मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:49 IST2025-06-06T08:48:59+5:302025-06-06T08:49:54+5:30

पाकिस्तानबद्दल मोदींची जहाल भाषा हे उघड संघर्षाच्या धोरणाकडे जाण्यापूर्वीचे प्रारंभिक चिन्ह आहे, की संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी चातुर्याने वापरलेली क्लृप्ती?

Why does Modi speak in harsh language to Pakistan? A glimpse seen in the speech after 'Operation Sindoor' | मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूर’ गुप्तपणे पार पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभरात १२ ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये जहाल भाषणे केली. त्यांनी युद्धाचे चित्र रंगविले आणि पाकिस्तानला इशारे दिले. ‘पुन्हा हल्ला करायला भारत मागेपुढे पाहणार नाही,’ असे म्हणताना जगात योग्य तो संदेश जावा आणि देशातही आवेश उत्पन्न व्हावा, यासाठी मोदी सहेतुकपणे बोलत असल्याचे जाणवत होते. गुजरातमधील एका सभेत ते म्हणाले, ‘गरज पडली तर आम्ही तुमच्या घरात घुसू, हे भारताच्या शत्रूने लक्षात घ्यावे, गप्प बसण्याचा काळ आता संपला आहे,’ पाकिस्तान सीमेच्या जवळ बिकानेरमधल्या सभेत ते म्हणाले, ‘हा नवा भारत आहे. आम्ही धमक्या सहन करणार नाही. चोख उत्तर दिले जाईल आणि तेही शब्दांनी नव्हे, तर तोफगोळ्यांनी!’ बिहारमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा दौरा केला. पाकिस्तानचा ‘साप’ असा रूपकात्मक उल्लेख करून ते म्हणाले, ‘त्याने जर आता पुन्हा फणा काढला तर त्याला बिळातून बाहेर काढून आम्ही ठेचू.’

प्रमाणापेक्षा जास्त बदला घेण्याचे इस्रायलचे तत्त्व आहे. मोदी यांचे सूरही त्या तत्त्वाशी मिळतेजुळते दिसतात. जाहीरपणे असे बोलून ते भारताच्या धोरणात्मक प्रतिमेचे रंग बदलत आहेत की काय? असा त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो. टीकाकार म्हणतात, युद्धाच्या गोष्टी करून निवडणुकांचा प्रचार चालला आहे. ‘तुम्ही तुमच्या सीमांचे रक्षण करणे वेगळे आणि व्यासपीठांवरून आडून-आडून  धमक्या देणे वेगळे’ असे निवृत्त राजनैतिक अधिकारी शिवशंकर मेनन म्हणाले. आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली तर ठीक; नाहीतर ती नसतानाही भारत आता एकतर्फी कृती करील असा अत्यंत हिशेबी संदेश इस्लामाबाद आणि जगाला यातून द्यावयाचा आहे, असे काहींना वाटते. ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चा सतत उल्लेख करून मोदी जागतिक संकेत झुगारणारे  बलशाली नेते अशी आपली प्रतिमा निर्माण करू इच्छितात. यावरून एक संत्रस्त करणारा प्रश्न समोर येतो: उघड संघर्षाच्या धोरणाकडे जाण्यापूर्वीची ही प्रारंभिक चिन्हे आहेत की, संघर्ष टाळण्यासाठी वापरलेली क्लृप्ती?

शिस्त की डागडुजी? राहुल यांच्यापुढे पेच

पक्षशिस्तीचे उल्लंघन म्हणता येईल अशा अंतर्गत मतभेदांविषयी आपली नाराजी राहुल गांधी यांनी कधीही लपवलेली नाही. काही नेते पक्षाला आतून घातपात करत आहेत असे ते म्हणत आले. ‘महत्त्वाच्या क्षणी काँग्रेसला कमकुवत करणारे घटक पक्षात आहेत’ हे  त्यांनी अनेकदा सूचित केले आहे. असे असले तरी शशी थरूर यांच्यासारखे नेते मोकळेपणाने काम करतात. मतभेदांचा राग ते सातत्याने आळवतात, तरीही त्यांना सहन का केले जाते? - या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या डळमळीत उत्क्रांतीत आहे. थरूर किंवा त्यांच्यासारख्या अन्य नेत्यांना पक्ष सहजपणे बाजूला करू शकणार नाही. शहरी तोंडवळा, संवादकौशल्य, माध्यमात प्रिय आणि प्रभाव असलेल्या ठिकाणी निवडणूकदृष्ट्या उपयोगाचे असे हे लोक आहेत. थरूर यांनी व्यक्त केलेले मतभेद हे पारंपरिक अर्थाने बंड मानले गेले नाही. राहुल यांच्या आतल्या वर्तुळात भले ते डोकेदुखी असतील; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व काँग्रेसला अभिजनांच्या वर्तुळात आपल्या  अस्तित्वाची चुणूक दाखवण्यासाठी उपयोगी पडते, हेही खरेच!

राहुल पक्षाच्या प्रतिमेची पुनर्बांधणी करीत असून ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. वेगळा सूर लावणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर अंतर्गत गोंधळाच्या मथळ्यांचा धोका संभवेल. त्याचा फायदा भाजपला होईल. मतभेद सहन न होणारा नेता असा आरोप त्यांच्यावर होत असताना शिस्तीची कुऱ्हाड चालवली तर फायद्यापेक्षा तोटा जास्त होईल. पक्षाकडे आता पुरेसे खासदार, आमदार नाहीत. निवडणुकीत पक्ष गोते खातो आहे. त्यामुळे विसंवादाचे सूर सहन करणे तुलनेने परवडते; परंतु राहुल यांनी आता  सहकाऱ्यांना दोष देणे थांबवले पाहिजे, असे अनेक ज्येष्ठ मंडळींना वाटते.

सत्तेच्या वर्तुळातील जोड्या

बहुतेक सगळ्याच सनदी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात केंद्रीय मंत्रिमंडळात सचिव म्हणून काम करायचे असते. ७०० च्या घरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांपैकी सगळ्यांचीच स्वप्नपूर्ती होत नाही; परंतु काही नशीबवान जोड्या असतात. हरयाणा केडरच्या  सुकृती लेखी नॅशनल ॲथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनच्या अध्यक्ष असून त्यांना सचिवाला समकक्ष अधिकार आणि वेतनश्रेणी मिळते. त्यांचे पती अभिलाष लिखीहे मत्स्यपालन खात्याचे सचिव आहेत. दीप्ती उमाशंकर या हरियाणातील अधिकारी राष्ट्रपतींच्या सचिवालयात सचिव समकक्ष अधिकार आणि वेतन घेतात; त्यांचे पती उमा शंकर हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात सचिव आहेत.  जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिव देवश्री मुखर्जी यांनी अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांचे पती अमित यादव  हे सामाजिक न्याय मंत्रालयात सचिव आहेत.  नीलम शम्मी राव या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव असून, त्यांचे पती व्ही. एल. कांथा राव हे खाण  मंत्रालयात सचिव आहेत.

harish.gupta@lokmat.com

Web Title: Why does Modi speak in harsh language to Pakistan? A glimpse seen in the speech after 'Operation Sindoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.