३५ वर्षे वयाचा एक तरुण रॅपर जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:22 IST2026-03-19T10:21:58+5:302026-03-19T10:22:21+5:30
नेपाळच्या पंतप्रधानपदी आरूढ होणारे बालेन्द्र शाह हा व्यक्तीचा नव्हे, एका पिढीचा विजय आहे. भ्रष्टाचारी व्यवस्था, जुनाट नेत्यांना ही सणसणीत चपराक आहे!

३५ वर्षे वयाचा एक तरुण रॅपर जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो...
रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला -
नेपाळमध्ये बालेन्द्र शाह पंतप्रधानपदी आरूढ होण्याची औपचारिकताच काय ती बाकी आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मिळालेला प्रचंड जनादेश हा केवळ एका नेत्याचा विजय नाही, तर तो एका पिढीचा विजय आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेला, दशकांपासून खुर्च्यांना चिकटून बसलेल्या नेत्यांना आणि तरुणाईची स्वप्ने वारंवार पायदळी तुडवणाऱ्या राजकारणाला मिळालेले हे उत्तर आहे. हा निकाल नेपाळपुरता मर्यादित नाही, तर त्याचे पडसाद आसपासच्या देशांमध्येही उमटणे अपरिहार्य आहे.
रॅपर ते महापौर आणि आता पंतप्रधानपदाच्या उंबरठ्यावर, हा बालेन्द्र शाह यांचा प्रवास ही एक अनोखी जीवनगाथा आहे. या ३५ वर्षीय नेत्याने महापौरपदाच्या कारकिर्दीत काठमांडूत रस्ते, स्वच्छता आणि अतिक्रमणासारख्या प्रश्नांवर जी कार्यक्षमता दाखवली, ती पाहून नेपाळी जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला; परंतु, महापालिका चालवणे आणि देश चालवणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे पुढील पाच वर्षे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेची असतील.
नेपाळमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये तत्कालीन के. पी. शर्मा ओली सरकारने समाजमाध्यमांवर बंदी लादली. त्याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली. किमान सत्तर जणांना प्राण गमवावे लागले. अखेर ओली यांना पायउतार व्हावे लागले. या घटनाक्रमाने एक महत्त्वाचा संदेश दिला, की सरकार इंटरनेट बंद करू शकते; पण, तरुणांचा आवाज बंद करू शकत नाही! तरुण वर्ग शाह यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी ओली यांना त्यांच्याच मतदारसंघात चार पट मतांनी पराभूत केले.
आता शाह यांना जनतेच्या प्रचंड अपेक्षांवर खरे उतरावे लागेल. त्यांच्या पक्षाने पुढील पाच वर्षांत बारा लाख रोजगार निर्माण करण्याचे आणि दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. हे खूप महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. नेपाळ हा भूपरिवेष्टित देश. अर्थव्यवस्था मर्यादित. लाखो नेपाळी तरुण खाडी देशांत, मलेशियात आणि युरोपात कामाच्या शोधात जातात. हे स्थलांतर थांबवायचे असेल, तर देशांतर्गत संधी निर्माण कराव्या लागतील; परंतु जुनी नोकरशाही, जुनी न्यायव्यवस्था आणि जुन्या पक्षांचे अवशेष सहजासहजी बाजूला सरकणार नाहीत. व्यवस्था बदलणे हे निवडणूक जिंकण्यापेक्षा कितीतरी पटींनी कठीण असते, हा अनुभव यापूर्वीही अनेक नेत्यांनी घेतला आहे.
शाह सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास नेपाळची वाटचाल कोणत्या दिशेने होईल? अभ्यासक या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीलंकेचे उदाहरण समोर ठेवतात. गोटाबाया राजपक्षे यांनाही मोठा जनादेश मिळाला होता; पण, आर्थिक संकटात जनता राष्ट्राध्यक्ष भवनातच घुसली! नेपाळमध्येही भ्रमनिरास झाल्यास तरुण पिढी पुन्हा रस्त्यावर येऊ शकते. तो संताप अधिक तीव्र असेल; कारण अपेक्षा जास्त होत्या. शिवाय, अपयशाच्या सावटाखाली माओवादी विचारसरणीचे पुनरुज्जीवन किंवा कट्टर राष्ट्रवादाचा उदय होण्याची भीती आहे.
भू-राजनैतिक दृष्टिकोनातून नेपाळला भारत आणि चीनमध्ये समतोल साधावा लागतो. शाह यांनी भारत-नेपाळ शांती व मैत्री करारांवर पुनर्विचाराचे संकेत दिले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक निकालानंतर लगेच शाह यांच्याशी दूरध्वनीद्वारा संपर्क साधून सहकार्याची इच्छा व्यक्त केली. हा सकारात्मक पुढाकार आहे; परंतु, भारताला हे लक्षात ठेवावे लागेल, की स्वाभिमानी, स्थिर आणि समृद्ध नेपाळच दीर्घकालीन भारतीय हितासाठी अनुकूल ठरेल. नेपाळच्या अंतर्गत दुर्बलतेचा फायदा उचलण्यासाठी चीन नेहमी टपलेलाच असतो. त्यामुळे भारताने नेपाळसोबत व्यावहारिक आणि समानतेच्या आधारावर संबंध ठेवणे आवश्यक आहे.
बांगलादेशात २०२४ मध्ये तरुणाईने शेख हसीना यांचे सरकार उलथवले होते. लोकशाही मार्गाने व्यवस्था बदलता येते, हा विश्वास नेपाळ आणि बांगलादेशांतील घटनाक्रमांनी तरुणाईच्या मनात निर्माण केला आहे. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या शेजारी देशांमध्येही बेरोजगारी, महागाई, शिक्षण व्यवस्थेतील दोष या मुद्द्यांवर असंतोष धुमसत आहे. त्या देशांतील तरुणांना नेपाळचे उदाहरण प्रेरित करू शकते. या सगळ्या घडामोडींमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे समाजमाध्यमे! सीमा बंद करता येतात; पण, इंटरनेट बंद करणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे. बातम्या काही तासांतच संपूर्ण जगात पोहोचतात. त्यामुळे कोणत्याही सरकारला आता जनतेपासून लपता येत नाही. नेपाळच्या तरुण पिढीने प्रस्थापितांना नाकारून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. ती वाया घालवल्यास, तरुणाईचा लोकशाहीवरील विश्वास डळमळेल. रॅपर ते पंतप्रधान असा प्रवास करणारे बालेन्द्र शाह यांची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. ते यशस्वी झाल्यास, आशेचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो; परंतु, अपयशी ठरल्यास, ती एका पिढीची शोकांतिका ठरेल!
ravi.tale@lokmat.com