ये दिल कशाला मांगे मोअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:08 AM2021-09-21T10:08:09+5:302021-09-21T10:08:38+5:30

गडकरी म्हणतात, हवे ते मिळत नाही.  ‘आणखी’चा हव्यास सुटत नाही; पण नाराजीच्या या साखळ्या राजकारण्यांइतक्याच सामान्यांच्याही गळ्यात असतातच!

Why does this heart ask for more? | ये दिल कशाला मांगे मोअर?

ये दिल कशाला मांगे मोअर?

Next

दिनकर रायकर - समन्वयक संपादक, लोकमत

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे पटते, जे वाटते, ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे बोलून टाकणारा मोकळाढाकळा वैदर्भीय राजकारणी म्हणजे नितीन गडकरी, अशी त्यांची ख्याती आहे.

गडकरी जसे सभेत बोलतात, तितकेच कामातूनही बोलतात. राज्यात आणि केंद्रातही त्यांच्या कामगिरीशी अपवादानेच कुणाची तुलना होऊ शकेल. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी राजकीय नेत्यांच्या ‘असमाधानी वृत्तीबद्दल’ परखड भाष्य केले. 

प्रत्येक पक्षात, प्रत्येक राजकारणी असमाधानी आहे. मंत्रिपद नाही म्हणून आमदार नाराज, चांगले मंत्रिपद नाही म्हणून मंत्री नाराज, मुख्यमंत्रीपद नाही म्हणून चांगले मंत्री नाराज, अशी ही नाराजीची साखळी त्यांनी मांडली. या सगळ्या असमाधानी व्यवस्थेचे ते प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्यांचे भाषण आणखी रंगले, हे काही वेगळे सांगायला नकोच.

 ‘आहे त्यात समाधान माना, चांगले काम करा, सुखी व्हाल’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी जाताजाता सगळ्यांना दिला. गडकरींना सगळेच मनापासून ऐकतात; पण त्यांचे विचार आचरणात आणत नाहीत, त्यासाठी ते कचरतात, हे राजकीय नेत्यांचे आणि सध्याच्या राजकारणाचेही दुर्दैव. 

गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे राजकारण्यांनी अपेक्षांचे आणि महत्त्वाकांक्षांचे ओझे उतरून ठेवून कामाला सुरुवात केली आणि आपल्यावरील जबाबदारीला न्याय दिला, तर या देशात आणि राज्यातही काय बहर येईल ! विकासाचे किती प्रकल्प मार्गी लागतील! कामे कशी झपाट्याने होतील!!- पण असे काही होत नाही. ‘ये दिल मांगे मोअर’च्या जमान्यात समाधानी म्हणावा, असा एकही नाही. 

सत्ता आणि अधिकारपदाचे नाट्य ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे सारख्याच ईर्ष्येने सुरू असते. महत्त्वाकांक्षांची यादी काही केल्या संपत नाही. हवे आहे ते मिळत नाही आणि ‘आणखी’चा हव्यास तर काही केल्या सुटत नाही. मुदलातच समाधान नसले तर जनकल्याण कसे होणार? त्यामुळे सध्याच्या बहुतेक सगळ्या समस्यांचे मूळ कशात असेल, तर ते राजकीय नेतृत्वाच्या असमाधानात. 

- गडकरींच्या या कानपिचक्या सध्याच्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला आहेत, हे खरेच. आता राजकारणी लोकांना त्यांच्यातलाच कुणी शालजोडीतले देतो, तेव्हा श्रोतृवृंदाकडून टाळ्या वाजणे साहजिक आहे; पण गडकरी जे बोलले ते फक्त राजकीय व्यक्तिमत्त्वांनाच लागू होते, असे मुळीच नाही. ते सामान्य माणसासाठीही तितकेच लागू आहे. मोठे घर, मोठी गाडी, आणखी मोठा पगार, दागदागिने, जमीन जुमला, बढत्या, पदे, मुलांची शिक्षणे, त्यांचा डामडौल अशी ही यादी लांबत जाते. ‘स्टेटस मेंटेन’ करणे हे व्यक्तिसापेक्ष आहे, याचा विसर पडतो आणि सुरू होतो तो मृगजळाचा हव्यास. या हव्यासातून, जे हाती आहे त्याचाही उपभोग घेता येत नाही आणि असलेल्या जबाबदारीलाही धड न्याय देता येत नाही. 

हव्यासाच्या मागे धावणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उरतात ती नैराश्याची आणि असमाधानाची कधीही न संपणारी जळमटे. ही निराशा टाळण्यासाठी सोपा उपाय गडकरींनीच आपल्या भाषणात सांगितला आहे. ते म्हणतात तसे, ‘मिळाले आहे त्यात समाधान माना, खांद्यावर असलेल्या जबाबदारीला न्याय द्या आणि उत्तम काम करा;’  पण ते लक्षात घेतले पाहिजे. समजून घेतले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे. 

- ‘सर्वपक्षीय नेत्यांना गडकरींच्या कोपरखळ्या’ एवढाच त्याचा अर्थ नाही. थोडी जबाबदारी जनतेनेही घ्यावी. थोडे आचरण सामान्यजनांनीही करावे. आपला देश आणि आपले राज्य नक्कीच पुढे जाईल. सगळेच राजकारण्यांवर ढकलायला हवे, असे थोडेच आहे?

Web Title: Why does this heart ask for more?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.