‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली?

By संदीप प्रधान | Published: January 3, 2024 10:13 AM2024-01-03T10:13:29+5:302024-01-03T10:14:26+5:30

थर्टी फर्स्टच्या रात्री ठाण्यात खाडीकिनारी सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून पोलिसांनी ९५ नशेबाजांना ताब्यात घेतले, त्यातले बहुतेक जण मध्यमवर्गीय घरातले आहेत!

When and how did middle class kids get into rave parties | ‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली?

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली?

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे

‘पेज थ्री’ चित्रपटात एक दृश्य आहे. अनाथाश्रमातून गायब झालेली लहान मुले मढ आयलंड येथील एका उद्योगपतीच्या बंगल्यावर नेल्याचे कळल्यावर पोलिस तेथे छापा घालतात. तेथे तो उद्योगपती व त्याचा विदेशी भागीदार लहान मुलांसोबत अश्लील चाळे करताना पोलिसांना सापडतात. उद्योगपतीची ‘पहुंच’ वरपर्यंत असल्याने अर्थातच पोलिसांना त्याला व त्याच्या विदेशी भागीदाराला सोडून द्यावे लागते. एकेकाळी मढ आयलंड येथील श्रीमंतांचे बंगले, तेथे होणाऱ्या रेव्ह पार्ट्या, त्यामधील अमली पदार्थांचे  सेवन, अशा ठिकाणी मुली अथवा लहान मुलांसोबत केले जाणारे अश्लील वर्तन, ‘वाइफ अथवा गर्लफ्रेंड स्वॅपिंग’ वगैरे घटनांच्या बातम्या अथवा चित्रपटातील दृश्ये हे सारे मध्यमवर्गीय नजरांना श्रीमंती शौक अथवा अतिरंजित कहाण्या वाटायच्या; परंतु, थर्टी फर्स्टच्या रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वडवली गावाजवळील खाडीकिनारी सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून ठाणे पोलिसांनी  ९५ नशेबाजांना ताब्यात घेतल्यानंतर काल-परवापर्यंत ‘लक्ष्मीपुत्रांचे छंद’ वाटणाऱ्या गोष्टी आता मध्यमवर्गीयच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील मुले करीत आहेत, हे स्पष्ट झाले. 

सुजल महाजन व तेजस कुबल या तरुणांनी ही पार्टी आयोजित केली होती. मराठी माणूस अनेक क्षेत्रात पिछाडीवर असल्यामुळे गळे काढणाऱ्यांनी या दोन मराठी तरुणांनी रेव्ह पार्टीच्या क्षेत्रातील मराठी माणसाचा अनुशेष दूर केल्याबद्दल पाठ थोपटून घ्यावी की कपाळावर हात मारून घ्यावा? केवळ ५०० ते १,००० रुपये भरून या पार्टीत सहभागी झालेली बहुतांश मुले ही मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील आहेत. कुणाचे वडील छोटी नोकरी करतात तर कुणाचे वडील रिक्षा चालवतात. बहुतेकांचे शिक्षण बेताचे. काही मुले  २० ते २५ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्या करणारी. ही मुले इन्स्टाग्रामवर महाजन व कुबल यांच्या संपर्कात होती. नवरात्रोत्सवात  या दोघांनी सर्वप्रथम ५० जणांची पार्टी केली होती. ती यशस्वी झाल्याचे अनेकांच्या कानावर होते. त्यामुळे थर्टी फर्स्टला त्याच ठिकाणी पार्टी असल्याचे कळताच ही पोरं-पोरी तयार झाली. पार्टीच्या केवळ चार तास अगोदर लोकेशन शेअर केले गेले. बहुतांश मुले-मुली दुचाकी घेऊन तेथे दाखल झाली होती. अमली पदार्थ, मद्य व अन्य चैनीच्या वस्तू मुले-मुली स्वत:सोबत घेऊन आले होते. काहींना हा ‘माल’ आयोजकांनी पैसे घेऊन पुरवलेला असू शकतो.

जी मुले कशापासूनही वंचित नाहीत अशा मुलांचे पालक भौतिक सुखाकडे कसे पाहतात यावर मुलांची जीवनदृष्टी अवलंबून आहे. ज्या पालकांनी अवघड परिस्थितीचा सामना करीत आयुष्यात भौतिक सुखे प्राप्त केली आहेत, अशा कित्येक पालकांची अशी इच्छा असते की, आम्ही जे वंचित आयुष्य जगलो ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको. त्यामुळे मग मुलांनी काही मागण्यापूर्वी लागलीच ते पुरवण्याकडे पालकांचा कल असतो.  भौतिक सुखे उपभोगणे हा आपला हक्क असून त्याचा आपण पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे, अशी मुलांची धारणा होते. अशा मानसिकतेत वाढलेल्या या मुलांकरिता सुख-सोयी त्यांच्या स्वप्रतिमेचा भाग बनतात. स्वप्रतिमा जपण्याकरिता ही अतिश्रीमंत मुले आपले प्रभावक्षेत्र निर्माण करतात. ते त्यांचे सत्ताक्षेत्र असते. त्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणारे मित्र-मैत्रिणी हेच या प्रभावक्षेत्राचे मानकरी असतात.  मग ही स्वप्रतिमा जपण्याकरिता उपभोगाकडील कल वाढत जातो. अनेक श्रीमंत, यशस्वी, नामांकितांची मुले ही त्यांच्या पालकांसोबत सतत होणाऱ्या तुलनेमुळे वैफल्यग्रस्त असतात. त्यातून ते रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ वगैरे जाळ्यात अडकतात, असे मानसशास्त्रीय विश्लेषण केले जाते. 

ठाण्यातील रेव्ह पार्टीत मध्यमवर्गीय घरांमधील मुले अमली पदार्थांसह सर्व मौजमजा करताना दिसली. सोशल मीडियामुळे श्रीमंतांच्या जगात काय काय चालते हे सारेच आता मध्यमवर्गीय, गोरगरिबांना खुले झाले आहे. ही श्रीमंत माणसे जर वरचेवर अशी मौजमजा करत असतील तर मी एक दिवस का करू नये, ही भावना असू शकते. अत्यंत कमी पगारावर काम करणारे तरुण- तरुणीही श्रीमंती उपभोगांच्या मोहात-मागोमाग कर्जाच्या सापळ्यात सहज अडकतात. आपल्या गरजा काय, हे तपासून पाहण्याची विवेकबुद्धी त्यांच्यापाशी नसते. श्रीमंतांच्या जगण्याचे आकर्षण इतके प्रबळ, की त्यापायी ही मुले सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसतात. ठाण्यात त्याचेच दर्शन घडले.    
sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: When and how did middle class kids get into rave parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.