फॉर्म १० भरा; दहावी, बारावीची परीक्षा द्या! शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:08 IST2025-11-02T14:01:39+5:302025-11-02T14:08:04+5:30
अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा

फॉर्म १० भरा; दहावी, बारावीची परीक्षा द्या! शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली सुविधा
लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: इयत्ता दहावी आणि बारावी करू इच्छिणाऱ्यांसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १० भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाइन भरू शकतात. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता शाळा साेडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.
अतिविलंब शुल्कासह अर्ज
अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची निर्धारित मुदत दि. १ नाेव्हेंबर ते दि. ३१ डिसेंबर ही आहे. यात प्रतिविद्यार्थी प्रतिदिन २० रुपये याप्रमाणे अतिविलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
विद्यार्थ्यांना आवाहन
पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधितशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून परत घ्यावी.