वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानावरून नवा वाद, भाजपाची टीका, मिळालं असं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:36 AM2024-04-24T11:36:33+5:302024-04-24T12:17:26+5:30

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांच्या एका व्हिडीओमुळे आणखी एक वाद सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये सॅम पित्रोदा हे मुलांना मिळणाऱ्या वडिलोपार्जित संपत्तीवर वारसा कर आकारून त्यातील ५५ टक्के संपत्ती सरकारजमा करण्यााबाबतच्या अमेरिकन कायद्याबाबत भाष्य करताना दिसत आहेत.

Lok Sabha Election 2024: 'Inheritance tax' on ancestral property, Congress senior leader Sam Pitroda's statement, new controversy, BJP criticize, reply received from Congress | वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानावरून नवा वाद, भाजपाची टीका, मिळालं असं प्रत्युत्तर

वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानावरून नवा वाद, भाजपाची टीका, मिळालं असं प्रत्युत्तर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद विवाद होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांकडी संपत्ती काढून ती अल्पसंख्याकांच्या खात्यात जमा करेल, असा दावा केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांच्या एका व्हिडीओमुळे आणखी एक वाद सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये सॅम पित्रोदा हे मुलांना मिळणाऱ्या वडिलोपार्जित संपत्तीवर वारसा कर आकारून त्यातील ५५ टक्के संपत्ती सरकारजमा करण्यााबाबतच्या अमेरिकन कायद्याबाबत  भाष्य करताना दिसत आहेत. पित्रोदा यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने त्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचं धोरण देशाला उद्ध्वस्त करणारं आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. तर काँग्रेसने हे सॅम पित्रोदा यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत हात झटकले आहेत.

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील शिकागो येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, अमेरिकेमध्ये वारसा कर आकारला जातो. जर कुणाकडे १०० दशलक्ष डॉलर एवढी संपत्ती असेल आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्या संपत्तीमधील ४५ भाग हा त्याच्या वारसांना दिला जातो. तर उर्वरित ५५ टक्के संपत्ती ही सरकारजमा होते. हा खूप वैशिष्ट्यपूर्ण कायदा आहे. तुम्ही तुमची संपत्ती जमा केली आहे. आता तुम्ही जात आहात. तर तुम्ही तुमची अर्धी संपत्ती जनतेसाठी सोडली पाहिजे. हा निष्पक्ष कायदा मला खूप चांगला वाटतो.

मात्र भारतामध्ये असं नाही आहे. जर कुणाची संपत्ती १० अब्ज एवढी असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांना ते १० अब्ज रुपये मिळतात. मात्र जनतेला काहीच मिळत नाही. त्यामुळे लोकांनी या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. त्यातून शेवटी काय निष्कर्ष निघेल मला माहिती नाही. मात्र जेव्हा आपण संपत्तीच्या पुनर्वाटपाबाबत बोलत असतो. तेव्हा नवी धोरणं आणि कार्यक्रमांबाबत बोलतो. मात्र ते जनतेच्या नाही तर धनाढ्य शेठजींच्या हिताचे असतात, असे सॅम पित्रोदा म्हणाले.

सॅम पित्रोदा यांच्या या विधानावर भाजपा नेते अमित मालवीय यांनी टीका केली आहे. काँग्रेसने देशाला उद्धवस्त करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. आता सॅम पित्रोदा संपत्तीच्या पुनर्वाटपासाठी ५० टक्के वारसा कराचे सुतोवाच करत आहेत. याचा अर्थ आपण मेहनत आणि कष्टामधून जे काही कमावू, त्यातील ५० टक्के भाग हा काढून घेतला जाईल, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे. दरम्यान, मालवीय यांच्या आरोपांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी टीका केली आहे. पित्रोदा यांनी काँग्रेस हे धोरण अमलात आणणार आहे, असं म्हटलं आहे का? या प्राचीन भूमीवर आता विविध विचारांवरील चर्चा, वादविवादांना परवानगी राहिलेली नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: 'Inheritance tax' on ancestral property, Congress senior leader Sam Pitroda's statement, new controversy, BJP criticize, reply received from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.