08-22T08:13:04+5:30
इटली, जपान, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंडसारख्या बड्या देशांतून आले विद्यार्थी

परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परदेशातील नामांकित विद्यापीठांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा असतो. मात्र, आता परदेशातील विद्यार्थीही भारतीय विद्यापीठांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. मुंबई विद्यापीठात यंदा ६१ देशांतील २५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामध्ये इटली, जपान, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, कतार, कॅनडा, युएई, तैवान, युगांडा आदी देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासह मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांत बी.ए., बी.कॉम., बीएससी, बीए एमएमसी, आदी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून ९५ जणांचे प्रवेश झाले आहेत. आयसीसीआरच्या योजनाअंतर्गत पूर्णपणे हे विद्यार्थी पूर्णपणे अनुदानित शिष्यवृत्तीवर आले आहेत, तर स्वखर्चाने १६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ५०० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यातील ४०० हून अधिक अभ्यासक्रम जागतिक स्तरावर सुसंगत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिटची मान्यता आहे. त्या जोडीला विद्यापीठाने नामांकित जागतिक विद्यापीठांसह संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदा, प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि सहयोगी संशोधनासारख्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात यश मिळाले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित कसे केले?
- 'एकल खिडकी प्रणाली'द्वारे प्रवेश, व्हिसासाठी साहाय्य
- मार्गदर्शनपर कार्यक्रम, अभ्यास दौरे आणि अतिथी व्याख्याने
- जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी 'मुंबई विद्यापीठात शिका' या विषयावर १३ जनजागृती कार्यक्रम
- सक्रिय 'आंतरराष्ट्रीय संबंध कक्षा'ची स्थापना
- अत्याधुनिक ग्रंथालये, संशोधन प्रयोगशाळा
- परवडणारे शिकवणी शुल्क
- सुरक्षित कॅम्पससह वसतिगृहात उत्कृष्ट निवास व्यवस्था
- 'स्टडी इन इंडिया', 'जी-२० एज्युकेशन ट्रॅक' आणि 'आयसीसीआर' यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांमध्ये सहभाग
वैश्विक ज्ञानार्जनाच्या कक्षा रुंदावल्या
मुंबई विद्यापीठाने बहुविद्याशाखीय, लवचिकता, कार्यातर्गत प्रशिक्षण, सहपदवी, दुहेरी पदवी, संशोधन, कौशल्यवृद्धी, भारतीय ज्ञान प्रणाली, क्षमता संवर्धन आणि वैकल्पिक विषय असे विद्यार्थी केंद्रित मोठे बदल करून विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत वैश्विक ज्ञानार्जनाच्या कक्षा रुंदावल्या असल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठास पसंती मिळणे समाधानकारक आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रवेश घेतलेले परदेशी विद्यार्थी
वर्ष - विद्यार्थी - देश
- २०२५-२६ - २५८ - ६१
- २०२४-२५ - २४६ - ५५
- २०२३-२४ - १६७ - ३८
- २०२२-२३ - १२० -३०
- २०२१-२२ - ११३ - २९