शत्रूचा ‘शत्रू’ तो आपला कोण?
By Admin | Updated: November 14, 2015 01:02 IST2015-11-14T01:02:25+5:302015-11-14T01:02:25+5:30
यशाची एक वेगळीच गंमत असते. त्यातून निवडणुकीतील यशाची गंमत तर आणखीनच और. जेव्हां एखाद्या पक्षाला अगदी घवघवीत म्हणजे अपेक्षाही केले नसेल असे यश लाभते तेव्हां या यशाचा शिल्पकार

शत्रूचा ‘शत्रू’ तो आपला कोण?
यशाची एक वेगळीच गंमत असते. त्यातून निवडणुकीतील यशाची गंमत तर आणखीनच और. जेव्हां एखाद्या पक्षाला अगदी घवघवीत म्हणजे अपेक्षाही केले नसेल असे यश लाभते तेव्हां या यशाचा शिल्पकार म्हणून कोणाचा ना कोणाचा उदोउदो सुरु होतो. त्याने वॉररुम कशी तयार केली, प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्यासाठी जाळे कसे विणले, अत्याधुनिक तंत्राचा वापर कसा केला इत्यादि इत्यादि वर्णने केली जातात. अशा शिल्पकरांमध्ये मग कधी प्रमोद महाजन असतात, कधी अमित शाह असतात, कधी रिडिफ्युजन नावाची विदेशी संस्था असते तर कधी प्रशांत किशोर हे नाव पुढे येते. यश सदोदीत क्षणभंगुरच असल्याने यशानंतर जेव्हां अपयशाला सामोरे जाणे भाग पडते तेव्हां वॉररुमचे काय होते, अमित शाह यांची चाणक्यी चतुराई कुठे जाते, याचा कुणी उल्लेखदेखील करीत नाही. पुन्हा ‘यशाचे अनेक बाप’ या उक्तीप्रमाणे जो तो स्वत:कडेच श्रेय घेण्यासाठीदेखील धडपडत असतो. या उक्तीचा उत्तरार्ध म्हणजे ‘अपयश नेहमी अनाथ असते’! परंतु बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ज्याला दुर्गती म्हणता येईल असे जे अपयश भाजपाच्या पदरी पडले, ते मात्र अनाथ नसावे आणि त्याला अनेक बाप असावेत असे केवळ माध्यमीय बातम्यांवरुन नव्हे तर सैरभैर झालेल्या संघादि परिवारातील हालचालींवरुन आणि वक्तव्यांवरुनही समजून येऊ लागले आहे. सरसंघचालक मोहन भागवतांना अपयशाचे धनी मानावे, पदाच्या प्रतिष्ठेस न मानवणारी वक्तव्ये केल्याबद्दल पंतप्रधानांकडे बोट दाखवावे, समाजात उभी फूट पाडणारे वक्तव्य केल्याबद्दल अमित शाह यांना तापल्या तव्यावर उभे करावे, व्ही.के.सिंह यांच्यापासून मंत्रिमंडळातील अनेक बोलभांड मंत्री आणि भाजपातील तितक्याच वाचाळ नेत्यांना वेसण घालावी की बिहारी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना सुळावर चढवावे याबाबत मात्र परिवारात एकवाक्यता दिसत नाही. कदाचित पराभवाला आणखीही काही कारणे असावीत असे परिवाराला वाटत असावे. पण म्हणून यात काही सुधार होईल अशी चिन्हे मात्र दिसत नाहीत. याचा प्रत्यय भाजपाचे विख्यात चिटणीस विजयवर्गीय यांनी आणूनही दिला. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना मोटारीमागून धावणाऱ्या चतुष्पादाची उपमा दिली. याच उपमेचा वपार करायचा तर या चतुष्पादाचे पुच्छ कितीही प्रयत्न केले तरी सरळ होत नाही हा तर प्राणीशास्त्राचा सिद्ध निष्कर्षच आहे! स्वत: शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांची गळाभेट घेतल्यानंतर भाजपाच्या पराभवाची कठोर समीक्षा झाली पाहिजे अशी मागणी करुन जे कोणी पराभवास जबाबदार असतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. हिन्दी सिनेमातल्या पदार्पणातील त्यांच्या ‘खिलौना’ या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका अदा केली होती. नंतर नायक होण्याचे त्यांचे प्रयत्न हिन्दी सिनेमात फारसे फळाला आले नाहीत. त्यामुळे हिन्दी सिनेसृष्टीचा बदला घेण्यासाठी म्हणून की काय बिहारच्या निवडणुकीत त्यांना भाजपाचे ‘लोकनायक’ होण्याची तीव्र इच्छा होती. पण भाजपावाल्यांनीही त्यांच्या इच्छेची पत्रास बाळगली नाही. परिणामी ते एकदम महाभारतातील शल्याच्या भूमिकेत शिरले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी वारंवार नितीशकुमार यांची तळी उचलून धरली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सूचक पद्धतीने थेट मोदींवर शरसंधान केले. पण भाजपाने त्याकडेही दुर्लक्ष केले. दुर्लक्ष करण्यामागे सिन्हा यांना त्यांची जागा दाखवून देण्याच्या उद्देशापेक्षा पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधला अहंभाव आणि सत्तेतून निर्माण झालेला उद्दामपणा अधिक कारणीभूत होता. पण अपयश आले म्हटल्यावर कोणाला ना कोणाला तरी बळीचा बकरा बनवायलाच हवा या नियमाने शत्रुघ्न सिन्हा शत्रूचे मित्र असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उफाळून वर आली. पण तूर्तास काहीच करायचे नाही, कोणावरही कारवाई करायची नाही, असा काहीतरी निर्णय पक्षाने घेतल्याचे सांगितले गेले. तेही साहजिकच आहे म्हणा. कारण अरुण जेटली कितीही म्हणत असले तरी मोहन भागवत यांनी भलत्या वेळी भलत्या विषयाला तोंड फोडले आणि त्यामुळेच मोठा वर्ग भाजपापासून दूर गेला असे भाजपातीलच अनेकांचे अनुमान आहे. याचा अर्थ भागवतांवर वा अमित शाह यांच्यावर कारवाई करता येणे शक्य नसल्याने शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील ती होणार नाही हे उघड आहे. एकूणात भाजपाच्या अपयशाला असे अनेक बाप असल्याचे त्या पक्षाला स्वत:लाच दिसत असले (सन्माननीय अपवाद, अडवाणी, जोशी, यशवंत सिन्हा, शांताकुमार) तरी ठरल्याप्रमाणे येथेही ते अनाथच राहणार असे दिसते. तथापि अशा साऱ्या मांडणीत नेहमीच जाणवणारी मौजेची बाब म्हणजे जो मतदार रातोरात रावाला रंक आणि रंकाला राव करुन टाकतो त्याला जणू साऱ्यांनीच गृहीत धरलेले असते. त्यांच्यात मग देशातील निवडणूकपूर्व चाचण्या आणि मतदानोत्तर सर्वेक्षणं करणारेही येतात. असे सारे सर्वेक्षक आणि त्यांचे अहवाल यांच्यातील पूर्णपणे उडून गेलेली हवा लक्षात घेता, हे लोक ‘रोगनिदान’ करु शकत नाहीत तर केवळ विच्छेदन करु शकतात असेही म्हणायला आता काही हरकत नाही.