यांचा बोलविता धनी कोण ?
By Admin | Updated: August 12, 2014 01:39 IST2014-08-12T01:39:29+5:302014-08-12T01:39:29+5:30
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपाला १२२, शिवसेनेला ८५ आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला फक्त ५५ जागा मिळतील, असे भाकीत एका खासगी दूरचित्रवाहिनीने परवा राज्याला ऐकविले
यांचा बोलविता धनी कोण ?
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजपाला १२२, शिवसेनेला ८५ आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला फक्त ५५ जागा मिळतील, असे भाकीत एका खासगी दूरचित्रवाहिनीने परवा राज्याला ऐकविले. आपण भाडेतत्त्वावर कामाला लावलेल्या एका एजन्सीने घेतलेल्या सर्वेक्षणावर ते भाकीत आधारले असल्याचे तिने सांगितले. त्या आकडेवरील चर्चा अर्थातच गरमागरम झाली. काँग्रेसचा संताप झाला, राष्ट्रवादी थिजले होते, भाजपा जोरात होती आणि शिवसेनेला हातचे काही निसटल्याचे जाणवलेले त्या चर्चेत दिसत होते. चर्चेत तज्ज्ञ म्हणून बोलावलेला पत्रकार नुसतेच गुळमुळीत आणि जमेल तेवढे निरर्थक बोलत होता. ‘तुम्हाला या आकडेवारीविषयी काय वाटते’ या प्रश्नाचे त्या साऱ्यांकडून येणारे उत्तर त्यांनी न सांगताही समजण्याजोगे होते. अशी चर्चा जेवढी वादळी आणि जेवढी अर्थशून्य व्हायची तेवढीच ती झाली. कारण या चर्चेच्या मुळाशी असलेला व चर्चेचे सत्यासत्य उलगडणारा महत्त्वाचा प्रश्न त्यातल्या कोणी पुढे आणला नाही. कदाचित माध्यमांच्या भीतीचे राजकारणी माणसांवर असलेले दडपण हे त्याचे कारण असावे. देशातल्या बहुसंख्य वाहिन्या आता विकल्या गेल्या आहेत. कोणत्या वाहिनीचा मालक कोण, हे साऱ्यांना सांगता येणारे आहे. सगळ्या वाहिन्यांच्या खऱ्या सूत्रधारांची व त्यांची ज्या पक्षाशी आणि पुढाऱ्यांशी लगट आहे, त्यांची माहितीही साऱ्या देशाला आता झाली आहे. त्यामुळे चर्चेला आलेला एखादा तरी चर्चक वा तो निरर्थक भाष्यवाला पत्रकार त्या वाहिनीच्या प्रमुखाला किंवा अँकरमनला ‘तुमचा बोलविता धनी कोण आणि त्याचे सत्तारूढ पक्षाशी संबंध कसे’ हा प्रश्न विचारील, असे वाटले होते. तो विचारला असता, तर अशा चर्चेमागचे खरे इंगितच लोकांसमोर आले असते. कोणती वाहिनी कोणाच्या खिशात आहे, कोणत्या माध्यमावर कुणाचा वरदहस्त आहे आदी प्रश्नांच्या उत्तरातून अशा सगळ्या आयोजनामागचे सूत्र समजणारे असते. गेल्या काही महिन्यांत प्रस्थापित माध्यमांमधून कोणती माणसे बाहेर पडली आणि ते गेल्यानंतर त्या वाहिन्यांची कमी झालेली विश्वसनीयता आणि त्यांनी गमावलेला प्रेक्षकवर्ग केवढा, हे प्रश्न या वाहिन्यांनाही कधी तरी विचारायचे की नाही? की त्यांचे मुखंड जे सांगतील त्याच्या खरेखोटेपणाची शहानिशाही न करता त्यावर उगाच केलेल्या बडबडीसारखी भाष्ये करायची? तुम्हाला मिळालेली आकडेवारी खरी कशी, ती आणणारी एजन्सी कितपत विश्वसनीय, तिला काम देणारे तुमचे उद्योगपती कोणते, त्यांचे सरकारातील व विरोधी पक्षातील कोणत्या पुढाऱ्याशी असलेले संबंध लाडाचे आणि कोणाशी गोडाचे? या साऱ्यातली मोठी अडचण ही की गेल्या चार निवडणुकांत निकालाची अशी भाकिते वर्तविणारी माध्यमे आणि त्यांच्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या सगळ्या यंत्रणा तोंडावर आपटल्या आहेत. २००४ पासून आतापर्यंत झालेल्या एकाही निवडणुकीत या सर्वेक्षणांना आणि ते आखणाऱ्या यंत्रणांना सत्याच्या आसपासही पोहोचता आलेले कधी दिसले नाही. तरीही त्यांचे आकडे खरेच आहेत, असे समजून जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा ती जनतेएवढीच प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणाऱ्यांचीही दिशाभूल करणारी असते की नाही? देशातील किती दूरचित्रवाहिन्या स्वतंत्र, नि:पक्ष व तटस्थ भूमिका जपणाऱ्या आणि सत्य तेच सांगणाऱ्या आहेत? त्यातल्या प्रचारकी कोणत्या आणि विचारकी कोणत्या हा प्रश्न आपणही त्यांना कधी विचारायचा की नाही? अमेरिकेत १९४८ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हॅरी ट्रूमन आणि जॉन ड्युई हे दोन तुल्यबल उमेदवार उभे होते. जॉन ड्युईचा शिक्षणतज्ज्ञ म्हणून बोलबाला मोठा होता आणि तेच अध्यक्षपदी निवडून येतील, असे बहुसंख्य माध्यमांना आणि सर्वेक्षकांनाही वाटत होते. या साऱ्यांवर विश्वास ठेवणाऱ्या एका दैनिकाने निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच अमेरिकेच्या अध्यक्षपदी जॉन ड्युई असे मोठे शीर्षक देऊन तशी बातमीच प्रकाशित केली. प्रत्यक्ष निकाल आला तेव्हा जॉन ड्युई बऱ्याच मतांनी पराभूत झाले होते आणि हॅरी ट्रूमन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडले गेले होते. ड्युईची बातमी देणारे ते वर्तमानपत्र आपल्या जनतेला दाखविणारे हॅरी ट्रूमन यांचे भलेमोठे छायाचित्र मग इतर वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. परिणामी, त्या वर्तमानपत्राची देशभर एवढी फटफजिती झाली की त्याने आपले प्रकाशनच तत्काळ बंद केले. भारतातला मतदार उदार हृदयी आणि क्षमाशील असल्यामुळे तो माध्यमांचे असले चाळे खपवून घेतो, एवढेच येथे नोंदविण्याजोगे.