रात्रजीवन हवंय कशासाठी ?

By Admin | Updated: March 22, 2015 01:51 IST2015-03-22T01:51:16+5:302015-03-22T01:51:16+5:30

एखादं शहर, एखादं राज्य यातलं आपल्याला काय रु चतं, काय पटतं, काय खटकतं हे प्रत्येकवेळी स्पष्टपणे मांडता यायला पाहिजे

What is the night life? | रात्रजीवन हवंय कशासाठी ?

रात्रजीवन हवंय कशासाठी ?

एखादं शहर, एखादं राज्य यातलं आपल्याला काय रु चतं, काय पटतं, काय खटकतं हे प्रत्येकवेळी स्पष्टपणे मांडता यायला पाहिजे. तसं ते मांडता आलं की, जे आवडतं ते का आवडतं याचा अंदाज येतो आणि जे खटकतं त्याचं काय करायचं हेही कळू शकते. या सदरातून हेच समजून घेण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

मुंबई हे आपलं शहर आहे आणि महाराष्ट्र आपलं राज्य आहे. अलीकडच्या पिढीचा शब्द वापरायचा तर ही हॅपनिंग ठिकाणं आहेत. इथे दिवसाच्या प्रत्येक क्षणाला काही ना काही घडत असतं. त्याची नोंद कुणी ना कुणी घेतच असतं. नोंद घेणाऱ्यांचा विचार, त्यामागची भूमिका त्यांच्या निरीक्षणात उतरतेच. त्यामुळे इथे होणाऱ्या निरीक्षणांना एक प्रकारची सापेक्षता असली तरी ते फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित राहत नाही. व्यक्तिगत निरीक्षण, सामूहिक परिमाण असलेली असतील तर त्यातून अनेकांना आपलंसं वाटेल, असं काहीतरी सापडू शकतं. ‘लोकमत’च्या वाचकांना असं काही सापडलं तर मला आनंदच होईल.
नमनाला फार तेल न घालता थेट मुद्द्यावर येतो. सध्या आपल्याकडे दोन युवराजांची चर्चा चालू आहे़ एक काँग्रेसचे गायब असलेले युवराज आणि दुसरे शिवसेनेचे अतिसक्रिय असलेले युवराज. यापैकी गायब असलेले युवराज प्रत्यक्ष लोकांपुढे येतील तेव्हा त्यांच्याबद्दल लिहू या. सध्या शिवसेनेच्या अतिसक्रिय युवराजांचा विचार करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे सध्याचे प्रमुख उद्वव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत बराच फरक आहे. बाळासाहेबांची शैली आक्रमक तर उद्वव ठाकरे यांची तुलनेने मवाळ आहे. बाळासाहेबांचे संघटनकौशल्य निर्विवाद होतं़ त्यामानाने उद्वव ठाकरे यांना एक तयार संघटना हाती मिळाली. पक्षातल्या जुन्या-जाणत्यांना आणि प्रसारमाध्यमांतल्या बाळासाहेबांच्या प्रतिमेत गुंतलेल्यांना उद्वव ठाकरे शिवसेना सांभाळू शकणार नाहीत असं वाटत होतं. मात्र आजपर्यंत तरी उद्वव ठाकरे यांनी शिवसेना सांभाळण्यात यश मिळवलेलं दिसतं. मात्र शिवसेना ज्या भूमिकेवर उभी आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांची दिसते. त्यातून शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं काही भलं होणार का, याचा विचार करण्याची गरज आहे.
आदित्य ठाकरे यांनी रात्रजीवनासाठी ( नाइटलाइफ) मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. आदित्यचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेलं आहे. बाळासाहेबांच्या मराठीच्या भूमिकेतली एक महत्त्वाची विसंगती आदित्यच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात दिसून येते. मात्र हा विसंवाद शिवसेनेच्या एकूण भूमिकेतच आहे. त्यामुळे आदित्यने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र इंग्रजीत असणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. या रात्रजीवनात काय अपेक्षित आहे? तर पहाटेपर्यंत बार, डिस्को थेक, पब, परमिट रूम चालू ठेवणं होय.
शहरातल्या इंग्रजाळलेल्या दक्षिण मुंबईतला आणि दक्षिण मुंबईसदृश ठिकाणी राहणारा जो तरुण-तरुणींचा वर्ग आहे, त्यांना मुंबई शहरात फार काही घडत नाही असं वाटत राहतं. त्यांच्या सोयीसाठी मुंबई रात्रभर जागी असली पाहिजे, असा एक आग्रह आहे. आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जे वेगवेगळे उपक्रम सुरू केले, त्यात हा प्राध्यान्याने अमराठी असलेला तरुण आपल्याकडे कसा येईल, यासाठीचे उपक्रम हाती घेतलेले दिसतात. त्यातूनच शिवसेनेचा व्हॅलेंटाइन्स डेला असलेला विरोध मावळलेला दिसतो. मुळात व्हॅलेंटाइन्स डेला विरोध करणं चुकीचं होतं, असं मला वाटतं. याचा अर्थ व्हॅलेंटाइन्स डे फार महान गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण शिवसेनेकडे असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना आपण प्रेमात पडावं आणि ते व्यक्त करावं अस वाटत नाही का, एवढा साधा विचार शिवसेनेच्या नेतृत्वाने करायला पाहिजे होता. त्यामुळे भेटकार्डांच्या दुकानावर हल्ले करून तिथं मोडतोड करण्यापेक्षा चांगली भेटकार्डे तयार करून ती सर्व शाखांमध्ये विकायला ठेवली असती, तर पाचपन्नास शिवसैनिक पोटाला तरी लागले असते. पण पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पनेमुळे शिवसेनेने स्वत:चे हसे करून घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेऊन हे थांबवलं असेल, तर हे चांगलंच आहे. मात्र त्याचं पुढचं पाऊल म्हणून रात्रजीवन आणि टेरेस पार्टी याचा आग्रह धरणं हे अतिरेकीपणाचं आहे, असं वाटतं.
मुंबई शहरातल्या पोलिसांवर आधीच कामाचा मरणाचा ताण आहे. किमान बारा ते सोळा तासांची ड्युटी त्यांना करावी लागते. त्यात आपल्या उत्सवप्रिय समाजात लहानसहान गोष्टीवरून माऱ्यामाऱ्या करण्याचा छंद आहे. त्यामुळे अनेक धार्मिक ठिकाणं कायम पोलिसांच्या बंदोबस्तात असतात. रात्रीबेरात्री हमरस्त्यावरून जोरात बाईक चालवणारी मुलं, नव्या अमली पदार्थांच्या आहारी जाणारी कॉलेजची मुलं आणि वाढत्या बेकारी - दारिद्र्यामुळे थोड्या पैशासाठी मारामाऱ्या आणि खून करणारी मुलं, असं चित्र समोर असताना पहाटेपर्यंत हॉटेल, परमिट रूम, बार चालू ठेवणं याचा अर्थ आत्महत्येला निमंत्रण आहे. यातून जो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो कोण सोडवणार? आज अनेक ठिकाणी लोकांचे कान फुटेपर्यंत डीजेचा ढणढणाट होत असतो. उद्या या सगळ््यावरून वेळेचं बंधन निघाले तर होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी कोण घेणार आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या अमराठी लोकांना खूश करण्यासाठी आदित्य ठाकरे हे करीत आहे, ते लोक या असल्या गोष्टीमुळे शिवसेनेला मतदान करणार आहेत का? आणि यातलं काही होणार नसेल तर या नस्त्या उद्योगापोटी शहरातल्या बहुसंख्येने मराठी असलेल्या पोलिसांचे जे हाल होणार आहे, त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार आहेत का ?
एखाद्या पक्षाला नव वळण देणं चांगलंच. पण ते करीत असताना त्याच्या मूळ भूमिकेला तडा जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंच्या टेरेस पार्टीच्या प्रस्तावाला फरहान आझमीसारख्या उटमटोल माणसाचा पाठिंबा मिळतो, ही एकच गोष्ट हा प्रस्ताव अजिबात अमलात आणू नये हे सांगायला पुरेशी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सुचवावंसं वाटतं ते हेच, की ‘मित्रा, तू इंग्रजीत कविता करतो इथवर ठीक आहे. पण अद्याप महाराष्ट्रात मराठी भाषिक आहे, हे विसरण्याचं काही कारण नाही!’

आदित्य ठाकरे यांनी रात्रजीवनासाठी (नाइटलाइफ) मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. आदित्यचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेलं आहे. बाळासाहेबांच्या मराठीच्या भूमिकेतली एक विसंगती आदित्यच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात दिसून येते. मात्र हा विसंवाद शिवसेनेच्या एकूण भूमिकेतच आहे. त्यामुळे आदित्यने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र इंग्रजीत असणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. या रात्रजीवनात काय अपेक्षित आहे? तर पहाटेपर्यंत बार, डिस्को थेक, पब, परमिट रूम चालू ठेवणं होय.

 

डाॅ . दीपक पवार 

Web Title: What is the night life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.