डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 08:05 IST2025-10-04T08:03:55+5:302025-10-04T08:05:14+5:30
ट्रम्प यांनी आपला हट्ट रेटला तर हॉलिवूडमधल्या चित्रपटांचा निर्मिती खर्च वाढेलच, शिवाय भारतीय चित्रपट आणि व्हीएफएक्स उद्योगालाही मोठा फटका बसू शकेल.

डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
नरेंद्र बंडबे
सदस्य, फिप्रेस्की आंतरराष्ट्रीय
सिने-समीक्षक संघटना
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच नवे टॅरिफ फतवे काढत आहेत. परदेशात बनलेल्या सिनेमांवर १०० टक्के टॅरिफ लागू करण्याची धमकी ट्रम्प यांनी मे महिन्यात दिली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी ती खरी करून दाखवली. याची अंमलबजावणी नक्की कधी होणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. सरसकट करवाढ लागू झाल्यास अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीवर याचा दूरगामी परिणाम होणार हे स्पष्ट आहे.
हॉलिवूड सिनेमांच्या निर्मितीचा खर्च अर्थातच वाढेल. वॉर्नर ब्रदर, डिस्नेसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या सिनेमांचे स्पेशल इफेक्ट कॅनडातल्या टोरंटो किंवा व्हन्कुव्हर किंवा दक्षिण कोरियातल्या सोल या शहरात करवून घेतात. नवे टॅरिफ लागू झाल्यास या खर्चात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. टॅक्स वाढीची घोषणा झाल्यानंतर लागलीच सिनेमा कंपन्यांचे समभाग सुमारे सात ते आठ टक्क्यांनी घसरले आहेत.
सिनेमानिर्मितीची कामं परदेशात गेल्यानं अमेरिकेतल्या इंडस्ट्रीवर परिणाम होतो, टॅक्स लावल्यास अमेरिकेत जास्त रोजगारनिर्मिती होईल, असा ट्रम्प यांचा दावा आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्वच कामे अमेरिकेत केल्यास उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये अपेक्षित असणारी वाढ अशक्य आहे. अनेक अमेरिकन आर्टिस्ट परदेशात जाऊन तिथं हॉलिवूड सिनेमांवर काम करतात. यातूनही होणारी रोजगारनिर्मिती थांबल्यास कुशल मनुष्यबळ बेरोजगार होईल, अशी भीती अमेरिकेतल्या आर्टिस्ट संघटनांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत परदेशी सिनेमांची मोठी मागणी आहे. नवा टॅरिफ लागू झाल्यास परदेशातून येणारे सिनेमे कमी होतील. अमेरिकेतल्या प्रेक्षकाला विविधेची आस असते.
युरोप आणि आशियात बनलेले सिनेमे इथले प्रेक्षक डोक्यावर घेतात. आपल्याकडचा आरआरआर (२०२२) अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि त्यानं ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारली. बाहेरून येणारे सिनेमे महाग झाल्याने तिकिटांचे दर वाढतील आणि आधीच घटत चाललेला प्रेक्षक थिएटरकडे पूर्ण पाठ फिरवेल. यामुळं थिएटर्सचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार ट्रम्प यांची ही करवाढ कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. हॉलिवूडमधल्या माध्यम कंपन्या याविरोधात कोर्टात जातील. तिथली न्यायालयीन लढाई कित्येक महिने चालण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं हॉलिवूडचा वापर सॉफ्ट पॉवर म्हणून केला आहे. याच जोरावर हॉलिवूड जगभरात पोहोचलं आणि त्यातून अमेरिका अब्जावधी डॉलर्सची कमाई करते. ट्रम्प यांनी आपला हट्ट रेटला, तर जगभरातून हॉलिवूडच्या सिनेमांना विरोध व्हायला लागेल. पायरसी ही सिनेमा क्षेत्राची सर्वांत मोठी समस्या आहे. हॉलिवूडविरोधातही पायरेट मोहीम उघडण्याची शक्यता आहे. टोरंट आणि इतर पीअर टू पीअर प्लॅटफॉर्म यांना पुन्हा उधाण येईल. हे सर्व लक्षात घेता करवाढीचा हा निर्णय अमेरिका आणि हॉलिवूडसाठी घातकच ठरण्याची शक्यता जास्त आहे.
अलीकडच्या काळात भारत व्हीएफएक्स आणि एनिमेशनसाठी हब म्हणून पुढे येत आहे. खर्च कमी करण्यासाठी हॉलिवूडच्या कंपन्या भारत आणि आशियातल्या काही देशांमध्ये ३० ते ४० टक्के सिनेमाची कामे वळती करतात. स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स असलेला कुठलाही हॉलिवूडचा सिनेमा पाहा, त्याच्या एण्ड टायटल स्क्रोलमध्ये भारतीय नावे दिसतील.
ही कामे भारतात येण्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं स्वस्त मनुष्यबळ. हे व्हीएफएक्स किंवा स्पेशल इफेक्ट करण्यासाठी भारतीय आर्टिस्टला अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी पैसे द्यावे लागतात. त्या बळावर ही आउटसोर्सिंग इंडस्ट्री ३० मिलियन डॉलर्सच्या पलीकडे गेली आहे. यामुळे जर अतिरिक्त शुल्क लादले गेले, तर हॉलिवूडवाले ही कामे आऊटसोर्स करण्याच्या फंदात पडणार नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात भारतातली व्हीएफएक्स इंडस्ट्री धोक्यात येऊ शकते. इथल्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
भारतातले लाखो लोक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. या डास्पोरिक ऑडियन्सच्या जोरावर अमेरिकेत भारतीय सिनेमांची मागणी प्रचंड आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ते आरआरआर किंवा केजीएफसारख्या सिनेमांचे देता येईल. आपले सुपरस्टार तिथे चांगलेच प्रसिद्ध आहेत. ट्रम्प यांनी आपला हेका कायम ठेवला तर हे सर्वच बारगळण्याची शक्यता आहे. इथल्या लोकांना आपला सिनेमा अमेरिकेत घेऊन जाणे महागात पडेल. यामुळे अमेरिकेत दाखल होणाऱ्या भारतीय सिनेमांची संख्या कमी होऊ शकते. शिवाय भारतातले अनेक सिनेमे हे आता अमेरिकेतल्या मोठ्या स्टुडिओंसोबत को-प्रोडक्शनमध्ये बनविले जातात. हा सहनिर्मितीचा व्यवसायच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कोरोनामध्ये सिनेमाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आता कुठे हे क्षेत्र सावरत आहे. तरीही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या हवी तेवढी वाढलेली नाही. ती कमीच होत चालली आहे. वाढलेले ओटीटी प्लॅटफॉर्म हे एक कारण आहे. चढे टॅरिफ लावले गेल्यास अमेरिकेत भारतीय कंटेट महागडा होऊ शकतो आणि त्याचा ओटीटी रिलिजवरही परिणाम होऊ शकतो. एकूणच ट्रम्प यांचा हा निर्णय सिनेमा क्षेत्रासाठी मारक ठरेल, यात शंका नाही.