शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो?

By विजय दर्डा | Updated: May 26, 2025 06:26 IST2025-05-26T06:26:17+5:302025-05-26T06:26:26+5:30

स्पष्ट बोलणाऱ्या सक्षम नेत्यांना मागे ढकलून पक्षाचे नुकसान करण्यात काँग्रेसला इतका रस का? खरे तर खासदार शशी थरूर यांचा पक्षाला अभिमान वाटला पाहिजे..

Why is Congress so interested in damaging the party by pushing back capable leaders who speak out | शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो?

शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो?

डाॅ. विजय दर्डा 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

शशी थरूर यांच्यासारखा प्रगल्भ नेता आणि ओजस्वी वक्त्याचे महत्त्व सरकारला समजते; परंतु काँग्रेसला ते का समजत नाही हेच लक्षात येत नाही. पक्षाचे यामुळे किती नुकसान होत आहे याचा काही अंदाज काँग्रेसला आहे का? मी अनेक वर्षांपासून शशी थरूर यांना अगदी जवळून ओळखतो. सांप्रतकाळात शशी थरूर यांच्याइतकी सखोल समज असलेली व्यक्ती दुर्मीळ होय. काँग्रेसवाल्यांनी खरेतर त्यांचा यथोचित मानसन्मान केला पाहिजे. परंतु, पक्षश्रेष्ठींचे डोळे, नाक, कान सगळे काही झालेले काँग्रेसजन सतत त्यांचा तिरस्कार करताना दिसतात.

‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधात जगातील ३३ देशांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी भारत सरकारच्या संसदीय कार्य व्यवहार मंत्रालयाने सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे तयार केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांसहित भारताच्या सहकारी देशांसमोर ही मंडळे जातील. पाकिस्तानने केलेल्या  खोडसाळपणाचे संपूर्ण पुरावे देऊन त्या देशाचे पितळ उघडे पाडणे हा या समित्या नेमण्यामागचा उद्देश आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे या प्रतिनिधी मंडळात समाविष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या चार खासदारांची नावे मागितली. 

काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सैयद नासीर हुसेन आणि राजा बरार यांची नावे पाठवली. सरकारने गोगोई, नसीर आणि बरार यांची नावे स्वीकारली नाहीत. यादीतील आनंद शर्मा यांच्यासह शशी थरूर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद आणि अमर सिंह यांना सरकारने प्रतिनिधी मंडळाचे सदस्य केले. थरूर यांच्याकडे अमेरिकेला जाणाऱ्या गटाचे नेतृत्व सोपवले गेले. बाकी नावांवर काही वाद झाला नाही. परंतु, थरूर यांच्या नावावरून बरीच बेचैनी दिसली.

‘थरूर यांचे नाव तर पक्षाने दिलेच नव्हते’ असे काँग्रेसने म्हटले. पण मग प्रश्न असा आहे की, त्यांचे नाव का दिले गेले नाही? २८ मे २०१५ रोजी ऑक्सफर्ड युनियनमध्ये थरूर यांनी ब्रिटनची कशाप्रकारे धुलाई केली हे आपण विसरलो का? वसाहती केलेल्या देशांना ब्रिटनने  नुकसान भरपाई म्हणून प्रतीकात्मक रक्कम दिली पाहिजे असे थरूर म्हणाले होते. परराष्ट्र-कारणावर उत्तम पकड असलेल्या थरूर यांची काँग्रेसने सतत अवहेलनाच केलेली दिसते. कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद सांभाळण्याची योग्यता असताना त्यांना राज्यमंत्रिपद दिले गेले होते.

प्रतिनिधी मंडळात समावेश झाल्यावर थरूर यांनी समाजमाध्यमांवर लिहिले, ‘अलीकडे घडलेल्या घटनांवर आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी भारत सरकारच्या निमंत्रणामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. राष्ट्रीय हितासाठी माझ्या सेवांची गरज असेल तेव्हा मी कधीही मागे हटणार नाही.’

एक व्यक्तिगत अनुभव आठवतो. कारगिल युद्धाच्या वेळी काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी असे ठरवले की, तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. पण, माझा प्रश्न यादीत समाविष्ट झालेला होता. मी प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिलो असता मला आधी मनमोहन सिंग आणि नंतर प्रणव मुखर्जी यांनी लक्षात आणून दिले की, पक्षाने प्रश्न विचारायचा नाही असे ठरवले आहे. तरीही मी विचारले, ‘बुलेटप्रूफ जॅकेट असूनही आपले सैनिक गोळी लागून हुतात्मा का होत आहेत?’ शवपेटीच्या गुणवत्तेवरूनही मी प्रश्न विचारला. कारण त्यावेळी देशाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे हवी होती. अनेकदा अशा प्रकारचा बेडरपणा आवश्यक असतो. शशी थरूर यांनी योग्य निर्णय केला आहे.

सरकारने प्रतिनिधी मंडळातील सदस्यांची निवड समजून उमजून केलेली आहे. त्यात ५१ खासदार, माजी मंत्री आणि आठ निवृत्त राजनैतिक अधिकारी सामील आहेत. भारताची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्याची उत्तम क्षमता असलेले हे लोक आहेत. ज्या तेहतीस देशांची निवड झाली आहे, त्यात १५ देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी किंवा अस्थायी सदस्य आहेत. पाच देश लवकरच सदस्य होतील. इतर देश असे आहेत ज्यांचे म्हणणे जागतिक व्यासपीठावर महत्त्वाचे मानले जाते.

राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना विचारलेले तीन प्रश्नही चर्चेत आहेत. १) भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत मोजण्याचा प्रयत्न का केला गेला? २) ट्रम्प यांना मध्यस्थी करायला कोणी सांगितले? ३) कोणताही देश उघडपणे भारताबरोबर उभा का राहिला नाही? आपले परराष्ट्र धोरण असफल झाले आहे काय?- असे हे नेमके प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातल्या पुष्कळ देशांशी मैत्री करण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हे देश आपल्या बरोबर उभे राहतील, अशी अपेक्षा होती. 

प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या कूटनीतीतून भारताचा दृष्टिकोन अधिक व्यापक स्वरूपात जगाच्या समोर येईल आणि पाकिस्तानचे पितळ उघडे पडेल, अशी खात्री वाटते. भारत सरकारने अमेरिकेसारख्या महत्त्वपूर्ण देशाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वासाने सोपवली असा खासदार शशी थरूर यांच्यासारखा हिरा आपल्याकडे आहे याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे.
 

Web Title: Why is Congress so interested in damaging the party by pushing back capable leaders who speak out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.