शब्द पाठी अवतरे
By Admin | Updated: February 25, 2015 23:12 IST2015-02-25T23:12:45+5:302015-02-25T23:12:45+5:30
उद्या मराठी राजभाषा दिवस आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त तो साजरा करण्यात येतो. हा मुहूर्त साधूनच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न सुरू होते

शब्द पाठी अवतरे
प्रल्हाद जाधव -
उद्या मराठी राजभाषा दिवस आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त तो साजरा करण्यात येतो. हा मुहूर्त साधूनच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न सुरू होते. एखाद्या गोष्टीची शासन दरबारी दखल घेतली जाणे ही महत्त्वाची गोष्ट असते. मराठी अभिजात ठरल्याने तिला देशपातळीवर प्रतिष्ठा प्राप्त होणार, तिच्या विकासासाठी निधी मिळणार आणि भाबड्या रसिकांचा अहंभावही काही प्रमाणात कुरवाळला जाणार हे स्पष्ट आहे. दोन ते अडीच हजार वर्षांची परंपरा असणाऱ्या मराठी भाषेला सत्तरीही न गाठलेल्या शासनाकडून प्रशस्तिपत्र मिळणार हे वदतो-व्याघाताचे उदाहरण आहे. सोन्यापेक्षा सोनाराचेच महत्त्व किती वाढले आहे ते यावरून स्पष्ट होते.
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर पुढे काय, हा खरा प्रश्न आहे. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि फाटक्या वस्त्रांनिशी मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे, असे कुसुमाग्रजानी म्हटले होते. आता जर तिची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आपण पुढे झालो नाही तर त्याच वस्त्रांनिशी तिच्यावर दारोदार भटकण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
माणूस बोलायला लागला त्याला दीड लाख वर्षे झाली. सुमारे साडेतीन हजार भाषा आणि वीस हजार बोलींच्या माध्यमातून सहा अब्ज लोक जगभर सतत बोलत असतात. भाषेचा शोध आणि तिचा विकास ही माणसाच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी अशी गोष्ट आहे. म्हणूनच जननी आणि जन्मभूमीप्रमाणेच मातृभाषेलाही त्याच्या जीवनात अनन्यसाधारण स्वरूपाचे महत्त्व आहे.
आजूबाजूच्या भाषा आणि बोलींमधून जीवनरस घेत घेतच एखादी भाषा समृद्ध होत असल्याने सर्वांनीच आपले भाषेचे धोरण लवचिक ठेवण्यात शहाणपण असते. नवे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी जोडून घेण्याच्या दृष्टीने समृद्ध आणि विपुल अशा कोशवाङ्मयाची निर्मिती करण्याची गरज असते.
भाषा कशी शिकवली जाते, ती किती लोक बोलतात, कशी बोलतात यापेक्षा ती कोणते विचार देते
यावर तिचे मोठेपण अवलंबून असते, म्हणूनच ज्ञानेश्वर-तुकाराम आजही जगाला वंद्य आहेत हे दिसून येते. भाषा हे केवळ व्यवहाराचे माध्यम नसते तर त्या पलीकडे जाऊन जीवनाच्या उद्देशाचा शोध घेण्याचा रस्ताही ती दाखवत असते. ज्ञानेश्वर ही भावना नेमक्या शब्दांत वर्णन करताना म्हणतात -
पुढां स्नेह पाझरे
माघा चालती अक्षरे
शब्द पाठी अवतरे
कृपा आधी...