नाकावर राग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:37 AM2017-11-29T00:37:47+5:302017-11-29T00:38:18+5:30

सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही.

 What's the reason for anger? | नाकावर राग का?

नाकावर राग का?

Next

सूरजपाल अमू हा वेडा इसम आहे. तो तसा असतानाही भारतीय जनता पक्षाने त्याला लोकसभेचे तिकीट देऊन त्या शहाण्यांच्या सभागृहात त्याला निवडून आणले आहे. समाजकारण, राजकारण आणि संघकरण यात राहूनही त्याला विवेक वा लोकशाही संकेतांची ओळख पटलेली नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर माणसाने किती संतापावे व विशेषत: सार्वजनिक जीवनातील पुढारी म्हणविणाºयांनी आपल्या रागाचा पारा किती अंशांपर्यंत वाढवावा याचे तारतम्य सगळ्याच समजूतदार माणसांनी बाळगायचे असते. अमू हा या समजूतदारपणापासून दूर असलेला वेडा खासदार आहे. ‘पद्मावती’ या सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाच्या वादाची एक बाजू घेऊन हा खासदार भडकला आहे. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाºयाला त्यांनी पाच कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. दीपिका पादुकोण या त्या चित्रपटात पद्मावतीचे काम करणाºया नटीचे नाक कापून आणणाºयालाही त्यांनी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. तेवढ्यावर न थांबता या इसमाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही, त्यांचे नाक कापण्याची व त्यांची शूर्पणखा करण्याची धमकी दिली आहे. या अमूचे एक राजकीय तारतम्य मात्र येथे कुणाच्याही नजरेतून न सुटणारे आहे. पद्मावतीच्या प्रदर्शनाला महाराष्टÑ सरकारने मान्यता दिली आहे. पण अमूचा फडणविसांच्या नाकावर डोळा नाही कारण ते अमूच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. ममतादीदींचा पक्ष वेगळा आणि अमूच्या पक्षाला कडवा विरोध करणारा आहे. ही बाब पद्मावतीविषयीचे हे भांडण नुसते ऐतिहासिक वा सांस्कृतिक नसून राजकीयही आहे, हे चाणाक्षांच्या लक्षात आणून देणारी ठरावी. डोक्यात वेडेपण घेतलेली माणसे पुढारी कशी होतात, त्यांना तिकिटे कशी मिळतात आणि ती निवडली तरी का जातात हा यातला खरा प्रश्न आहे. कायद्याला हिंसाचार मान्य नसला तरी सध्याच्या राजकारणाला तो चालणारा आहे. त्यातही असा हिंसाचार सामूहिक असेल आणि तो एखाद्या समाजाविरुद्ध वा समाजाच्या धारणांविरुद्ध असेल तर तो निवडणुकीत विजयी करणाराही आहे. दिल्लीतील शिखांच्या आणि गुजरातमधील मुसलमानांच्या कत्तलीनंतर, त्या कत्तली करणारे पक्षच सत्तेवर निवडून आले हे याच राजकीय हिंसाचाराविषयीच्या आवडीचे लक्षण आहे. त्यामुळे अमूला कोणी अडवणार नाही. त्याला कायद्याचा बडगा दाखविला जाणार नाही आणि त्याच्या पक्षाचा कोणताही पुढारी त्याचे कान उपटणार नाही. उपराष्टÑपती व्यंकय्या नायडू म्हणाले, लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. पण उपराष्टÑपतींचे पद शोभेचे व अधिकारशून्य आहे. ज्या पदांना अधिकार आहे तीही माणसे अशावेळी गप्प का राहतात. मोदी बोलत नाहीत, राजनाथ बोलत नाहीत आणि अमित शहा? त्यांना तर असा गदारोळ राजकीयदृष्ट्या लाभाचाच वाटावा असा आहे. फार पूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका खासदाराने राज ठाकरे यांना मारहाण करणाºयाला बक्षीस जाहीर केले होते. तो प्रकार खपला. परिणामी अशा जाहीर धमक्यांचे पेवच देशात फुटले. खून करणे, शिरच्छेद करणे, नाक कापणे, हातपाय तोडणे अशा थेट तालिबानांच्या आणि इसीसच्या पातळीवर जाणाºया धमक्याच देशात दिल्या गेलेल्या पाहता आल्या. पोलीस थंड असतात. कायदे पुस्तकात राहतात आणि अशा धमकीबहाद्दर लोकांचे चेले त्यांच्या विजयी मिरवणुकाही काढतात. देशात संविधान दिवस साजरा होत असताना हे घडावे ही त्यातली आणखी शरमेची बाब. पण अमूला कोणी आवरणार नाही आणि आपल्या लोकशाहीला जडलेली ही हिंसेची काजळीही कधी पुसली जाणार नाही. अमूच्या वेडासारखे आणखीही अनेकांचे वेड आपल्याला काही काळ सांभाळायचे आहे हा या घटनाक्रमाचा अर्थ आहे.

Web Title:  What's the reason for anger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.