West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:49+5:302021-04-01T04:44:24+5:30

West Bengal Assembly Elections 2021 : आधी राम, नंतर वाम अशी डाव्यांची बंगालमध्ये घोषणा आहे. त्याचा अर्थ असा की, आधी ममताला हरवा; भले यावेळी भाजप का निवडून येईना?

West Bengal Assembly Elections 2021 : In West Bengal, "Aage Ram, Pore Vam?" | West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमध्ये “आगे राम, पोरे वाम?”

googlenewsNext

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली) 

दोन मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. भाजपच्या प्रवासात हा निकाल अनेक अर्थाने नवे पर्व सुरू करील, असे मानले जाते. पक्षाची अखिल भारतीय पोहोच त्यामुळे दिसून येईलच. शिवाय एकंदर राजकारणावर मोदी-शहा यांची भक्कम पकड येणाऱ्या काळात असेल का, हेही सिद्ध होईल. याचा अर्थ असा नव्हे की भाजपच्या योजनेत आसाम, पुदुच्चेरी, केरळ, तामिळनाडू या राज्यांतल्या निवडणुका महत्त्वाच्या नाहीत. मात्र सध्या भाजपचा सगळा जोर  तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातून पश्चिम बंगाल हिसकावून घेण्यावर दिसतो आहे.  आसाम राखायचे, पुदुच्चेरीत एन आर काँग्रेससोबत राहायचे असा भाजपचा मानस दिसतो. केरळात मार्क्सवाद्यांनी सत्ता राखली तरी चालेल पण काहीही करून काँग्रेसला चेपायचे असा भाजपचा इरादा आहे. केरळमधील काँग्रेसजनांना भाजपने सताड दारे उघडून दिलीच होती. डाव्यांशी भाजपचा मूक समझोता झाला असल्याचे  दिल्लीतली माहीतगार सूत्रे सांगतात. त्या मोबदल्यात डाव्यांनी  पश्चिम बंगालमध्ये भाजपला मदत करायची असे ठरले आहे. “आगे राम पोरे वाम” (आधी राम नंतर वाम) अशी डाव्यांची बंगालमध्ये घोषणा आहे, असे म्हणतात. त्याचा अर्थ असा की, आधी ममताला हरवा; भले या वेळी भाजप का निवडून येईना? २०१७ साली भाजप पंजाबात असा खेळ खेळला होता. आपचा पराभव व्हावा म्हणून पक्षाने अमरिंदरसिंग यांना मदत केली. म्हणून तर राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या सापळ्यात कसे अडकले हे गोंधळात टाकणारे आहे. ममतांशी हातमिळवणीचा देकार त्यांनी धुडकावला होता.

ममता अडचणीत 
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी जात्याच लढवय्या आहेत. आजवर त्या पुष्कळ लढल्या, पण २०२१ ची ही लढाई त्यांना जड जाईल असे दिसते आहे. त्या उतरल्या तेंव्हाच रणमैदान खराब होते. १० वर्षांची अँटी इन्कम्बन्सी, अनेक वजनदार नेत्यांनी पक्ष सोडून जाणे, त्यातच पुतण्या अभिषेक बॅनर्जीचा पक्षात उदय, भाजपने हिंदू मते एकवटणे अशा अनेक अडचणी ममतांसमोर उभ्या राहत गेल्या. मुस्लीम मते विभागली जातात किंवा कसे हे २ मे रोजीच कळेल. ओवैसी हा घटक दुर्लक्षून चालणार नाही. बिहारमध्ये राजद - काँग्रेसला ओवैसींनी फटका दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश भेटीत मथुआ मंदिराला भेट दिली. ४० ते ४५ जागांवर या भेटीचा थेट परिणाम होणार आहे. शिवाय सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी यांसारख्या तपाससंस्थांनी प्रत्येक निवडणुकीवर प्रभाव टाकला आहे हे कसे विसरता येईल? आता २ मे पर्यंत वाट पाहायची, हेच खरे! 

बंगालनंतर भाजपचे मोठे लक्ष्य 


पश्चिम बंगाल विधानसभा जिंकल्यास भाजपला २०२२ साली राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळेल. ‘एक देश एक निवडणूक’ हे मोदी यांचे एक स्वप्न आहे. ते प्रत्यक्षात आणणे मग शक्य होईल. भाजपचे राज्यसभेत ९५ खासदार आहेत. २४५ च्या सभागृहात पक्षाला कामापुरते बहुमत आहे. बीजेडी, वाय एस आर काँग्रेस, टीडीपी आणि द्रमुकसारख्या प्रादेशिक पक्षांना या परिस्थितीत काही भूमिका उरत नाही. पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका विरोधी पक्षांसाठी आणि त्यातही काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. तृणमूल काँग्रेस पक्ष जिंकल्यास भाजपविरुद्ध राष्ट्रीय आघाडीचा उदय होऊ शकेल. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीतल्या कामगिरीवर काँग्रेसची भूमिका ठरेल. नेमक्या याच कारणाने नितीशकुमार, शरद पवार यांच्यासारखे नेते या निकालाकडे डोळे लावून सध्या विंगेत थांबलेले आहेत.

पवार मोठ्या पेचात

शरद पवार गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय कारकिर्दीतल्या सर्वांत मोठ्या पेचप्रसंगाला सामोरे जात आहेत. महाराष्ट्रातले सरकार ते रिमोट कंट्रोलने चालवत असले तरी फारसे समाधानी नाहीत. कारण अर्थातच उघड आहे- शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची इच्छा आहे. काँग्रेस पक्षाने केंद्रात विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व पवारांना करू दिले किंवा काँग्रेस वगळून समविचारी विरोधी पक्षांनी ते स्वीकारले तरच हे शक्य होईल. सध्या लोकसभेत खासदार असलेल्या कन्या सुप्रियाला आपली राजकीय वारसदार करण्याची मनीषाही पवार बाळगून आहेत. त्यातून कदाचित त्यांचे पुतणे अजित पवार नाराज होऊ शकतात. अजितदादा गेली काही दशके महाराष्ट्रात पाय रोवून काम करीत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दादांकडे महाराष्ट्राचा नेता म्हणून पाहतात. सुप्रिया सुळे दिल्लीच्या राजकारणात 
जाऊ शकतील. काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडी बरीच कमकुवत झाली असली तरी सोनिया गांधी आघाडीचे नेतेपद सोडायला तयार नाहीत. राहुल गांधीही बाजूला व्हायला तयार नाहीत. भाजपशी हातमिळवणी केल्यास पवारांचे स्वप्न पूर्ण होईल का?- याची खात्री तरी कोण देणार?

Web Title: West Bengal Assembly Elections 2021 : In West Bengal, "Aage Ram, Pore Vam?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.