‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:45 IST2025-12-27T07:44:16+5:302025-12-27T07:45:35+5:30
नव्याने H-1B व्हिसा मिळणे दुष्कर झालेले आहेच; पण H-1Bच्या रि-स्टॅम्पिंगसाठी भारतात आलेले लोकही ‘डेट’ पुढे गेल्याने अडकले आहेत. याचा अर्थ काय होतो?

‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
-डॉ. भूषण केळकर, संगणकतज्ज्ञ, संचालक, न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्स
मायक्रोसॉफ्ट, ॲपल व गुगल यांनी त्यांच्या इंटर्नल मेमोमध्ये लिहिलंय - ‘कोणी भारतीय या डिसेंबरमध्ये H-1B किंवा अन्य काही व्हिसा स्टॅम्पिंगसाठी भारतात जाणार असेल तर त्यांनी अमेरिकेबाहेर प्रवास टाळावाच !’ H-1B स्टॅम्प करून घ्यायला भारतात आलेल्या माझ्या ओळखीच्या काही (सुदैवी) जणांना मार्च किंवा एप्रिल २०२६ची स्टॅम्पिंग डेट मिळालेली आहे. पण बऱ्याच जणांना थेट जानेवारी/फेब्रुवारी २०२७ ची डेट आहे आणि काहींना तर डेट कधी मिळेल, हेच माहिती नाही.
भारतात H-1B व्हिसा हा एक कौटुंबिक प्रकल्प असतो. अर्जदार एकटा; पण त्याच्यासोबत त्याचे आई-वडील, मामा-मामी, काका-काकू, शेजारी आणि व्हॉट्सॲप कुटुंब गट सगळेच ‘process’मध्ये असतात. H-1B मुलाखत ठरलेली असते, घरात उत्साहाचे वातावरण असते आणि मग अचानक एक ई-मेल येतो : Your H-1B visa interview has been postponed/cancelled.
घरात शांतता पसरते. कोणालाही अधिकृत कारण माहीत नसतं; पण प्रत्येकाकडे स्वतःचा, पण ठाम अंदाज असतो. मग व्हिसा-होतकरू उमेदवारांना फोनवरून सल्ले सुरू होतात.. ‘आता फेसबुक डिलीटच कर.’... ‘व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंग सोडून काहीही टाकू नकोस.’
गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या H-1B व्हिसा प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत. विशेषतः भारतातील H-1B व्हिसा मुलाखती वारंवार पुढे ढकलल्या जाणे किंवा अचानक रद्द होणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. यामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून, अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाकडून (USCIS व State Department) करण्यात येणाऱ्या सोशल मीडिया तपासण्यांचा वाढता वापर हे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रक्रियेचा परिणाम केवळ उमेदवारांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सामाजिक आयुष्यावरही खोलवर होत आहे.

अमेरिकन इमिग्रेशन धोरणानुसार, H-1B तसेच इतर नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट्स, कमेंट्स, लाइक्स आणि शेअर्स यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा, इमिग्रेशन फसवणूक, चुकीची माहिती किंवा अमेरिकाविरोधी विधानांचा संशय असल्यास मुलाखत झाल्यानंतरही व्हिसा निर्णय लांबतो किंवा आधीच ठरलेली मुलाखत रद्द होते. ही अनिश्चितता मानसिक तणाव वाढवणारी ठरते. भारतातील बहुतांश H-1B उमेदवार मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांतून येतात. अमेरिकेत नोकरी मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आधीच मोठे निर्णय घेतलेले असतात- घर विकणे, मुलांची शाळा बदलणे, कर्ज घेणे, जोडीदाराने नोकरी सोडणे. अशावेळी व्हिसा मुलाखत रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली, तर संपूर्ण कुटुंबाचे नियोजन कोलमडते.
व्हिसा रि-स्टॅम्पिंगच्या तारखा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्याने त्यासाठी भारतात आलेले अमेरिकन नोकरदार आता इकडेच अडकले आहेत. अनेकांची कुटुंबे-मुले-कर्जाने घेतलेली घरे तिकडे आणि हे इकडे अशी फाटाफूट झाली आहे. व्हिसा रि-स्टॅम्पिंगचे घोंगडे भिजत पडले, तर हातात असलेली नोकरी टिकेल का, याचीही शाश्वती नाही.
या सगळ्या प्रक्रियेचा एक दीर्घकालीन परिणाम म्हणजे अस्थिरतेची भावना. करिअर, कुटुंब आणि स्थलांतर यांचे निर्णय आता अधिक जोखमीचे वाटू लागले आहेत.
अमेरिका स्थलांतराबाबत कूस टाकते आहे यात शंकाच नाही ! या धोरण-बदलामागे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) याच्याशी संलग्न असे निश्चित धोरण आहे आहे ! पूर्वी H-1B व्हिसाचे वाटप लॉटरी पद्धतीने होत असे. दरवर्षाला दिल्या जाणाऱ्या ८५,००० H-1B व्हिसा पैकी तीनचतुर्थांश भारतीयांच्या वाट्याला येत. आता नव्या धोरणात डोनाल्ड ट्रम्प सरकारने ही लॉटरी पद्धत रद्दबातल ठरवली आहे. आता विशेष कौशल्ये असलेले (हाय स्किल्ड) आणि ज्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्यास अमेरिकन कंपन्या तयार आहेत असेच उमेदवार अमेरिका ‘निवडून’ घेईल. हा नवा नियम पुढील वर्षात फेब्रुवारीपासून लागू होईल. शिवाय या व्हिसासाठीचे शुल्कही अमेरिकेने एक लाख डॉलर्स इतके वाढवले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकन कंपन्या आणि विद्यापीठांपुढे आव्हाने उभे राहू शकतात हे खरे असले, तरी असा निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहेत असे सांगून फेडरल कोर्टाने ट्रम्प यांच्या या निर्णयावर मोहोर उठवली आहे. गुरुवारच्या भल्या सकाळी अमेरिकेतून आलेली ही बातमी H-1B व्हिसाच्या भवितव्याबाबतची ‘भारतीय’ चिंता वाढवणारी आहे हे निश्चित!
bhooshankelkar@hotmail.com