ऑनलाइन परीक्षेत अमरावती विद्यापीठ नापास; विद्यार्थ्यांचे लाॅगीनच झाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 15:42 IST2020-10-20T15:37:38+5:302020-10-20T15:42:41+5:30
Amravati University, Online Exam Buldhana पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहीले.

ऑनलाइन परीक्षेत अमरावती विद्यापीठ नापास; विद्यार्थ्यांचे लाॅगीनच झाले नाही
- संदीप वानखडे
बुलडाणा : दाेन वेळा परीक्षा रद्द करणार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात नापास झाले आहे. पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी पेपर देण्यापासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. अॅपवर पेपर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय गाठून पेपर द्यावा लागला.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने अंतिम वर्ष,सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियाेजन विद्यापीठाने केले हाेते. सुरवातील काही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने तर त्यानंतर तांत्रिक कारणामुळे पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली हाेती. त्यानंतर २० ऑक्टाेबरपासून विद्यापीठ्याच्या परीक्षांना प्रत्यक्ष सुरूवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लाॅगिनच झाले नाही. त्यामुळे सकाळी ८ वाजतापासून लाॅगीन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. तसेच दुपारी १ वाजता असलेल्या पेपर असलेल्या विद्यार्थ्यांनाही तीच समस्या आली. त्यामुळे, पहिल्याच पेपरमध्ये विद्यापीठ नापास झाल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थी पेपरपासून वंचित राहीले. तसेच विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही झाला. हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेल्पलाइन झाली हेल्पलेस
ऑनलाइन परीक्षांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी विद्यापीठाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच त्यांचे माेबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. प्रत्यक्षात लाॅगीन न झाल्याने विद्यार्थ्यांंनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.