Who is the son of Goddardant's tea? Anna's maternal grandfather? | 'देवेंद्रपंतां’चा चहा नेमका कुणाचा.. अण्णा की नाना?
'देवेंद्रपंतां’चा चहा नेमका कुणाचा.. अण्णा की नाना?

- सचिन जवळकोटे

सोलापूरच्या बाजारपेठेची एक लाजबाब खासियत. दुकानी आलेल्या नव्या माणसाचा मनापासून पाहुणचार करायचा असेल, तर ‘ये बारक्याऽऽ अण्णाचा चहा सांग’, अशी आॅर्डर दिली जाते; मात्र एखाद्याला टाळायचंच असेल तर ‘ये बाळ्याऽऽ नानाचा चहा मागव’ असं सांगून त्या व्यक्तीला ताटकळत ठेवलं जातं. ‘अण्णाचा चहा’ म्हणजे फिक्स पाजला जाणारा.. ‘नानाचा चहा’ म्हणजे उगाचंच वेड्यात काढणारा. आता तुम्ही म्हणाल...आजच्या ‘लगाव बत्ती’त ‘अण्णा अन् नाना’चा चहा मध्येच कुठून आला ?’...याचं उत्तर देऊ शकतील केवळ ‘दुधनी’चे ‘सिद्धूअण्णा’ अन् ‘पंढरी’चे ‘भारतनाना’च...कारण या दोघांना फिरवत अन् ताटकळत ठेवून ‘देवेंद्रपंत’ नेमकं काय घडवू पाहताहेत, हे फक्त त्यांनाच माहीत. लगाव बत्ती...

परतीचे दोर कापत चाललेत..

अजून कशातच काही नाही. तरीही ‘सिद्धूअण्णां’च्या कार्यकर्त्यांमध्ये कमळाचा सुगंध एवढा पसरलाय की विचारू नका. ‘क्याऽऽ अण्णा का काम हुवा ?’ असं कुणी विचारलं तर त्यांचे निकटचे फक्त ‘हुवाऽऽ हुवाऽऽ’ एवढंच पुटपुटताहेत. आता कन्नडमध्ये ‘हुवा’ म्हणजे मराठीत ‘फूल’ होऽऽ. दुधनी पट्ट्यात तर पानमळ्यांऐवजी कमळाचेच मळे फुलविता येतील का, याचीही चौकशी काही शेतकरी करू लागलेत. ‘शांभवी’मधल्या एखादीचं नाव ‘कमळाबाई’ ठेवता येईल का, याचाही विचार म्हणे ‘शंकरअण्णा’ गांभीर्यानं करू लागलेत.


...‘सिद्धूअण्णा म्हणजे आता कमळवाल्यांचेच आमदार’ असं वातावरण अक्कलकोटमध्ये झालं असलं तरी अद्याप त्यांच्या ‘इनकमिंग’ला ग्रीन सिग्नल ‘देवेंद्रपंतां’नी दिलेलाच नाही. आपल्या लाडक्या ‘सचिनदादा’ला न दुखविता हा निर्णय कसा घ्यायचा, या विवंचनेत ‘पंत’ आहेत. अशातच ‘सुभाषबापूं’नी परवा पुण्यात ‘सचिनदादां’ना बळं-बळंच उचकावून ‘गडकरीं’शी बोलायला लावलेलं. त्यामुळं ‘सिद्धूअण्णां’चा विषय मध्येच लटकलाय.


नेमकं याचवेळी ‘हात’वाल्यांनी ‘नागणसूर’च्या महाराजांची आरती सुरू केलीय. या महाराजांनी ‘हात’वाल्यांकडं ‘इच्छुक फॉर्म’ भरण्यापूर्वी ‘वालें’च्या ‘प्रकाशअण्णां’शी गुप्त चर्चा केली होती, हे खूप कमी लोकांना माहितंय. आता ‘प्रकाशअण्णां’च्या मागचा ‘ब्रेन’ कुणाचा हे त्यांच्या नेत्यालाच विचारायला हवं; मात्र या खेळीत ‘हात’वाल्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. इकडं ‘सिद्धूअण्णां’चा परतीचा मार्ग ब्लॉक करून टाकला अन् तिकडं ‘गौडगाव’ महाराजांची ताकदही कमी केली.ऐवीतैवी लोकसभा प्रचारात वापरलेल्या गाड्यांच्या डिझेल खर्चावरून दोन्ही महाराजांमध्ये ‘भडका’ उडालाय, हा भाग वेगळा. लगाव बत्ती...

विमानतळावर ‘कौन है ये आदमीऽऽ’

‘पंढरी’तील ‘भारतनानां’च्या बाबतीतही ‘देवेंद्रपंतां’ची तीच तिरकस खेळी. मुंबईला केबीनमध्ये छान गप्पा मारतील. पंढरपुरात त्यांच्या घरी जाऊन मस्तपैकी जेवतील; मात्र सार्वजनिक ठिकाणी चारचौघात ओळख देताना ‘कौन है ये आदमीऽऽ’ अशीच स्ट्रॅटेजी. याचं जिवंत उदाहरण विमानतळावर अनेकांनी याचि देही याचि डोळा अनुभवलेलं. त्यामुळंच की काय, हे ‘नाना’ आपल्या पक्षाचे ‘सिद्धूअण्णा’ यांच्या हातात हात घालून गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर पडलेले. ‘पंतां’च्या गाडीसमोर हात जोडून उभे राहिलेले.
हीच तर हुश्शाऽऽर ‘पंतां’ची खासियत ठरलीय. युद्धात उतरण्यापूर्वीच समोरच्या दुश्मनाचा आत्मविश्वास खचायला हवा, यावर त्यांचा अधिक भर. त्याच खेळीतून ‘अण्णा’ अन् ‘नानां’सारखे कैक आमदार त्यांनी फिरवत ठेवलेले. त्यांच्या पक्षांतराची पुडी हळूच कार्यकर्त्यांमध्ये सोडली गेलेली. या आयाराम-गयारामांची विश्वासार्हता धोक्यात आणून त्यांचा त्यांच्या मतदारसंघातला ‘टीआरपी’ पद्धतशीरपणे कमी केला गेलेला; जेणेकरून ‘फायनल डिलिंग’ला बसताना त्यांच्या मागणीचा ‘रेट’ कमी झाला पाहिजे अन् यांच्या अटींचा ‘भाव’ वाढला पाहिजे. क्या बात है...मान गये पंत. लगाव बत्ती...!

दादां’कडं ‘कमळ’ गेलं तर
‘मामां’कडं काय...घड्याळ ?

माढ्यातही ‘बबनदादां’च्या पक्षांतराचा मुद्दा ऐरणीवर. ‘दादा’ जर ‘कमळ’ घेऊन फिरू लागले तर माढ्यात ‘घड्याळ’ कोण वापरणार, असा प्रश्न निष्ठावान कार्यकर्त्यांना पडलाय. आपसूकच साºयांची नजर ‘संजयमामां’वर खिळलीय. पारा-पारावर ‘जर-तर’ची कुजबूज सुरू झालीय. यदाकदाचित ‘थोरले काका बारामतीकरां’नी शब्द टाकला तर ‘दादां’च्या विरोधात ‘मामा’ उभारणार का ? याचाही शोध घेतला जातोय. असं ‘महाभारत’ घडण्याची शक्यता कमीच; कारण ‘बारामतीकरांचा शब्द’ पाळण्याऐवजी ‘बारामतीकरांना दिलेला शब्द’ मोडण्याच्या मूडमध्येच सध्या ‘मामा’. लोकसभेला दिलेला शब्द लगेच विधानसभेला मोडून ‘मामा’ बहुधा ‘बारामतीकरां’चाही विक्रम मोडण्याच्या मानसिकतेत. आता या दोघांचाही शब्द लोकसभेला मतदारांनी नाही झेलला, हा भाग वेगळा. लगाव बत्ती...

मोहोळमध्ये ‘भूमीपुत्र’चं आग्यामोहोळ !

‘अण्णा’ अन् ‘नानां’ची सध्याची अवस्था पाहून ‘दक्षिण’चे ‘दिलीपमालक’ही पुरते टरकलेत. ‘हातात धनुष्य’ घेण्याचा नाद सोडून ते मोहोळच्या दिशेनं देव पाण्यात ठेवून बसलेत. ‘प्रणितीतार्इं’नी जर ऐनवेळी ‘मोहोळ’मध्ये एन्ट्री केली, तर ‘मध्य’मध्ये आपल्याला नक्कीच संधी, या विचारात ते भलतेच खुशीत. मात्र ‘मोहोळ’मध्येही ‘स्थानिक-परकीय’ वादाचं ‘आग्यामोहोळ’ सुरू झालंय. ‘मोहोळच्या जनतेचं एकच सूत्र...उमेदवार हवा भूमीपुत्र’ ही पोस्ट होऊ लागलीय भलतीच व्हायरल. आता हा निशाणा ‘बाहेरून येणाºया तार्इं’वर आहे की ‘आतमध्ये बसलेल्या रमेश भाऊं’साठी याचं उत्तर मिळेलच लवकर. लगाव बत्ती !
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)


Web Title: Who is the son of Goddardant's tea? Anna's maternal grandfather?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.