गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:59 IST2026-02-24T12:45:40+5:302026-02-24T12:59:08+5:30

उड्डाणपुलं बांधून आणि गावांचा स्पर्श टाळून लोकांना या शहराहून त्या शहराकडे जायची घाई झालीय. त्या धांदलीत काय काय हरवतंय गावातलं ?

Where did the trees and birds on them along the village road go? | गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली?

गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली?

-बालाजी सुतार (कवी-कथाकार)
एका ओळखीच्या माणसाचं सडकेवर चहा-नाश्त्याचं दुकान होतं. काही वर्षाआधी ते छान चालायचं. गावालगत सडकेवरल्या चौकाची मोक्याची जागा. कितीतरी वाहनं इथल्या शेडवजा हॉटेलसमोर थांबायची. चहासाठी किंवा पोहे-भजी अशा किरकोळ नाश्त्यासाठी.

शेजारी पान-सिग्रेटची काही दुकानं, उन्हाळ्यात उसाच्या रसाची दुकानं. थांबलेल्या गाड्यांतली माणसं काहीबाही घ्यायची-खायची आणि पुढे आपल्या रस्त्याने निघून जायची. एकदोन दुकानं गाड्यांच्या चाकांत हवा भरण्याची आणि पंक्चर काढण्याची. ही सगळीच दुकानं बऱ्यापैकी चालायची तो काळ तीन-चार वर्षांआधीचा. मग एकेदिवशी गावाजवळच्या या फाट्यावर उड्डाणपुलाचं काम चालू झालं. 

जेसीबीसारखी अवाढव्य यंत्रं आली, धुराळ्याचे प्रचंड लोट उठायला लागले. आपसूकच वाहनं तात्पुरत्या काढून दिलेल्या वळणरस्त्याने जायला लागली. फाट्यावरच्या चौकातल्या धंद्यावर निर्वाह असणाऱ्या या दुकानांचे धंदे इतके थंडावले की इथली माणसं मनातल्या मनात भयाने गारठली. आता निदान वर्ष-दोन वर्ष तरी इथे धंदे चालणार नाहीत, हे कळून आलेल्या माणसांची त्यांच्या दुकानांसकट सैरभैर पांगापांग झाली.

हे सडकेलगतच्या कैक गावांच्या फाट्यांवर घडत राहतं. सडकेलगतच्या हॉटेल दुकानांची एक 'ईको-सिस्टम' असते, ती तिथल्या वाहत्या रहदारीच्या जिवांवर जिवंत असते. उड्डाणपुलं बांधून आणि दरम्यानच्या गावांचा स्पर्श अजिबात टाळून लोकांना वेगाने या शहराहून त्या शहराकडे जायला लावण्याने वर्षानुवर्षांची ही ईको-सिस्टम खलास होते. आणि हे खलास होणं फक्त धंद्या-दुकानांबद्दलच घडत नाही.

माझ्या गावापासून दोनतीन किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये दहाबारा बारीकशी गावं आहेत. एका रस्त्यावर माझ्याच वयाचं एक चिंचेचं झाड होतं. तशी खूप झाडं होती खरं तर रस्तोरस्ती. पण चिंचेचं झाड माझ्या लक्षात राहायचं कारण म्हणजे ते ज्या वाटेवर होतं, तिकडच्या एका गावाला वडिलांच्या कामासाठी मला खूप वेळा जावं लागायचं. वडिलांची एक भली मजबूत आणि उंचच उंच सायकल चालवत मी तिकडे जायचो. जाताना त्या चिंचेजवळ थांबून मी तिची कोवळी पानं खायचो.

सायकल चालवून दमून जाताना कोरडा पडलेला घसा ओला करण्याचा हा एक अतोनात आवडता प्रकार होता. हळूहळू त्या झाडावर माझा जीव जडत गेला. पुढे पुढे त्या रस्त्यावरून मोटारीने जायची सोय झाली, तेव्हा तिथून जाताना एसटीतूनही खिडकीबाहेरून मागे चाललेल्या त्या चिंचेकडे मी प्रेमाने बघत राहायचो.

आत्ता वर्षभरामागे, त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम निघालं, आणि सबंध रस्त्याकडेच्या झाडांची सर्रास कत्तल केली गेली. त्यात ते माझं चिंचेचं झाडही शहीद झाल्याचं दिसलं, तेव्हा काही दिवस मी अतिशय हळहळलो. ही हळहळ त्या एकट्या झाडासाठी अर्थातच नव्हती. 

बारीकमोठ्या रोपा-झुडपांपासून थेट चार माणसांच्या कवळ्यात मावणार नाहीत असले बुंधे असलेली, कित्येक पिढ्यांच्या मुलामाणसांवर जीव लावून असलेली कित्येक झाडं असल्या कारवायांमध्ये निघृणपणे संपवली जातात, तेव्हा त्या झाडांच्या बुंध्या फांद्यावर असलेली किड्या-मुंग्यांची, पाखरा-पक्ष्यांचीही नैसर्गिक ईको-सिस्टम संपवली जाते. यातलं क्रौर्य आपल्या लक्षात येत नाही.

रस्त्यालगतची दुकानं उठलेली पटकन डोळ्यात भरतं. रस्त्यालगतची झाडं आणि त्यावरची पाखरं कुठे उठून गेली याची चिंता ना सरकार करतं, ना रस्त्यावरून भरधाव जाणारी माणसं करतात..
majhegaane@gmail.com

Web Title : सड़क किनारे के पेड़ और पक्षी कहां गायब हो गए?

Web Summary : विकास के कारण सड़क किनारे के व्यवसाय और पारिस्थितिकी तंत्र गायब हो जाते हैं। फ्लाईओवर गांवों को दरकिनार कर देते हैं, जिससे स्थानीय अर्थव्यवस्था और प्रकृति प्रभावित होती है। सड़कों के लिए पेड़ों की कटाई से आवास नष्ट हो जाते हैं, जिस पर अधिकारियों या राहगीरों का ध्यान नहीं जाता है।

Web Title : Where did roadside trees and birds disappear to?

Web Summary : Roadside businesses and ecosystems vanish due to development. Flyovers bypass villages, impacting local economies and nature. Trees felled for roads destroy habitats, unnoticed by authorities or passersby.