एलएलबी प्रवेशासाठी झुंबड, विक्रमी ५१,३३४ अर्ज; यंदा कट ऑफ अधिक राहण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:30 IST2025-07-23T10:30:26+5:302025-07-23T10:30:48+5:30

एलएलबीच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्हे आहेत.

Crowd for LLB admissions, record 51,334 applications; Signs that the cut-off will be higher this year | एलएलबी प्रवेशासाठी झुंबड, विक्रमी ५१,३३४ अर्ज; यंदा कट ऑफ अधिक राहण्याची चिन्हे

एलएलबी प्रवेशासाठी झुंबड, विक्रमी ५१,३३४ अर्ज; यंदा कट ऑफ अधिक राहण्याची चिन्हे

मुंबई : तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी ५१,३३४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळेल, असे चित्र आहे. एलएलबीच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवाशासाठी मोठी चुरस असणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सीईटी सेलने एलएलबीच्या कॅप फेरीसाठी अर्ज भरण्यास ३० जूनला सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी संपली. यंदा एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी ५७,८९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१,३३४ विद्यार्थ्यांनी सर्व माहिती भरून अर्ज अंतिम केला आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

कायद्याच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा
गेल्या काही वर्षांत एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरी अथवा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एलएलबीचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे. त्यातून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवेशासाठी चुरसही वाढली आहे.

प्रवेशासाठी यंदा चुरस
गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१,०७१ जागा उपलब्ध होत्या. त्यावेळी २०,३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यातून बहुसंख्य कॉलेजांतील जागा भरल्या गेल्या होत्या. यंदाही एलएलबीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रवेशासाठी चुरस असण्याची शक्यता आहे.

Web Title: Crowd for LLB admissions, record 51,334 applications; Signs that the cut-off will be higher this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.