मुले नको असणारे, लवकर निवृत्तीची घाई झालेले 'डिंकर' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 05:47 IST2026-03-27T05:47:02+5:302026-03-27T05:47:28+5:30

डबल इन्कम, नो किड्स, अर्ली रिटायरमेंट - म्हणजे डिंकर! या 'नव्या' जीवनशैलीचे वर्तमानात फायदे असले तरी भविष्यातल्या आव्हानांचे काय ?

who are the dinkers who do not want children and are in a hurry to retire early | मुले नको असणारे, लवकर निवृत्तीची घाई झालेले 'डिंकर' कोण?

मुले नको असणारे, लवकर निवृत्तीची घाई झालेले 'डिंकर' कोण?

गेल्या काही वर्षांत अनेक जोडपी आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्याला, आर्थिकदृष्ट्या विशिष्ट स्तर गाठण्याला प्राधान्य देतात, ते करताना कौटुंबिक स्तरावर मात्र मूल नको, जबाबदारी नको असा त्यांचा विचार असतो. दोघेही चांगले 'पॅकेज' मिळवत असल्यामुळे घरात 'डबल इन्कम' असते. मात्र, मूल नको असे ठरवणाऱ्या जोडप्यांना 'डिंक' (डबल इन्कम, नो किड्स) म्हटले जाते. शहरी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये ही संकल्पना रूढ होत आहे.

वाढती महागाई, मुलांच्या संगोपनाचा खर्च, त्यासाठी काढावा लागणारा वेळ, करिअरमधली जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून उद्भवणारे ताणतणाव या आणि अशा अनेक कारणांमुळे अनेक जोडपी विचारपूर्वक निर्णय घेऊन मूल नको म्हणत आहेत. काही जण मूल जन्माला घालण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात, जेणेकरून लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांचे ओझे कमी करता येईल. पुणे, बंगळुरूसारख्या शहरांमध्ये आयटी, फायनान्स, मॅनेजमेंट अशा क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्यांवर काम करणाऱ्या तरुणांमध्ये 'डिंक' विचारसरणी वाढीस लागत लागत आहे.

याचीच पुढची पायरी म्हणजे लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या पुरेसे किंवा प्रसंगी गरजेपेक्षा जास्त सक्षम होऊन, त्या कमाईतून पुरेशी गुंतवणूक करून निवृत्तीच्या वयाच्या रूढ वयाच्या आधीच निवृत्त होणे. साधारण २००० नंतर आणि विशेष करून २०१० च्या दशकात 'डिंक' आणि 'डिंकर' सारख्या संकल्पना प्रामुख्याने जोर धरू लागल्या. घसघशीत पगाराच्या नोकऱ्या, त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपभोग घेत काटेकोर बचत करणे, त्या बचतीतून शिस्तबद्ध गुंतवणूक करणे यातून आर्थिक स्वातंत्र्याकडे वेगाने वाटचाल करण्याचा मार्ग अनेकजण चोखाळतात. 

या वाटचालीत मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, त्यातून वेगाला बसणारी खीळ नको म्हणून 'मूल नको' हा पर्यायही स्वीकारण्यात येतो. मुले असती तर त्यांच्यावर जो पैसा खर्च करण्यात आला असता तो गुंतवण्याचा मार्ग निवडला जातो, त्यामुळे डबल इन्कममधील एक मोठी रक्कम शिल्लक पडते. त्यामुळे लवकर निवृत्त होण्याकडे, निवृत्तीनंतर छंद जोपासणे किंवा मनासारखे आयुष्य जगणे शक्य होते. त्यामुळे 'डिंकर' जीवनशैलीकडे अनेकांचा कल वाढताना दिसतो.

या नव्या प्रकारच्या जीवनशैलीमुळे यश, सुख, समाधान या कल्पनाही वेगळ्या वळणाने जाताना दिसतात. पारंपरिक कुटुंब, मुलांच्या जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी मागे पडतात. त्यामुळे भौतिक सुखाच्या गोष्टी साध्य करणे जास्त सहज सोपे होते. 

'अर्ली रिटायरमेंट' हा 'डिंकर' जीवनशैलीचा एक प्रमुख फायदा असला तरी या रिटायरमेंटचा अर्थ सर्वार्थाने काम बंद करणे असा नसून आर्थिक प्राप्तीच्या मागे न धावता आवडीच्या गोष्टी करायला मिळतील असे काम शोधणे, त्याव्यतिरिक्त प्रवास करणे किंवा ताणतणाव कमी करणारे छंद जोपासणे या गोष्टी केल्या जातात. सध्याच्या कामाच्या पद्धतीतून येणारे ताणही तरुण जोडप्यांचा जीव नको करून टाकतात. सततची असुरक्षितता आणि एकूण गंभीर होत चाललेले पर्यावरणीय संकट याचीही या ताणात भरच पडते. आपलेच काही खरे नाही, तर मूल कशाला?- या प्रश्नाला उत्तर मिलत नाही. मात्र अशा जीवनशैलीत पुढे जाऊन जोडीदार किंवा पालक यांच्या मागे एकटे पडणे, तो एकटेपणा हाताळण्यासाठी काही व्यवस्था करावी लागणे असे पैलूही असतात. थोडक्यात, अशा जीवनशैलीचे वर्तमानात काही फायदे असले तरी भविष्यात त्याची नेमकी काय किंमत चुकवावी लागणार, याचा अंदाज तिची निवड करणाऱ्यांना असेलच असे नाही.
 

Web Title : डिंक्स और जल्दी सेवानिवृत्ति: बच्चे रहित जोड़े वित्तीय स्वतंत्रता को प्राथमिकता देते हैं

Web Summary : डिंक्स (डबल इनकम, नो किड्स) करियर और वित्तीय स्थिरता को प्राथमिकता देते हैं, पितृत्व से बाहर निकलते हैं। बढ़ती लागत और करियर के दबाव से प्रेरित होकर, वे बचत और निवेश के माध्यम से जल्दी सेवानिवृत्ति का लक्ष्य रखते हैं, स्वतंत्रता और व्यक्तिगत गतिविधियों की तलाश करते हैं। हालाँकि, भविष्य में संभावित अकेलेपन पर विचार करना आवश्यक है।

Web Title : DINKs and Early Retirement: Childless Couples Prioritizing Financial Freedom

Web Summary : DINKs (Double Income, No Kids) prioritize careers and financial stability, opting out of parenthood. Driven by rising costs and career pressures, they aim for early retirement through savings and investments, seeking freedom and personal pursuits. However, potential future loneliness needs consideration.