दुर्जन सत्तेच्या केंद्रस्थानी येणे रोखण्यासाठी काय करावे लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:53 IST2026-03-18T08:53:10+5:302026-03-18T08:53:36+5:30

स्वकेंद्रीपणा, धूर्त कपटीपणा आणि समाजविघातक प्रवृत्ती हे तीन रस्ते एकत्र येतात, तेव्हा दुर्जनपणाचा एक विचित्र तिठा तयार होतो..

What needs to be done to prevent the evildoers from coming to the center of power | दुर्जन सत्तेच्या केंद्रस्थानी येणे रोखण्यासाठी काय करावे लागेल?

दुर्जन सत्तेच्या केंद्रस्थानी येणे रोखण्यासाठी काय करावे लागेल?

डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस -

सज्जनपणा आणि सज्जनशक्ती समजून घेण्यासाठी दुर्जन असणे म्हणजे काय आणि दुर्जनशक्ती नावाची गोष्ट कशी तयार होते हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. युद्धखोरी आणि दुर्जनपणा यांचा संबंध आपण मागच्या लेखात समजून घेतला. या लेखात दुर्जनशक्ती विषयी बोलूया ! ‘सज्जन लोक एकमेकांना केवळ स्मशानातच भेटतात’ अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण आहे. दुर्जन प्रवृत्तीचे लोक मात्र जसे दोन चुंबकांप्रमाणे आत्यंतिक वेगाने एकमेकांकडे आकर्षित होतात  असे चित्र आपल्याला आजूबाजूला दिसते. जागतिक स्तरापासून ते आपल्या गल्लीपर्यंत याची अगणित उदाहरणे  रोजच्या जीवनात दिसतात. 

केव्हिन विलियम्स आणि पौलहस या मानसशास्त्रज्ञ जोडीने हा दुर्जनपणा निर्माण होणे आणि त्याच्या एकत्र येण्यामागे असलेल्या तीन प्रमुख मानवी प्रवृत्तींविषयी लिहून ठेवले आहे. पहिला येतो तो टोकाचा स्वकेंद्रीपणा म्हणजेच नार्सिसिझम. नार्सिसस नावाची  ग्रीक पुराणकथांमधली एक व्यक्तिरेखा आहे. या नार्सिससने एका तळ्यात स्वत:चे प्रतिबिंब बघितले आणि तो त्याच्या इतका प्रेमात पडला की तहान-भूक हरपून केवळ स्वत:चे प्रतिबिंबच पाहत राहिला आणि त्यामधेच त्याचा मृत्यू झाला. दुसरी प्रवृत्ती आहे ‘म्याकीयाव्हालेनिजम’. म्याकीयाव्ह्याली नावाच्या राजकीय भाष्यकाराच्या नावाने या प्रवृत्तीचे नाव पडले आहे. सध्या सोप्या बोलीभाषेत म्याकीयाव्हालेनिजम म्हणजे धूर्त कपटीपणा. या प्रवृत्तीची माणसे आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन दुसऱ्याला फसवू शकतात. तिसरा भाग आहे सायकोपथी म्हणजे समाज विघातक प्रवृत्ती. या प्रवृत्तीचे लोक सहजपणे कायदा मोडतात. त्यांना दुसऱ्यांच्या हक्कांविषयी अजिबात संवेदनशीलता नसते. या तीन गोष्टी एकत्र होऊन व्यक्तिमत्त्वाचे जे मिश्रण तयार होते त्याला केव्हिन विलियम्स आणि पौलहस ‘डार्क ट्रायाड’ म्हणतात. जसे तीन रस्ते एकत्र येऊन तिठा तयार होतो तसा हा दुर्जनपणाचा तिठा. डोळे उघडून आजूबाजूला बघितले तर आपल्याला राज्यात, देशात आणि जगभरात या तिन्ही प्रवृत्तीचे एकत्रीकरण झालेली अनेक उदाहरणे दिसतील.

ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात मानवी समूहाला अडचणीत आणणाऱ्या अशा तीन प्रवृत्ती आहेत असे लोक जेव्हा स्वार्थासाठी हातमिळवणी करतात त्यामधून दुर्जन प्रवृत्तींची एकजूट होऊन काही काळासाठी त्यांची एक शक्ती निर्माण झाली आहे अशी परिस्थिती निर्माण होते. पण या प्रवृत्तीचे मूळ स्वरूपच असे आहे की ती फार काळ एकमेकांशी पटवून घेऊ शकत नाही. त्यांच्या एकत्र येण्यातच त्यांच्या नाशाची बीजे रोवलेली असतात. या लोकांना सत्तेच्या केंद्रस्थानी येण्यापासून रोखायचे असेल तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत न्यायाच्या तत्त्वावर काम करणाऱ्या व्यवस्था आणि त्यांना पाठबळ देणारे समाजमन आवश्यक असते. अशा न्याय यंत्रणा आणि त्याला बळ देणारे समाजमन निर्माण होत नाही तोपर्यंत हा दुर्जनशक्तीचा तिठा सत्तेच्या केंद्रस्थानी येणे टाळणे अवघड आहे. म्हणूनच अशा व्यवस्था निर्माण करणे आणि त्या प्राणपणाने टिकवणे हे सज्जनशक्तीचे प्राथमिक कर्तव्य आहे.
    hamid.dabholkar@gmail.com

Web Title : दुष्टों को सत्ता में आने से रोकने के लिए क्या करना होगा?

Web Summary : दुष्ट व्यक्तियों को सत्ता में आने से रोकने के लिए, एक सहायक जनता द्वारा समर्थित मजबूत, न्यायपूर्ण व्यवस्थाएँ आवश्यक हैं। इन प्रणालियों को कर्तव्यनिष्ठ नागरिकों द्वारा बनाए रखा जाता है, जो दुर्भावनापूर्ण ताकतों के उदय को रोकने और समाज की भलाई की रक्षा करने में महत्वपूर्ण हैं।

Web Title : Preventing the rise of the wicked to power: What is needed?

Web Summary : To prevent wicked individuals from gaining power, strong, just systems backed by a supportive public are essential. These systems, upheld by conscientious citizens, are crucial in thwarting the rise of malevolent forces and safeguarding society's well-being.