माणसांना निर्बुद्ध, लाचार बनवण्याचे कारस्थान कोण रचते आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:08 AM2023-08-09T08:08:04+5:302023-08-09T08:08:23+5:30

धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली इव्हेंट चालविणाऱ्या नवनवीन बाबांचा उदय हाेत असून, त्यांच्या दरबारात उच्चशिक्षित पण विवेकशून्य लोकांचा ओढा वाढताेच आहे..

Who is plotting to make people stupid and helpless? | माणसांना निर्बुद्ध, लाचार बनवण्याचे कारस्थान कोण रचते आहे?

माणसांना निर्बुद्ध, लाचार बनवण्याचे कारस्थान कोण रचते आहे?

googlenewsNext

- राजेश शेगोकार, वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर

‘व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले’
- भारताचे चंद्रयान चंद्रावर उतरण्याच्या तयारीत असताना राज्यभरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गाेष्टी एकामागाेमाग समाेर आल्या आणि कुसुमाग्रजांची ही ओळ आठवली. विज्ञानवादी दृष्टिकाेन अन् बुद्धिप्रामाण्यवादाचा कितीही प्रचार प्रसार झाला तरी समाजाला परत कृतिशून्य, निर्बुद्ध, लाचार बनविणारी यंत्रणा  दिवसेंदिवस बळकट हाेत असून या कारस्थानाला उच्च विद्याविभूषित लाेकही बळी पडत असल्याचे पावलाेपावली समाेर येत आहे.  पुण्यातील एक सोफ्टवेअर इंजिनअर घरातील दाेष दूर करण्यासाठी मांत्रिकाच्या आहारी जाताे, भंडारा जिल्ह्यातील  शिवमंदिरातील नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची वावडी उठते, बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी चक्क महामृत्युंजय यंत्राचीच स्थापना हाेते; त्यापाठोपाठ हे कमी की काय असे वाटावे, असा प्रसंग थेट संभाजीनगरच्या विद्यापीठात उभा राहताे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पी.जी. डिप्लोमा इन वास्तुशास्त्र अँड न्यूमरॉलॉजी विषय मंजुरीसाठी समाेर येताे..! अशा एक ना अनेक घटना!

म्हणजे अनेकानेक संत, महात्मे व महामानवांनी आयुष्यभर अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, नशीब, फलज्योतिष, यावर घणाघाती घाव केले, हयातभर लोकांच्या डोळ्यांत बुद्धिप्रामाण्यवादाचे झणझणीत अंजन घातले ते व्यर्थच गेले म्हणायचे का?  ज्या काळात  संतांनी  प्रबोधन केले, तो काळ खरंतर शिक्षणाच्या प्रसाराचा नव्हताच मुळी. किंबहुना लौकिकदृष्ट्या हे संत तसे ‘शिक्षित’ही नव्हतेच; पण ते विवेकी होते. कालौघात लोक शिकले. विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर वाढलासुद्धा. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांनी अंगीकारला का? अलीकडच्या काळात अंधश्रद्धांचे प्रमाण कमी होण्याऐवजी  आधुनिक अंधश्रद्धांचा शिरकाव झाल्याचे दिसते. धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली इव्हेंट चालविणाऱ्या नवनवीन बाबांचा दिवसेंदिवस उदय हाेत असून त्यांच्या दरबारात  उच्चशिक्षित पण विवेकशून्य लोकांचा ओढा वाढताेच आहे.  यापूर्वी ‘इग्नू’- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने ‘ज्योतिषशास्त्र’ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, आता पंजाब तसेच बनारस  विद्यापीठात पीजी डिप्लोमा इन वास्तुशास्त्र अँड न्यूमराॅलाॅजी हा अभ्यासक्रम आहे असा दाखला देत तसेच एनईपीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतीय शास्त्रातील अभ्यासक्रमांपैकी एक अभ्यासक्रम असल्याचा दावा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत हाच विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सिनेटच्या काही विवेकवादी सदस्यांनी त्याला जाेरदार विराेध केल्याने हा प्रयत्न हाणून पडला; पण हे प्रकार भविष्यात समाेर येणार नाहीतच असे नाही.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आणि चिकित्सक वृत्ती हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट केले असताना त्यांचेच नाव धारण करणाऱ्या विद्यापीठाने वास्तुशास्त्रातील शुभ- अशुभ दिशा, फलज्याेतिष्य अशा अभ्यासक्रमांचा हट्ट धरणे  दुर्दैवी आहे. समाजातील अंधश्रद्धा कमी होण्याकरिता मूलभूत विज्ञान व विज्ञानाचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षणाद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. काही प्रमाणात त्यात यशही आले आहे. त्यामुळे अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या अशा विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्यास  कर्तृत्ववान पिढी घडेल की दैववादी ? विज्ञानाचा प्रसार- प्रचार करण्याची जबाबदारी असलेले व्यवस्थापन व अध्यापकच स्वतः अंधश्रद्ध विचारांच्या प्रभावात असतील, तर विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानवाद पाेहोचणार कसा? 

माणसाचे जगणे सुसह्य करण्यासाठी शास्त्रज्ञांनी  आयुष्य वेचले, त्यांच्या कामाच्या आधारावर मानवाने प्रगती केली; पण विज्ञान म्हणजे नेमके काय, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे रुजविण्यात आपण अपयशी ठरलाे का?  प्रतिगामी विचारांना पुन्हा बळ देण्यासाठी  पावला-पावलावर विज्ञानाचा वापर करणाऱ्या विद्यापीठासारख्या यंत्रणा, अभियांत्रिकीचे उच्च विद्याविभूषित पदवीधर अन् अजूनही दुधाचा तांब्या घेऊन  देवाला दूध पाजण्यासाठी मंदिराकडे धाव घेणारी मंडळींची वाढती संख्या अन्य कशाचे लक्षण म्हणायचे?
    - rajesh.shegokar@lokmat.com

Web Title: Who is plotting to make people stupid and helpless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.