बेल्जियमची ‘राणी’ हार्वर्डमध्ये काय करतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 09:30 IST2025-05-23T09:30:10+5:302025-05-23T09:30:31+5:30
या यादीत आता आणखी एक बडं नाव सामील झालं आहे ते म्हणजे बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ.

बेल्जियमची ‘राणी’ हार्वर्डमध्ये काय करतेय?
जगातल्या ज्या काही मोजक्या अत्यंत प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहेत, त्यात हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं नाव बरंच वर आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक नामवंत लोकांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. इथून शिक्षण घेतलेल्या नामांकितांची यादी बरीच मोठी आहे. बराक ओबामा, नील डीग्रास टायसन, मार्गरेट एटवुड, रतन टाटा, बिल गेट्स, नताली पोर्टमन, मार्क झुकरबर्ग, डेन्मार्कचे राजा फ्रेडरिकपासून तर जपानची महाराणी मासाकोपर्यंत अनेक बड्या हस्तींनी येथून शिक्षण घेतलं आहे.
या यादीत आता आणखी एक बडं नाव सामील झालं आहे ते म्हणजे बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ. नुकतीच तिनं तिथे ॲडमिशन घेतली आहे. ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयात दोन वर्षांची मास्टर्स डिग्री घेण्यासाठी ती इथे दाखल झाली आहे. राजकुमारी एलिझाबेथ तिथे दाखल झाल्यामुळे हार्वर्डमधली चहलपहल आणखी वाढली आहे.
एलिझाबेथ सध्या २४ वर्षांची असून, किंग फिलिप आणि क्वीन मथिल्डे यांच्या चार मुलांपैकी एलिझाबेथ ही सर्वांत मोठी. बेल्जियमच्या सिंहासनाची ती उत्तराधिकारी असल्यानं पुढील काही वर्षांत ती बेल्जियमची राणी बनेल. हार्वर्ड विद्यापीठात एलिझाबेथनं प्रवेश घेतल्यामुळे हार्वर्ड आणि एलिझाबेथ अशा दोघांचंही नाव सध्या फारच गाजतं आहे. सोशल मीडियावरही एलिझाबेथचे खूप चाहते आहेत. शिक्षणात तर ती पुढे आहेच; पण कुठलाही शाही रुबाब न गाजवता चारचौघांसारखी ती राहात असल्यानं विद्यापीठातही ती खूपच लोकप्रिय आहे.
एलिझाबेथ अगदी लहान असतानाच शाही कर्तव्यांचं पालन तिनं सुरू केलं. २०११मध्ये वयाच्या नवव्या वर्षी प्रिन्सेस एलिझाबेथ चिल्ड्रेन्स हॉस्पिटलचं उद्घाटन तिनं केलं होतं. शाही सदस्य म्हणून ही तिची पहिलीच भूमिका होती; पण त्यानंतरही आपली अनेक कर्तव्यं ती नेमानं पार पाडते आहे. नौसेनेचं गस्ती जहाज P902 पोलक्सची ती संरक्षक आहे. प्रिन्सेस एलिझाबेथ अंटार्क्टिका रिसर्च स्टेशनलाही तिचं नाव देण्यात आलं आहे.
बेल्जियमच्या शाही परिवाराच्या वेबसाइटच्या माहितीनुसार राजकुमारी एलिझाबेथ डच. फ्रेंच, जर्मनी आणि इंग्रजी भाषेत पारंगत असून, या भाषांवर तिचं प्रभुत्व आहे. याशिवाय स्कीइंग, रोइंग, नौकानयन आणि पर्यटनासारख्या अनेक गोष्टींत तिला रुची आहे. पियानोही ती उत्तम वाजवते. शिक्षणात तर तिला रुची आहेच, पण वाचनाचंही तिला प्रचंड वेड आहे.
समाज आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रतिही ती आपली बांधिलकी मानते. अनेक सामाजिक उपक्रमांत तिचा सहभाग असतो आणि सामान्यांच्या भल्यासाठी ती नेेहेमी काही ना काही करीत असते. त्यामुळेही तिचं नाव कायम चर्चेत असतं. ज्येष्ठ नागरिक, बेघर लोक, ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलेलं आहे अशी मुलं, अपंग.. या सर्वांच्या मदतीसाठी ती कायम पुढे असते. त्यासाठी या विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांशीही तिनं स्वत:ला जोडून घेतलं आहे आणि शक्य त्या प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीसाठी ती सर्वांत पुढे असते.
कोरोना काळातही राजकुमारी एलिझाबेथ एकांतवासात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कायम फोन करून त्यांना प्रोत्साहित करीत असे. त्यामुळे लोकांमध्येही तिच्याविषयी खूप सहानुभूती आणि प्रेम आहे. राजकुमारी एलिझाबेथमुळे हार्वर्ड विद्यापीठाला एक वेगळीच रौनक आली आहे !