कोण म्हणते, माणूस फक्त ‘साधन’ आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:13 AM2021-07-12T08:13:42+5:302021-07-12T08:14:32+5:30

‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

who is human article by sadguru founder of isha foundation | कोण म्हणते, माणूस फक्त ‘साधन’ आहे?

कोण म्हणते, माणूस फक्त ‘साधन’ आहे?

Next
ठळक मुद्दे‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

सदगुरू,ईशा फाउंडेशनचे संस्थापक

आपल्याकडे “ह्युमन रिसोर्स” अशी एक संकल्पना वापरली जाते. मानव संसाधन. पण खरे पाहता माणूस फक्त एक ‘साधन’  असू शकतो का? त्याला साधन मानावे का ? खरे पाहता साधन म्हणजे काय? ज्याचे गुणधर्म आणि क्षमता आधीच माहिती असतात, अशी  एखादी वस्तू अगर कौशल्य! ते एक परिमाण आहे. माणूस म्हणजे परिमाण नव्हे, माणूस ही एक शक्यता असते. एखादा माणूस  वैयक्तिकरीत्या किती उंचीवर  जाईल, हे मुळात आपण त्या शक्यतेचा किती उलगडा करतो यावर अवलंबून असते. 

एका जिवंत व्यक्तीला ‘साधन’ मानले जाते, कारण ती व्यक्ती हाताळणाऱ्या वरिष्ठांना निश्चितता हवी असते. शक्यतो अनपेक्षित असे काही घडलेले त्यांना नको असते. म्हणून मग ते व्यक्तीला ‘रिसोर्स’ बनवतात आणि अनपेक्षित शक्यता खुडून टाकतात, नष्ट करतात.

प्रत्येक माणूस कोण असतो ? - एक बी! त्याला योग्य सुपीक जमीन मिळाली की, ते बी स्वतःच्या क्षमता ओळखते. मातीत पेरले, तर  एक बीज संपूर्ण पृथ्वी हिरवीगार करू शकते, अन्यथा ते जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते. तेच माणसाच्या बाबतीत नाही का?  ‘हे केवळ एक साधन आहे’  असा विचार केला गेला, तर त्या माणसात दडलेल्या प्रतिभेचा कधीच उलगडा होणार नाही. म्हणजे मग तुम्ही एका विमानाची  ऑटोरिक्षा बनविणार. जो तुम्हाला उंचीवर नेऊ शकला असता, तो माणूस तुमच्यामुळेच जेमतेम रस्त्यावर चालण्याच्या लायकीचा उरणार!

मूल जन्माला येते, तेव्हा तुम्हाला माहीत नसते, की ते साधू होणार, की जादूगार किंवा एक सम्राट! हे मूल भोवतालातून काय ग्रहण करील, तुम्ही त्याचे पालनपोषण कसे कराल, यावर ते अवलंबून  असेल. त्या मुलाला तुम्ही  एक सकारात्मक, कार्यक्षम शक्यता म्हणून विकसित कराल, की एक नकारात्मक, अकार्यक्षम अडथळा बनवाल, यावर बरेच काही ठरेल.

व्यवसायाची गरज म्हणून तुम्ही माणसे हाताळता, तेव्हा त्यांच्यातून उत्तम ते बाहेर कसे काढता येईल, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एखादा मनुष्य आनंदी अवस्थेत असतो, तेव्हाच तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोत्तम कार्य करतो, हे शास्त्र-पुराव्याने सिध्द झालेले आहे. पण आज दुर्दैवाने कामाची सर्व ठिकाणे तणावपूर्ण बनली आहेत.  दडपण नसेल, तर लोक कामच करत नाहीत, असा विचित्र समज तयार झाला आहे. अत्यंत तणावग्रस्त असताना साधा तव्यावरचा  डोसा उलटायला जाल, तरीही  तो जमिनीवर उलटून पडेल. अशा अवस्थेत तुम्हाला डोसा करता येणार नाही, नीट गाडी चालवता येणार नाही. पण निवांत, सतर्क आणि आनंदी  असाल, अवस्थेत असता, तेव्हा तुम्ही याच गोष्टी अगदी सहजपणे करू शकाल.

जिथे प्रत्येकाला त्याचे  सर्वोत्तम प्रयत्न करावेसे वाटतील, असे वातावरण तयार करणे, हेच नेत्यांचे काम आहे. एकदा हे साधले, की मग ‘माणसांचे व्यवस्थापन करण्याची’ गरजच पडत नाही. सर्वोत्कृष्ट गोष्टी सहज घडतात. हा महामारीचा अत्यंत अनिश्चित काळ आहे. अशावेळी, तुमच्या आजुबाजूला कोणत्या मनोवृत्तीची, कोणत्या स्वभावाची माणसे आहेत, याने खूप फरक पडतो. तुमच्यासाठी सर्वोत्तम ते द्यायला सतत तयार असलेले, तुम्ही त्यांच्यावर सहज विश्वास टाकू शकाल असे,  सकारात्मक स्वभावाचे आनंदी सहकारी तुमच्याबरोबर चालत असतील, तर  त्यांच्या आधाराने या अनिश्चिततेच्या काळातून तरून  जाणे सहजशक्य आहे. 

कोणी तुमच्या वाटेतला अडथळा बनत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये ही नकारात्मकता कुठून आणि का आली असेल, याचा विचार केला, तर कदाचित त्याच्या/तिच्या मनाच्या गाठी सोडविण्याची वाट सहज सापडू शकेल... तसे प्रयत्न करा, हाच या अनिश्चित काळाचा सांगावा आहे.

Web Title: who is human article by sadguru founder of isha foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.