Instagram: मुलांची ‘मन:स्थिती’ इन्स्टाग्राम ठरवणार का? ३३ टक्के मुलींमध्ये नैराश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 06:58 AM2021-10-09T06:58:16+5:302021-10-09T06:58:34+5:30

गेल्या तीन वर्षांपासून इन्स्टाग्रामवरील फोटो शेअरिंगमुळे तरुण मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय हे फेसबुकला माहिती आहे; आपल्याला?

Will Instagram determine children's 'state of mind'? Depression in 33% of girls | Instagram: मुलांची ‘मन:स्थिती’ इन्स्टाग्राम ठरवणार का? ३३ टक्के मुलींमध्ये नैराश्य

Instagram: मुलांची ‘मन:स्थिती’ इन्स्टाग्राम ठरवणार का? ३३ टक्के मुलींमध्ये नैराश्य

Next

सानिया भालेराव, जैवतंत्रज्ञान विद्याशाखेच्या अभ्यासक

इन्स्टाग्राम या पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीमध्ये, विशेषतः टीनएज मुलींच्या मनात “निगेटिव्ह बॉडी इमेज” निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं आहे, असं नुकतंच एका अहवालामधून दिसून आलं. वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनुसार फेसबुककडे गेल्या तीन वर्षांपासून इन्स्टाग्रामवरील फोटो शेअरिंगमुळे तरुण पिढीचं मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य कसं बिघडतं आहे या, विषयावरील डेटा आणि काही अहवाल आहेत. यामधील एका अहवालानुसार जेव्हा टीनएज मुलींना स्वतःच्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्स येतो किंवा स्वतःच्या शरीराबद्दल नकारात्मक विचार (निगेटिव्ह बॉडी इमेज) निर्माण होतात, तेव्हा ३३ टक्के मुलींना इन्स्टाग्राममुळे अधिकच नैराश्य येतं. वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनंतरच फेसबुकचा हा इंटर्नल रिसर्च रिपोर्ट चर्चेत आला आहे आणि आता प्रश्न असा आहे की, जर फेसबुक टीमला हे सर्व माहिती होतं, तर मग यासाठी त्यांनी ठोस पावलं का नाही उचलली, त्यांची ही सामाजिक जबाबदारी नाही का? 

एका सोशल नेटवर्किंग ॲपमुळे टीनएज मुलींच्या मनात निगेटिव्ह बॉडी इमेज निर्माण होऊ शकते का?,  इन्स्टाग्राम वापरणारे  बहुतांश यूजर्स म्हणजे तरुण पिढी. मी काय खाते आहे पासून मी कशी दिसते आहे याचे फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट करणे आणि इतर लोक काय करत आहेत हे बघत बसणे ही या पिढीची मनोरंजनाची व्याख्या. जगभरात कित्येक विद्यापीठांमध्ये, सोशल बिहेव्हिअरल सायन्सेसच्या अंतर्गत सोशल मीडिया आणि त्या अनुषंगाने बॉडी इमेजबद्दल होणारा नकारात्मक दृष्टिकोन यावर अभ्यास आणि प्रयोग चालू आहेत. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांचं असं मत आहे की, टीनएज मुली सोशल नेटवर्किंग ॲप्समुळे आयडियल बॉडी इमेजच्या चौकटीत अडकतात. सोशल मीडियावर  स्वतःचे फोटो पोस्ट केले जातात तेव्हा कळत नकळत आपण कसे दिसतो आहोत याचा निष्कर्ष त्या फोटोवर येणाऱ्या लाईक्स आणि प्रतिक्रियांवरून काढला जातो. इतरांना आपल्या दिसण्याबद्दल काय वाटतं यावरून या मुली मग, नकळतपणे स्वतःला जोखायला सुरुवात करतात. म्हणून इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरील छायाचित्रांमुळे विशेष करून टीनएज मुलींच्या मनात निर्माण होणारा गंड, आपण कसे दिसतो आहोत याबाबत मनात येणाऱ्या शंका आणि स्वतःच्या शरीरासंदर्भात नकारात्मक शारीरिक प्रतिमा निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं आहे.

नुसते इन्स्टाग्रामवर फोटो टाकून किंवा दुसऱ्यांचे फोटो बघून इतका विपरीत परिणाम कसा होतो?, म्हणजे असं वाटण्याला काही वैज्ञानिक आधार आहे का?, याबाबत काही विद्यापीठांच्या रिसर्चवरून असं दिसतं की, सोशल मीडियावरील स्वतःच्या फोटोची तुलना या मुली त्यांच्या मैत्रिणींच्या किंवा ओळखीच्या स्त्रियांच्या आणि सेलिब्रिटीजच्या फोटोशी करतात. यातून मग स्वतःच्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात. अमेरिकेमधील ‘रेनफ्रू सेंटर फाउंडेशन’मध्ये केल्या गेलेल्या एका संशोधनात असं दिसून आलं की, जवळपास ७० टक्के टीनएज मुली स्वतःचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी तो एडिट करून त्यात मनासारखे बदल करून मग, पोस्ट करतात. खूपदा आपल्या मित्र- मैत्रिणींचे छायाचित्र पाहून, किंवा सेलिब्रिटीजचे फोटोज पाहून “ मी अशी का नाही दिसत?”, किंवा “माझ्यामध्ये का नाहीये अमुक एक गोष्ट?”, असं या मुलींना वाटायला लागतं. एयरब्रशसारखे फोटो एडिटिंग ॲप वापरणं, ब्युटिफिकेशनचे फिल्टर्स वापरून फोटो एडिट करणं या विळख्यात त्या अडकत जातात. मनाच्या कोपऱ्यात त्यांना ठाऊक असतंच की, मी जे काही करते आहे ते, खोटं आहे, मी अशी दिसत नाही आणि म्हणून मग निगेटिव्ह बॉडीइमेजचं प्रमाण या मुलींच्या मनात अधिकच वाढत जातं.

इन्स्टाग्राममुळे तीन मधील एका टीनएज मुलीला स्वतःच्या दिसण्याबाबत गंड निर्माण होतो, डिप्रेशन येतं. १३ टक्के ब्रिटिश आणि सहा टक्के अमेरिकन युजर्सच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. इतका खोलवर परिणाम या सोशल नेटवर्किंग ॲप्समुळे या मुला - मुलींवर होतो आहे. इन्स्टाग्रामचं पितळ उघडं पाडण्यात मोठा वाटा आहे तो, फ्रांसेस हॉगन यांचा. त्यांनी काही वर्ष फेसबुकमध्ये  काम केलं होतं आणि फेसबुकमधून बाहेर पडताना त्यांनी काही महत्त्वाचे अहवाल सोबत आणले. त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे काम करता असतांना संशोधना अंतर्गत सापडलेल्या काही गोष्टी त्यांनी वारंवार फेसबुकच्या मॅनेजमेंट टीमकडे नोंदवल्या होत्या पण, त्याची अजिबात दखल घेण्यात आली नाही. त्या म्हणतात, लोकांसाठी काय उपयुक्त आहे याचा विचार न करता फेसबुक केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार करतं! या सगळ्या वादात मूळ प्रश्न हा की, आपण वापरकर्ते म्हणून इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या किती आहारी जाणार आहोत?, आपण नवीन पिढीला ते न वापरण्याची बळजबरी करू शकणार आहोत का?, ही मुलं फावल्या वेळात काय करतात

यावर आपण किती प्रमाणात निर्बंध लावू शकणार आहोत?, नवनवीन टेक्नॉलॉजी येतच राहणार. त्याचा बाऊ करत बसणं योग्य नव्हे.
टेक्नॉलॉजीचा सजग वापर  कसा करायचा याची जाण मुलांना देणं हे, आपल्या हातात आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर स्वतःला त्रास न होऊ देता कसा करायचा हे, शिकवणं मला अधिक गरजेचं वाटतं. आपण जसे आहोत तसे छान आहोत असा विचार केला, फोटो एडिट करत बसण्यापेक्षा निरोगी आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करून स्वतःवर प्रेम करायला शिकलो तर, आपल्याला कोण सुंदर म्हणतं आहे कोण म्हणत नाहीये याने मग, मुला-मुलींना फार फरक पडणार नाही. सोशल मीडियावर राहूनही स्वतःवर कोणताही वाईट परिणाम होऊ न, देता मुलं स्वतःवर प्रेम करायला शिकतील.. 

saniya.bhalerao@gmail.com

Web Title: Will Instagram determine children's 'state of mind'? Depression in 33% of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app