वैष्णवीचा गुन्हा काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:38 IST2018-06-18T01:38:01+5:302018-06-18T01:38:01+5:30
वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले.

वैष्णवीचा गुन्हा काय?
मानवी जीवन अत्यंत अस्थिर,अतर्क्य आणि क्षणभंगुर आहे. कुठल्या क्षणी कुणासोबत काय होईल, सांगता येत नाही. केव्हा फासा पलटेल आणि होत्याचे नव्हते होईल याचा नेम नसतो. नागपुरात गेल्या आठवड्यात घडलेल्या भीषण हत्याकांडातील आरोपी विवेक पालटकरची मुलगी वैष्णवी ही अवघ्या नऊ वर्षांची. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी आईचा घात केला तेव्हा ती फक्त पाच वर्षांची होती. वडील जेलमध्ये. आपल्या लहानग्या भावासोबत मामाकडे राहात होती. कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. कारागृहातून बाहेर आलेल्या बापाने मामाच्या संपूर्ण कुटुंबासह तिच्या भावाचाही बळी घेतला आणि वैष्णवी पुन्हा वाऱ्यावर आली. जीवाच्या भीतीपोटी आता कुणीही नातेवाईक तिचा सांभाळ करायला तयार नसल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कदाचित यापुढे तिला अनाथालयात राहावे लागेल. या घटनेत बचावलेली दुसरी मुलगी मितालीचे आईवडील गेलेत. तिची जबाबदारी तिच्या आत्याने घेतली आहे. वर्धेत परवा कौटुंबिक वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले. समाजात अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. त्यासुद्धा बरेचदा त्यांच्या मातापित्यांकडूनच. आत्मघात करताना आपल्या मुलांनाही संपविण्याच्या या प्रकाराने या निष्पाप मुलांचा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेतला जातो, याचेही भान त्यांच्या पालकांना राहात नाही. मोठ्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा लहानांना भोगावी लागतेय. अनेक बालकांना त्यांचा काहीएक गुन्हा नसताना सुधारगृहात, अनाथालयात किंवा कारागृहात जीवन कंठावे लागते. भविष्याच्या कुठल्याही शाश्वतीशिवाय. अखेर ही मुले कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताहेत? काहीही दोष नसताना त्यांच्याच वाट्याला असे आयुष्य का यावे? अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? माध्यमांमध्ये या घटनेसंदर्भात बातम्या येतील तोवर लोक चर्चा करतील. लहान मुलांबद्दल हळहळतीलही. अन् कालांतराने त्यांना या घटनांचा विसर पडेल. पण या मुलांचे काय? त्यांचे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. वैष्णवी असो मिताली वा यांच्यासारखी इतर दुर्दैवी मुले. त्यांचा विचार करीत असताना सहजच मनात संत ज्ञानेश्वरांची आठवण येते. निष्ठूर समाजाने त्यांच्या आईवडिलांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. पण त्यानंतर या दुष्ट समाजाचे समाधान झाले नाही. ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना जगणे अक्षरश: कठीण करून टाकण्यात आले. त्यांना कायम अवमान, अवहेलना आणि उपेक्षा सहन करावी लागली होती. आज तरी परिस्थितीत काय बदल झालाय? वडिलांनी केलेल्या कृत्याची फळे निर्दोष वैष्णवीलाच भोगावी लागतील!