अमेरिकेतील अग्निप्रलय... यापासून कोणता धडा घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:47 IST2025-01-13T08:46:51+5:302025-01-13T08:47:16+5:30

इटन फायर या वणव्याने १४,११७ एकर, तर हर्स्ट किंवा सिल्मर या वणव्याने ७७१ एकर क्षेत्राचा घास घेतला.

What lessons can we learn from the fires in America? | अमेरिकेतील अग्निप्रलय... यापासून कोणता धडा घेणार?

अमेरिकेतील अग्निप्रलय... यापासून कोणता धडा घेणार?

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील गेल्या आठवड्यातील अग्निप्रलय कल्पनातीत होता. जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ पाडणारी हॉलिवूड ही मायानगरी वसलेल्या लॉस एंजेलिस शहरालगतच्या जंगलातून गेल्या मंगळवारी या अग्निप्रलयास प्रारंभ झाला. ताशी १६० किलोमीटरपेक्षाही थोड्या अधिकच वेगाने वाहणाऱ्या शक्तिशाली सॅन्टा ॲना वाऱ्यांमुळे प्रामुख्याने तीन ठिकाणी वणवे पेटले आणि त्यांनी अल्पावधीतच भीषण स्वरूप धारण करून लॉस एंजेलिस शहरालाही कवेत घेतले. त्यापैकी पालीसेड्स फायर असे नामकरण झालेल्या वणव्याने तब्बल २१,५९६ एकर क्षेत्र स्वाहा केले. इटन फायर या वणव्याने १४,११७ एकर, तर हर्स्ट किंवा सिल्मर या वणव्याने ७७१ एकर क्षेत्राचा घास घेतला.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात मे आणि जून हे दोन महिने वणव्यांचे म्हणून ओळखले जातातच; परंतु नेहमीपेक्षा उष्ण उन्हाळा आणि पावसाच्या अभावाला वेगवान वाऱ्यांची साथ मिळाल्याने, उत्तम हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या लॉस एंजेलिस शहरावर उद्ध्वस्त होण्याचीच वेळ आली. आगीत आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले असून, १३,४०० इमारतींना क्षती पोहचली आहे, तर तब्बल एक लाख ८० हजार जणांवर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. कित्येक वाहनांचाही कोळसा झाला आहे. एकूण  वित्तहानी काही अब्ज डॉलर्सच्या घरात असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सर्वसामान्य नागरिकांशिवाय अनेक सेलिब्रेटीजची निवासस्थानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामध्ये पॅरिस हिल्टन, बिली क्रिस्टल, मँडी मूर अशा बड्या हस्तींचाही समावेश आहे.

जगभरातील कित्येकांची स्वप्ननगरी असलेल्या लॉस एंजेलिस या सुंदर शहराची काय दुर्दशा झाली असावी, याची कल्पना उपरोल्लेखित तपशिलांवरून सहज करता यावी! तसे या शहरालगतच्या एंजेलिस राष्ट्रीय वनासाठी वणवे नित्याचेच; परंतु यावेळी लांबलेली दुष्काळी स्थिती, शक्तिशाली सॅन्टा ॲना वारे आणि नेहमीपेक्षा वाढलेले तापमान यांच्या संगमामुळे वणव्यांनी भयावह स्वरूप धारण केले. या आगी नैसर्गिक, की मानवी हस्तक्षेप कारणीभूत होता, याचा शोध अर्थातच घेतला जाईलच! कॅलिफोर्नियातील आग नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, जगभरातील वाढत्या वणव्यांमागे हवामान बदल हे कारण आहेच, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. जागतिक तापमानवाढीमुळे पर्जन्यमान कमी होत आहे आणि बाष्पीभवन वाढतच चालले आहे.

परिणामी अलीकडे जंगलांमधील हिरवाई पूर्वीपेक्षा लवकर सुकते आणि वणव्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती होते. आगामी काळात कॅलिफोर्नियातील अग्निप्रलयाचे गंभीर परिणाम वेगवेगळ्या स्वरुपात समोर येणार आहेत. या अग्निप्रलयाने हजारो एकर क्षेत्र अक्षरशः भाजून काढले आहे, जैवविविधतेला गंभीर स्वरुपाची हानी पोहोचवली आहे. आणि कॅलिफोर्नियन गिधाडासारख्या विलुप्तीच्या मार्गावरील प्रजातीसमोर अस्तित्वाचेच संकट उभे केले आहे. काळ्या धुराने मोठ्या क्षेत्राला कवेत घेतले असल्याने हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली आहे आणि हरितगृह वायू उत्सर्जनास हातभार लावला आहे. प्रारंभिक अंदाजानुसार, या अग्निप्रलयाने किमान तीन अब्ज डॉलर्सची वित्तहानी झाली आहे. त्यामध्ये मालमत्ता आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानासोबतच उद्योग-व्यवसायांत पडलेल्या खंडांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाचा समावेश आहे. कृषी क्षेत्राची तर अपरिमित हानी झाली आहे.

द्राक्ष आणि संत्रा बागांच्या हानीतून सावरण्यासाठी बागायतदारांना अनेक वर्षे लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेकांचे रोजगार नष्ट  झाले आहेत आणि पुरवठा साखळ्या मोठ्या प्रमाणात खंडित झाल्या आहेत. हजारो लोकांच्या डोक्यावरील छप्पर नष्ट झाल्याने आपातकालीन निवारे उपलब्ध करून देताना, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नैसर्गिक आपदेपुढे अमेरिकेसारख्या प्रगत देशातील आपत्ती व्यवस्थापनही तोकडे पडते, हेच त्यातून अधोरेखित होते. अर्थात एवढ्या प्रचंड प्रमाणात घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडूनही केवळ १२ जणांचेच प्राण गेले, यासाठी प्रशासनाला श्रेय दिलेच पाहिजे.

ड्रोन आणि कृत्रिम उपग्रहांनी केलेल्या चित्रीकरणामुळे आग कशी, किती वेगाने, कोणत्या दिशेने पसरत आहे, याचा अंदाज घेत, त्यानुसार मदत व सुटका कार्य केल्याने ते शक्य झाले. या तंत्रज्ञानात गुंतवणूक किती आवश्यक आहे, हेच त्यावरून अधोरेखित होते. आपल्या देशातील एखाद्या महानगरात असा अग्निप्रलय झाला असता तर किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती, याचा नुसता विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो. हवामान बदलांच्या या कालखंडात वणव्यांमुळे किती उत्पात माजू शकतो, हे अमेरिकेतील या अग्निप्रलयाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला दिसले आहे. त्यापासून कोणता धडा घेणार, यावरच मानवजातीचे भवितव्य अवलंबून असेल!

Web Title: What lessons can we learn from the fires in America?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.