शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मराठी माणसांनाच मराठी नाटकांचं कौतुक का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 10:53 IST

नाटकात सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; तसंच हे!

सतीश आळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार

नाटकात सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; तसंच हे!

मायबाप रसिकहो! बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत. मी काही त्यांच्याएवढा मोठा नाही; पण माझी भावना तीच आहे. माझी नाटकं फारशी लोकप्रिय नाहीत. नेम धरून बघावी लागतात. अत्यंत कमी प्रयोग झालेत. जास्त म्हणजे 'महानिर्वाण, त्याचेही ४००-५०० प्रयोग झालेत. 'दुसरा सामना' या एकमेव व्यावसायिक नाटकाचे दोन-अडीचशे प्रयोग झाले. 'बेगम बर्वे' चं अजूनही नाव घेतलं जातं; पण १०० प्रयोगही झाले नाहीत. बाकीच्या नाटकांचे फक्त पन्नास-साठ प्रयोग झाले असतील. इतक्या कमी प्रयोगानंतरही माझ्या नाटकांची प्रेक्षकांनी कधी टिंगल, चेष्टा नाही केली. मी लिहिलेलं समजून घेतलं. हा परिपक्वपणा मराठी प्रेक्षकांमध्ये आहे. ही परंपरा विष्णुदास भावेंनी सुरू केली.

१८५६ साली महात्मा फुल्यांनी 'तृतीय रत्न' नाटक लिहिलं. दुर्दैवाने १००-१५० वर्षे ते प्रसिद्धच झालं नाही; पण त्यांच्यासारख्या विचारवंतालाही वाटलं, माझा विचार मांडण्यासाठी नाटक हे हत्यार म्हणून वापरता येऊ शकेल का? १९८४ साली बाबा आढावांनी पुरोगामी सत्यशोधक नियतकालिकात या नाटकाची संहिता पहिल्यांदा प्रसिद्ध केली. त्यात चातुर्वण्यावर कोरडे ओढले होते.

नाटकातून प्रचार केलेला प्रेक्षक कधीच मान्य करत नाहीत. नाटक प्रवाही असतं. सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. प्रत्येक प्रयोग त्याच ताकदीने होत नाही. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; नाटकाचं तसंच आहे.

आता वयाच्या ७४ व्या वर्षी माझ्या लक्षात येतं की, आपण परंपरा नाकारत होतो म्हणजे तिचा अर्थ लावत होतो. चेष्टा करून परंपरा तुटत नाही. मेलेला माणूस कीर्तन करतो, हे नाटकात चालतं. तो कीर्तनाची चेष्टा करत नाही. महानिर्वाण नाटकात नचिकेत देवस्थळी खरोखरच कीर्तन करतो. घाशीराम कोतवालमध्ये लोक खरोखरच खेळ म्हणून नाचतात. लावणी खरोखरची होऊन जाते. तिची चेष्टा होत नाही. परंपरा व नवतेच्या झगड्याची सुरुवात विष्णुदास भावे यांनी पहिल्यांदा केली. नाटकाचा, कलेचा व्यवसाय होऊ शकतो, हे दाखवलं. नटाला बांधून ठेवणारा करारही केला. तो करार आम्ही आजही नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वाचायला देतो.....

मराठी नाटकांविषयी महाराष्ट्राबाहेर अतिशय चांगलं बोललं जातं. मी. जब्बार, मोहन आगाशे जेव्हा सिक्कीममध्ये गंगटोकला शिकवायला गेलो, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांनी मराठी नाटकांच्या जाहिराती लॅपटॉपवर दाखविल्या. अडीच-तीन लाखांचं उत्पन्नही सांगितलं. 'चारचौघी'चे प्रयोग परत सुरू झालेत, हेही सांगितलं. ३००-५०० रुपयांचं तिकीट काढून प्रेक्षक नाटक बघायला येतात हे अचंबित करणारं आहे, असं त्यांना वाटतं, पण आपल्या लोकांना काही तसं वाटत नाही. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. 

आमचं एक नाटक पाहिल्यानंतर बाळ कोल्हटकरांनी 'आम्हालाही नाटक लिहून द्या' अशी विनंती केली होती. त्या बाजूची नाटकं वाईट असतात असे नाही; पण मला काही तसं लिहिता आलं नाही. प्रभाकर पणशीकरांच्या नावे दुसरा पुरस्कार मला मिळाला आहे. त्यांच्याशी आमचं घाशीराम कोतवालवरून भांडण होतं; पण कधी कडवटपणा आला नाही. कमीत कमी मानधनात आणि प्रयोगात काम करणारे कलाकार आम्हाला मिळाले. १९९६ साली वसंतराव गोवारीकरांनी मला पुणे विद्यापीठात आणलं. तिथे नाट्यशास्त्र विभागाची निगराणी मी केली. माझे विद्यार्थी आज मालिका, चित्रपटात आहेत. कोणत्याही पायाभूत सुविधा नसताना, तिथे मनाजोगे प्रयोग करण्यासाठी स्वायत्तता विद्यापीठाने दिली. 

भावे पदकासारख्या पुरस्कारानंतर लोकांच्या मनात घंटा वाजत असेल, चला तुमचा वर्तमानकाळ आता संपतोय; पण अजून मी पूर्णतः रिटायर होणारा नाही. नवं नाटक सुचतंय. 'ठकीशी संवाद' नावाचं एक नाटक लिहिलंय. २०२३ मध्ये ते रंगभूमीवर येईल, तेव्हा भेटूया!

(रंगभूमी दिनी सांगली येथे प्रतिष्ठेच्या विष्णुदास भावे गौरव पदकाचा स्वीकार करताना व्यक्त केलेले मनोगत.) 

शब्दांकन : संतोष भिसे, लोकमत, सांगली