शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

By meghana.dhoke | Updated: March 28, 2023 07:34 IST

मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे आणि चित्र आश्वासक आहे!

- मेघना ढोके

मंदिरा बेदीच्या ‘ग्लॅमर’ने गाजलेली एक्स्ट्रा इनिंग ते महिला आयपीएल अर्थात डब्ल्यूपीएलची खरीखुरी ‘इनिंग’ हा २००३ ते २०२३ पर्यंतचा साधारण वीस वर्षांचा प्रवास. मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या क्रिकेट पलीकडच्या ‘एक्स्ट्रा’ मसाल्याच्याच चर्चा रंगल्या होत्या तेव्हा. ताज्या मौसमात आयपीएलमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडू तेव्हा जन्मालाही आलेल्या नसाव्यात. वन-डे क्रिकेटला ‘पैजामा क्रिकेट’ आणि पुढे आयपीएलला ‘मसाला क्रिकेट’ म्हणून नावं ठेवली गेली तेव्हाही आपण कधीतरी आयपीएल खेळू असं स्वप्न पाहणंही यातल्या अनेकींच्या कल्पनेतही नसेल. मुळात क्रिकेट हा पुरुषी खेळ हीच धारणा. कॉमेण्टेटर म्हणून महिला काम करू लागल्या तेव्हाही चर्चा रंगली होती की ‘बायकांना कुठं क्रिकेट कळतं?’ मिड ऑफ-मिड ऑनमधला फरक तरी बायकांना सांगता येईल का, असं म्हणत ही चर्चा कायमच सिली पॉइण्टवर येऊन पोहोचत असे..

तो काळ आणि काल मुंबई इंडियन्सने जिंकलेला पहिलावहिला डब्ल्यूपीएलचा किताब. मुळात देशोदेशीचे खेळाडू रीतसर विकत घ्यायचे आणि त्यातून आयपीएलची जत्रा भरवायची हेच सुरुवातीला अनेकांच्या पचनी पडले नव्हते. त्यात आयपीएलचे स्वरूप टोकाचे प्रोफेशनल, ‘हायर ॲण्ड फायर’ तत्त्वावर चालणारे! खेळाडूंवर कोट्यवधीच्या बोली लागल्या, प्रक्षेपणासह जाहिरातींचे बजेट काही कोटी रुपयांच्या घरात पोहोचले म्हणून टीकाही झाली. मात्र, दुसरीकडे हेही पाहायला हवे की आयपीएलने क्रिकेट मोठ्या शहरांतून आधी लहान शहरांत आणि पुढे गावांपर्यंत झिरपत नेले. गावखेड्यातले खेळाडू किमान आयपीएलचे तरी स्वप्न पाहू लागले.

तेच चित्र महिला आयपीएलच्या निमित्तानेही दिसले. आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक असलेल्या काही हजार मुलींनी यंदा अर्ज केले होते. त्यातल्या काहीच निवडल्या गेल्या, त्यापैकी काहींनाच उत्तम पैसे मिळाले. विदेशी महिला खेळाडूही नियमाप्रमाणे संघात दाखल झाल्या. प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकपदीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचीच नियुक्ती झाली. एरव्ही पाहायला (पुरुष क्रिकेटच्या) तुलनेत अत्यंत संथ वाटणारे महिला क्रिकेट या पहिल्याच मौसमात वेगवान होताना दिसले. इसाबेल वांगने केलेल्या हॅटट्रिकपासून ते ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अत्यंत चपळ, प्रोफेशनल खेळापर्यंत, हरमनप्रीतचे नेतृत्व ते दीप्ती शर्मा, राधा यादव यांच्यासह अनेकींनी केलेली उत्तम कामगिरी ही या मौसमाची जमेची बाजू ठरली.  प्रोफेशनल-वेगवान क्रिकेटची झलक, तंत्रशुद्ध फटके आणि क्रिकेटचे नजाकतदार सौंदर्यही या मौसमात दिसले. क्रिकेट हे ‘क्रिकेट’ आहे असे वाटावे आणि खेळाडू बाई आहे की पुरुष याचा विसर पडावा असे काही मोजके सुंदर क्षण या महिला आयपीएलने दिले.

अर्थात, काही ठिकाणी नवखेपणाही दिसलाच. प्रोफेशनल क्रिकेट ‘पाहण्याची’ सवय असलेल्या प्रेक्षकांना काही गोष्टी खटकल्या. नावाजलेल्या खेळाडूंनी केलेल्या अत्यंत क्षुल्लक चुका, रन आऊट होतानाचे घोळ, प्रेशर हाताळताना उडालेली दाणादाण, त्यातून झालेल्या चुका हे फार होते. तिथे सुधारणेला प्रचंड वाव आहे. पुरुष खेळाडूंएवढा मेहनताना घेता तर क्रिकेटही त्याच दर्जाचे खेळा हा आग्रह महिला खेळाडूंकडे भविष्यात धरला गेला तर तोही काही अनुचित ठरणार नाही. तरीही ‘पहिला’ हंगाम, पहिल्यांदाच खेळवण्यात आलेली महिला क्रिकेटपटूंची मोठी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंनी सिद्ध केलेला आपला दर्जा हे सारेच ‘कमाई’च्या यादीत नोंदवले पाहिजे. या अनुभवाचा फायदा घेऊन भारतीय महिला क्रिकेट संघ मोठी आयसीसी स्पर्धा, विश्वचषकात आजवर झालेल्या हाराकिरीवर मात करेल आणि त्यासोबतच महिला क्रिकेटमध्ये अधिक पायाभूत सोयी येतील, दर्जा अधिक उत्तम होईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे..  पहिला मौसम तरी ‘हिट’ ठरला हे नक्की.

टॅग्स :Women’s Premier Leagueमहिला प्रीमिअर लीगIndiaभारत