कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 08:36 IST2025-12-17T08:35:45+5:302025-12-17T08:36:22+5:30
स्क्रीनशी नातं सांगणाऱ्या आजच्या मुलांची सहनशीलता कमी झाली आहे. किरकोळ वाद टोकाला जातात. यासाठी मुलांच्या भावनिक बदलांकडे लक्ष द्यावे लागेल.

कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
सचिन कापसे
वृत्तसंपादक, लोकमत, पुणे
राजगुरुनगर येथे सोमवारी शिकवणी वर्गात दहावीच्या एका विद्यार्थ्यांकडून दुसऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. हा केवळ स्थानिक पातळीवरील गुन्हा नसून ती संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी घटना आहे. शिक्षण ही प्रगती, सुरक्षितता, सकारात्मकता आणि उज्ज्वल भविष्यासाठीची प्रक्रिया मानली जाते. मात्र, अशाच शिकवणी वर्गात घडलेली ही हिंसक घटना मुलांच्या बदललेल्या भयावह मानसिकतेचे दर्शन घडवते. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वात जास्त काम शाळकरी मुलांच्या मानसिक आरोग्यावर करावे लागणार आहे. अगदी किरकोळ वाद मनात ठेवून एखाद्याला संपवण्याचा विचार कोवळ्या वयात गडद होत जातो, हे गंभीर आहे. ही घटना शिक्षणव्यवस्था, समाज आणि पालकांना गंभीर विचार करायला लावणारी आहे.
स्पर्धेच्या युगात आता शिकवणी वर्ग हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. शाळा किंवा महाविद्यालयातून मिळणारे शिक्षण अपुरे आहे, अशा भावनेपोटी पालकच मुलांना शिकवणी वर्गात पाठवतात. परिणामी, हे वर्ग केवळ अभ्यासाचेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक आयुष्याचेही केंद्र बनतात. तिथे मुलांमध्ये मैत्री जुळते आणि शाळांच्या पलीकडे जाऊन पुन्हा एक नवी स्पर्धाही निर्माण होते.
विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा, परीक्षांचा, करिअरचा आणि अपेक्षांचा प्रचंड दबाव असतो. या दबावातून राग, नैराश्य, असुरक्षितता आणि हिंसक प्रवृत्ती वाढू लागते. शिकवणी वर्गामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र असते. गुण, तुलना, थट्टा-मस्करी किंवा अपमान यातून वैयक्तिक संघर्ष निर्माण होतात. योग्य समुपदेशन, संवाद आणि भावनिक आधार नसल्यास असे संघर्ष टोकाला जाऊन हिंसक वळण घेतात. राजगुरूनगरमध्येही नेमकं हेच घडलं.
तीन महिन्यांपासून शिकवणी वर्गातील मित्राबद्दल मनात ठेवलेला राग हिंसेत परावर्तित झाला आणि अवघ्या १६ वर्षाच्या पुष्कर शिंगाडेला आपला जीव गमवावा लागला. कोवळ्या वयातील त्या मारेकरी मुलाला एवढं क्रूर बनवलं ते फक्त त्याच्या रागानं आणि रागाला कंट्रोल कसं करायला हवं, हे न शिकवणाऱ्या व्यवस्थेनं. ही खरेच काळजी करण्याची गोष्ट आहे.
स्क्रीनशी नातं सांगणाऱ्या आजच्या शाळकरी मुलांची सहनशीलता कमी आहे. किरकोळ वाद, गैरसमज किंवा अहंकाराचे प्रश्न या पिढीला अस्वस्थ करतात. त्यातून पुढे हिंसेच्या घटना घडतात. देशात २०२२ मध्ये १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांवर गंभीर गुन्हे नोंदवले गेले होते. २०२३ मध्ये हे प्रमाण वाढून १ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त वर गेले. ज्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होते.
अनेक पालक मुलांच्या शैक्षणिक यशावरच लक्ष केंद्रित करतात; पण त्यांच्या मानसिक स्थितीकडे, मैत्रीच्या नात्यांकडे किंवा दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष करतात. मुलांशी संवाद न साधणे, त्यांच्या भावना समजून न घेणे आणि अडचणी आल्यास योग्यवेळी हस्तक्षेप न करणे, यामुळे मुलं एकाकी पडतात. पालक, शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था यांच्यात समन्वय नसेल, तर विद्यार्थ्यांची वाट चुकण्याचीच जास्त शक्यता असते.
या घटनेनंतर समाज म्हणून आपली जबाबदारी काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. केवळ आरोपी मुलाला शिक्षा देणे पुरेसे नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. शाळा आणि शिकवणी वर्गामध्ये समुपदेशकांची नेमणूक, मानसिक आरोग्यावर कार्यशाळा, व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि मूल्याधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. तसेच हिंसाचाराविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्टपणे रुजवली गेली पाहिजे. शिक्षणव्यवस्था, समाज, पालक आणि प्रशासन या चारही घटकांनी आत्मपरीक्षण करून ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशा घटना वाढू शकतात. प्रत्येक शाळा, शिकवणी वर्गात सुरक्षित, संवेदनशील आणि मानवतावादी वातावरण निर्माण करण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यायला हवा. पालकांनीही मुलांच्या भावनिक बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि खुला संवाद यांचा समन्वय साधल्याशिवाय अशा घटना थांबवता येणार नाहीत.