मरणाची भीती कुणाला दाखवता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 08:30 AM2021-12-15T08:30:34+5:302021-12-15T08:31:34+5:30

मरणाची कसली भीती? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून झाले. त्यांनी मरेपर्यंत काम केलं! मृत्यूनं त्यांचा विचार अधिक पुढं गेला !

To whom do you fear death? | मरणाची भीती कुणाला दाखवता?

मरणाची भीती कुणाला दाखवता?

Next

दामोदर मावजो, 'ज्ञानपीठ' पुरस्कार जाहीर झालेले ख्यातनाम साहित्यिक

माझ्या निमित्ताने कोकणी भाषेला दुसऱ्या ‘ज्ञानपीठा’चा सन्मान लाभला, याचा आनंद झालाच; नाही कशाला म्हणू? आनंद झालाच, पण हर्षभारित झालो असं नव्हे. दुपारी जेवायला बसत होतो इतक्यात पुरस्काराची बातमी आली. बायकोच्या डोळ्यात आनंदानं पाणी आलं. आम्ही बातम्यांसाठी टीव्ही लावला, तर तिथे नागालँडमध्ये गोळीबार झाल्याची बातमी सुरू होती. नंतर कळलं दहशतवादी असल्याच्या गैरसमजातून निरपराध माणसांचे बळी गेले. त्यांच्या घरच्यांचा आक्रोश सुरू आहे नि आपल्याकडे साहित्यातला सर्वोच्च सन्मान मिळाल्याचा जल्लोष सुरू आहे; याचा विषाद वाटल्याशिवाय कसा राहील?

तसाही मी लेखक असलो तरी (खरं तर लेखक आहे म्हणूनच) केवळ साहित्यापुरता मर्यादित राहिलो नाही हे खरं. तो माझा स्वभाव नाही. पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प, मानवाधिकार यासाठी वेळप्रसंगी चार हात करायला मी मागेपुढे पाहिलेलं नाही. हे खरं, की माझं कार्यकर्तेपण साहित्यात डोकावून तिथे कारण आक्रस्ताळी भूमिका  मी कधी घेतली नाही. मी सगळीकडे सहृदयीपणे जोडलेला राहाण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आस्थाविषयांबद्दल मी स्पष्ट व प्रामाणिक असल्यामुळे मी कशालाही बळी पडत नाही व आक्रस्ताळाही होत नाही. आपण आपले विचार दुसऱ्याच्या माथी मारत असतो तेव्हा आपण तडतडे होतो, पण एखाद्या मुद्याबद्दल विचार निष्कपट व सत्य असतील ते पटवण्याची कसरत करावीच लागत नाही, असा माझा अनुभव आहे. विरोधकांनाही खरं व चांगलं काय हे ठाऊक असतं. त्यांना केवळ त्याचा स्वीकार करायचा नसतो. दुखवून सांगण्यापेक्षा पटवून सांगण्याकडे माझा कल असल्यामुळे कदाचित माझ्या वागण्या-बोलण्यात आक्रस्ताळेपणा नसावा. सुदैवानं मला चांगले लेखक वाचायला मिळाल्यामुळं तसे विचार मनात रुजू होत गेले.

‘सामाजिक चळवळींना बौद्धिक मदत करीत तुमचं लेखनही चालू राहतं. लेखकाला इतकं करता येतं का’- असा प्रश्न मला सदैव विचारला जातो. माझं म्हणणं, लेखकानं फक्त लेखन करावं अशी अपेक्षा का बाळगावी? दुसऱ्यांचे विचार ऐकून, समजून घेण्यातून लेखन करायला सामग्री मिळते की नाही? नाही तरी आजवर जे लाखो लोकांनी लिहिलंय तेच लिहिण्यात काय अर्थ आहे?  म्हणून लेखकानं चळवळ्या असलंच पाहिजे. राजकारणात, समाजकारणात,  सर्जनशील पद्धतीनं आवाज उठवला पाहिजे. आपण कलात्मक पद्धतीनं, सर्जनात्मक पद्धतीनं गोष्ट मांडतो तेव्हा बळजोरी नसल्यामुळे आपण काही गळी उतरवतोय असं लोकांना वाटत नाही. त्यामुळे सर्जनशील लेखकांनी आपली भूमिका ठसठशीतपणे न दाखवताही पटणाऱ्या गोष्टी वाचणाऱ्याला स्वत:च्या वाटतील अशा तर्हेनं सांगाव्यात.

सर्जनशील आणि थेट सक्रिय असण्यातून मला जिवे मारण्याच्या धमक्या  अनेकदा आल्या, हेही खरं आहे; पण एक सांगा, मरणाची कसली भीती? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून झाले. मरेपर्यंत या सगळ्यांचं काम सुरू होतं. मृत्यूनं त्यांचा विचार अधिक पुढं गेला, अशी माझी भावना आहे. मी मला पटलेला विचार सोडत नाही, हे माझ्या विरोधकांनाही ठाऊक आहे, त्यामुळे ते ही माझ्याशी तितक्याच ऋजूतेनं वागू शकतात. विरोधी विचारधारा असणाारे लोकही माझे मित्र आहेत. मी त्यांच्याशी वाद न घालता कृतीतून माझं म्हणणं पटवून देतो. समंजसपणा म्हणजे तडजोड नव्हे हे ही सांगतो. काही वेळेस जनहितासाठी अत्यावश्यक गोष्टी समोरच्याला पटत नाहीत तेव्हा अधिक ठामपणे सांगण्यासाठी जो निबरपणा हवा तो माझ्याकडे आहे. म्हणून मी काही लोकांना परवडत नाही.

-तरीही मी निर्भय नक्की नाही. मला भीती वाटते. कशाची? - काळ सोकावतोय याची! आज देशातील लोकांचा आवाज दाबला जातो आणि लोक त्याला बळी पडतात याची भीती वाटते. लोकांमधल्या  उदासीनतेविषयी, अनास्थेविषयी आवाज काढलाच गेला पाहिजे. सरकार कुठलाही पक्ष चालवो, पण प्रस्थापित व्यवस्थेविषयी माणसं निबर, निष्काळजी होतात; त्याविरोधात मी बोलतो. तुमची विचारधारा कुठाय असं विचारण्याची वेळ सध्या सतत येते आहे. लेखातून हा आवाज जास्त वाढतो, पण कथेतून माझी जबाबदारी आणखी वेगळी होते. माणसाला उसंत देऊन बदलता येण्याची शक्यता तयार होते.
अभिव्यक्तीचं एक माध्यम म्हणून मी सिनेमाची पटकथाही लिहिली. हेही साहित्य आहे असं माझं मत आहे, पण मी त्यात रमलो नाही.

पटकथा लिहिण्याची गरजही वेगळी होती. काही काळापर्यंत कोकणीतील साहित्यिक भाषेचा फार विकास झाला नव्हता. 1684 साली ज्या भाषेवर बोलण्याचीही बंदी आली, जी भाषा तीनसाडेतीनशे वर्ष अंधारात खितपत राहिली, पोर्तुगीजांच्या बंदी आदेशामुळं जी भाषा लोक जपून, घाबरत, चार भिंतीच्या आत बोलायचे ती ही कोकणी भाषा. १९६०पर्यंत तिनं अज्ञातवास भोगला, पण सामान्यातल्या सामान्य लोकांनी ही भाषा जिभेवर जतन करून ठेवली. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर या भाषेला पहिल्यांदाच साहित्यिक धुमारे फुटू लागले.  कोकणी भाषक पोर्तुगीज, इंग्रजी आणि मराठी भाषेच्या  जवळ होते, चांगलं वाचत होते. भाषा अशा सरमिसळीनं समृद्ध व सघन होते. वाचकाला नवं वाचल्याचा आनंद देते. लक्ष्मणराव सरदेसाईंसारख्या लेखकांचं यातील योगदान मोलाचं. अशा ज्येष्ठांमुळं आमच्या पिढीवर दुहेरी काम होतं. एक भाषा समृद्ध करायचं, दुसरं साहित्याचा परीघ वाढवायचं. ही सांगड घालत मी काम केलं.  भाषा टिकवण्या-वाढवण्याची जिद्द तुमच्या शिक्षणातून कमी, तुम्हाला हवी म्हणून जास्त यायला हवी. आपल्या अंतरातून येणारा आवाजच आपली भाषा टिकवतो.

शब्दांकन : सोनाली नवांगूळ

Web Title: To whom do you fear death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.