इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:48 IST2025-07-09T05:48:37+5:302025-07-09T05:48:52+5:30
पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी विद्यार्थ्यांना पुढील तीन दिवस अर्ज भरता येणार आहेत.
सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली आहे. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी आहे. त्यामुळे या नोंदणीला सीईटी सेलने मुदतवाढ दिली . यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली एमएचटी सीईटी परीक्षा ४,२२,६६३ विद्यार्थ्यांनी दिली आहे. सद्यस्थितीत बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांसाठी २ लाख २७ विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे नोंदणी केली आहे. यातील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून नोंदणी अंतिम केली आहे. पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
एमबीएसाठीही आणखी तीन दिवसांची मुदत
सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सद्यस्थितीत या अभ्यासक्रमासाठी ५९,५५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ३३,३३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी अंतिम केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी १,९२,३९८ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १,९२,३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रवेशासाठी १,८०,१७० जागा उपलब्ध होत्या. या जागांवर १,४९,०७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दरम्यान यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेचे अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी आहे. त्यामुळे या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.