Careers in Law | ‘लॉ’ प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:16 IST2022-04-01T17:12:28+5:302022-04-01T17:16:56+5:30
प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याचा मार्गदर्शनपर लेख

Careers in Law | ‘लॉ’ प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी?
वाढती लोकसंख्या, विकास, शिक्षण, शहरीकरण आणि नागरिकांमधील जागरूकता यामुळेही कायद्याचे शिक्षण महत्त्वाचे झाले आहे. विधी क्षेत्र एक उत्तम करिअरची संधी म्हणून पाहिले जात असल्याने कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे, सर्वच विधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे, जी एक चांगली बाब आहे.
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाची विधी प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) देणे अनिवार्य आहे. प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी विधी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची यासाठी प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :
- विधी प्रवेश पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम इंग्रजी व्याकरणाचे धडे घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तार्किक तर्क काढता येणे आवश्यक आहे. वकिली करणे जशी एक कला आहे. तसेच तर्क काढणे/ कारणे दाखवणे हे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे.
- कायदेशीर योग्यता, कौशल्य व कायद्याच्या भाषेचे, शब्दांचे विश्लेषण करण्याची कला पारंगत करणे हेही तेवढेच आवश्यक आहे.
- कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहणे गरजेचे असतेच, त्यांना वर्तमानात घडणाऱ्या कायद्याच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी ज्या आजूबाजूला घडत असतात, केव्हा महत्त्वाचे निकाली लागलेले खटले (उदा : कसाब), केसेस याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे.
- सामाजिक विज्ञान, भारतीय संविधानाचे स्वरूप/माहिती, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे कायद्यातील कलम, या बद्दलची माहिती असली पाहिजे.
- सामान्य ज्ञान, भारताचा इतिहास, भूगोल, आंतरराष्ट्रीय घडामोडी इत्यादी माहिती तसेच सर्व क्षेत्रातील (अर्थ, कला, उत्पादन, सेवा, वाणिज्य, बांधकाम इ.) माहिती असणे फायदेशीर ठरते.
विधी प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी ही वरील मुद्यांच्या अनुषंगाने करायला हवी.
चांगला अभ्यास केला पाहिजे, मेहनत घेतली तरच परीक्षा सोपी जाईल आणि चांगले गुण मिळतील व हव्या त्या विधी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, हे लक्षात ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे.
- डॉ. उज्ज्वला बेंडाळे, अधिष्ठाता व प्रभारी प्राचार्य.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेज, पुणे