एकनाथ शिंदे हल्ली सतत दिल्लीला का जातात?
By यदू जोशी | Updated: August 8, 2025 09:06 IST2025-08-08T09:04:51+5:302025-08-08T09:06:05+5:30
ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता, सरकारमध्ये निर्णयस्वातंत्र्याची कसरत... या सगळ्यात शिंदे यांना आता भविष्याची काळजी लागली आहे, हे नक्की!

एकनाथ शिंदे हल्ली सतत दिल्लीला का जातात?
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकाच आठवड्यात दोनवेळा दिल्लीवारी का करावी लागली असेल, याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. राज्याचे राजकारण करताना त्यांना दिल्लीचा आधार घ्यावा लागत असल्याचे त्यातून दिसते. शिंदेंचे दबावतंत्र म्हणून या भेटीकडे अनेकांनी पाहिले, पण ही भेट संवादसाखळीचा एक भाग असू शकते. अशा भेटीमध्ये केवळ तक्रारी नव्हे तर भविष्यातील राजकीय आराखडा कसा असावा यावरही चर्चा होत असते. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. हवापाण्याच्या गप्पा तर नक्कीच झाल्या नाहीत. महाराष्ट्राशी संबंधित काहीतरी दिल्लीत शिजत आहे. कदाचित ही बिरबलाची खिचडी असू शकेल, लगेच पकणार नाही; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतायेता या भेटीगाठींच्या संदर्भांचे पदर उलगडतील.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशा गेल्या पाच वर्षांत खूप काही बदलून झाला. मित्र-शत्रूंची अदलाबदली भरपूर झाली. अशक्यप्राय वाटणारी राजकीय दोस्ती-दुश्मनीही झाली. आता सगळे स्थिरस्थावर झाले असे वाटत असतानाच कहानी मे पुन्हा ट्विस्ट येणे सुरू झाले आहे. त्याची सुरुवात ५ जुलैला ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ या उद्धव ठाकरे यांच्या वाक्याने झाली. ठाकरे बंधू एकत्र येणार असे चित्र स्पष्ट दिसत असताना आपल्या आणि आपल्या पक्षाच्या राजकीय भवितव्याची शिंदे यांना चिंता वाटणे साहजिक आहे. कारण, शिवसेनेचा जो भावनिक आधार शिंदेंनी ओढून घेतला होता तो दोन भाऊ एकत्र आल्याने परत ठाकरेंकडे जाण्याची भीती आहे. दिल्लीतील गाठीभेटींचा मार्ग त्यांनी या चिंतेपोटीच पकडला असल्याचे दिसते. विधानसभेत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता पुढची पाच वर्षे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकारणाचा पट राहील असे वाटत होते. पण मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पटावरील प्यादी इकडून तिकडे जातात की काय, असे वाटू लागले आहे.
परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिव्या देशमुखच्या सत्कारानंतर उभ्या उभ्या तिच्यासोबत बुद्धिबळ खेळले. खरा बुद्धिबळाचा डाव तर त्यांना खेळायचा आहे तो या निवडणुकीच्या निमित्ताने. आता महायुती किंवा आघाडीत जे एकमेकांसोबत आहेत ते जसेच्या तसे या निवडणुकांत सोबत नसतील. अलीकडील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण क्रिकेटपेक्षाही अनिश्चित झाले आहे. परवा सहा धावांनी भारताने जिंकलेल्या कसोटीत तिकडे सिराज होता, इकडे फडणवीस आहेत.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने आपले महत्त्व कमी होणार असेल तर ते वाढवायचे कसे, हेही शिंदे यांच्या डोक्यात चालले असावे. उद्धवसेनेचे खासदार आपल्या गळाला लावण्याच्या हालचाली त्यांनी दिल्लीच्या दोन्ही भेटींमध्ये केल्याचे खात्रीलायकरीत्या समजले. एक-दोन जण सोडून इतर खासदार त्यांनी आपल्यासोबत आणले तर मोदी-शाह यांच्या दरबारात त्यांचे महत्त्व फारच वाढेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांचा दबाव राहील. पण या खेळीत त्यांना यश येऊ शकलेले नाही, अशीही माहिती आहे. भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे, असे अंतस्थ सूत्रे सांगतात.
फडणवीस यांच्यासोबत सत्तेत असताना आपल्या पक्षाकडे असलेल्या खात्यांमध्ये निर्णयांचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आणि आपल्या मंत्र्यांना असावे, अशी भूमिका शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मांडली म्हणतात. हे खरे असेल तर त्यांना सध्या अपेक्षेनुसार निर्णयस्वातंत्र्य नाही, असा त्याचा अर्थ होतो. काही घटनांमध्ये ते दिसूनदेखील आले आहे. कोणी म्हणते की, ते मुख्यमंत्रिपद मागायला दिल्लीला गेले होते; पण वास्तव तसे नाही. माझ्या पक्षाकडे असलेल्या खात्यांचा मी मुख्यमंत्री आहे असे समजून मला अधिकार द्या, अशी गळ मात्र त्यांनी नक्कीच घातली असावी. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीने शिंदे अस्वस्थ होणे साहजिक आहे. अर्थात ठाकरे भाजपसोबत जातील असे मुळीच नाही, तरीही आपले महायुतीतील महत्त्व कमी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व वेगवेगळ्या खेळी खेळत राहील या शंकांनी शिंदे यांना दिल्ली दरबारात जाणे भाग पाडले असावे. दिल्लीतील नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे हे शिंदे वरचेवर दाखवत राहतील. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व त्यांना सन्मानाने सोबत घेऊन चालेल आणि त्याचवेळी दिल्लीचे भाजपश्रेष्ठी आपल्यासोबत आहेत हे शिंदे आपल्या पक्षातील नेत्यांनाही दर्शवित राहतील.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला काय होईल? हेही शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चिन्ह गमावल्याचे नुकसान उद्धव ठाकरे यांनी आधीच सोसले आहे, उद्या शिंदेंच्या विरोधात निर्णय गेला तर आगामी निवडणुकीत फटका बसण्याची पाळी आता शिंदे यांची असेल. हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबत त्यांनी दिल्लीत विचारविनिमय केलाच असणार. एकूणच काय तर शिंदे यांचे वर्तमान सुरक्षित आहे, त्यांना चिंता आहे ती भवितव्याची. ते सुरक्षित करणे हा त्यांच्या दिल्लीवारीचा अर्थ असावा.
yadu.joshi@lokmat.com