- प्रशांत दीक्षित -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजता घरातील दिवे नऊ मिनिटे बंद करून पणती, मेणबत्ती वा टॉर्च लावून तसेच शारीरिक अंतर ठेवून सज्जात उभे राहण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात अशा आवाहनाचे फायदे-तोटे काय, याची चर्चा येथे करायची आहे.
संकटाचे निवारण करण्यासाठी देशाला एकत्र उभे करायचे असते, तेव्हा सर्वोच्च पदावरील नेत्याला भावनिक आवाहन करावे लागते. माणूस हा तर्कापेक्षा भावनेवर जास्त जगतो. तर्क मार्ग दाखवितो; पण कृती करण्याची शक्ती ही भावनेत असते. जगाच्या इतिहासात मोठ्या लढायांमध्ये भावनिक आवाहन महत्त्वाचे ठरले आहे. दुसऱ्या महायुद्धात लोकांची इच्छाशक्ती उत्साही ठेवण्यात पंतप्रधान चर्चिल यांची भाषणे उपयोगी ठरली.

नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारचे भाषण हे भावनिक आवाहन करणारे होते. सध्याच्या सामूहिक टाळेबंदीमुळे लोक कंटाळले आहेत, चिडचिडे होत आहेत. अशा वेळी लोकांमधील उत्साह टिकवून धरण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले. लोकप्रिय प्रवचनकाराच्या शैलीतील हे भाषण होते. भाषणातून लोकांना संमोहित करण्याची क्षमता मोदींकडे आहे. लोकांच्या मनात धीर उत्पन्न करण्याचे प्रयत्न त्यांनी या भाषणातून केले. प्रत्येक नेत्याला असे प्रयत्न करावे लागतात.
याचबरोबर देशासाठी काही कार्यक्रम नेत्याला द्यावा लागतो. देशातील प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकेल, असा कार्यक्रम द्यावा लागतो. महात्मा गांधींकडे ही कला होती. चरखा चालवून किंवा खादी वापरून देशाला स्वराज्य मिळणे शक्य नव्हते. महात्मा गांधींनाही याची कल्पना होती; मात्र देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी अशी तंत्रे उपयोगी पडतात, हे त्यांना माहीत होते. ब्रिटिशांविरुद्ध लढण्याइतके शारीरिक व मानसिक धैर्य माझ्यात नसले, तरी खादी वापरून मी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ शकतो, अशी भावना त्यातून निर्माण होत होती. लोकांना जोडण्याचे व त्यांना एकत्र ठेवण्याचे ते मानसिक तंत्र होते. मोदींच्या भाषणाचा सूर तोच होता.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले योगदान काय, असे तुम्हाला वाटेल; म्हणून तुम्ही दिवा लावा. दिव्याच्या प्रकाशात धैर्य उजळू द्या, उत्साह वाढू द्या, असे त्यांचे आवाहन होते. त्यासाठी त्यांनी संस्कृत सुभाषितही सांगितले. मोबाईल टॉर्च चालणार असला तरी मुख्यत: तेलाचा दिवा लावण्याचा त्यांचा आग्रह होता. पणती वा समई याला भारतात निर्माण झालेल्या सर्व धर्मांमध्ये एक नैतिक, सात्त्विक स्थान आहे. तेच स्थान मेणबत्तीला ख्रिश्चन समाजात आहे. देशभरात एकाच वेळी, जास्तीत जास्त लोकांनी एकच कृती केली आणि ती कृती माणसामधील सात्त्विक भाव जागृत करणारी असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर होतो. प्रत्येक धर्मात हे सांगितले आहे व धर्म न मानणारेही एकाच वेळी समूहाने केलेल्या कृतीचे महत्त्व मान्य करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनातील या सकारात्मक बाजू झाल्या. आता त्याच्या मर्यादाही तपासल्या पाहिजेत. भावनिक आवाहन महत्त्वाचे असले, तरी त्याला वास्तवाची आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड नसेल, तर त्या आवाहनातून होणारी कृती ही वास्तवात भरीव होत नाही. विन्स्टन चर्चिल यांच्या आवाहनातून लोकांमध्ये धीर उत्पन्न झाला, त्यांची इच्छाशक्ती बळकट झाली. परंतु, त्या इच्छाशक्तीचे विजयात परिवर्तन होण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आवश्यक होते. अचूक व भेदक मारा करणाऱ्या शस्त्रांच्या स्पर्धेत दोस्तराष्ट्रांनी आघाडी घेतली आणि विजय सुकर झाला. ब्रिटिशांनी लावलेला रडारचा शोध व अमेरिकेचा अणुबॉम्ब ही हुकमी अस्त्रे ठरली. लढाई जिंकण्यासाठी मनोबल लागते, त्याचबरोबर सामग्रीही लागते. व्यूहरचना करण्यासाठी वैज्ञानिक बैठक लागते. मोदींच्या भाषणाला ही बैठक नव्हती.

अमेरिकेतील नेत्यांशी तुलना केली, तर हा फरक स्पष्ट होईल. आंधळेपणे ब्रिटिश-अमेरिकनांचे गुणगान गात स्वदेशातील लोकांना हिणवण्यात काही पत्रपंडित धन्यता मानतात. तो कित्ता गिरविण्याचा उद्देश इथे नाही. कोरोना रोखण्यासाठी भारतातील शासन (यामध्ये राज्येही आली), प्रशासन व लोक जे काम करीत आहेत, ते अत्यंत स्पृहणीय आहे. आपली आर्थिक क्षमता, तंत्रज्ञानातील मागासपणा आणि लोकांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव हे अंगभूत दोष लक्षात घेता, भारतातील टाळेबंदी अभियान हे कौतुकास्पद आहे. परंतु, ते पुरेसे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतातील नेतृत्वात मुख्य उणीव दिसते ती डेटाचा वापर करून जनतेला शिक्षित करण्याची. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो हे रोज पत्रकार परिषद घेतात. ती पाहण्यासारखी असते. पाहण्यासारखी अशासाठी, की ते अनेकदा पॉवर पाईंट प्रेझेन्टेशन करून आकडेवारीसह बोलतात. कोरोना विषाणूचा फैलाव पुढील काळात कसा होणार आहे, संसर्गाचा उच्चांक कधी होईल, त्याचा प्रभाव कधीपासून कमी होईल, संसर्गाचा उच्चांक असेल तेव्हा रुग्णालयांत किती खाटा लागतील, किती व्हेंटिलेटर लागतील, सामूहिक टाळेबंदीचे नियम जनतेने मनापासून पाळले तर किती कमी खाटा लागतील, टाळेबंदीमुळे रुग्णालयांवरील भार किती कमी होईल... अशा सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पत्रकार परिषदेत आकडेवारीसह मिळतात. सरकार कोणकोणत्या तज्ज्ञांची मदत घेत आहे, त्यांचा कोणता विचार स्वीकारला आहे व कोणता नाकारला आहे, याची खुलासेवार उत्तरे दिली जातात. कोरोनाचे निदान करणाºया चाचण्या व त्यावरील औषधे यावर कोणत्या कंपन्या काम करीत आहेत, त्यांचे संशोधन कोणत्या स्तरावर आहे, औषधे मिळण्यास किती वेळ लागेल... अशा सर्व प्रश्नांवर संवाद साधला जातो. बेजबाबदार व्यक्ती अशी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा आहे; पण ते अनेक वेळा पत्रकार परिषद घेतात. एका तासाहून अधिक वेळ ही परिषद चालते. पत्रकार खोचक प्रश्न विचारतात. त्याला तितक्याच खोचक भाषेत ट्रम्प उत्तरे देतात. जे पत्रकार विरोधात आहेत, त्यांना टोमणे मारून हैराण करतात. या पत्रकार परिषदांमधून जनतेला माहिती मिळते. या माहितीचा पाया विज्ञान व गणित, हा असतो. डेटा जनतेसमोर ठेवून त्याचे विश्लेषण केले जाते. त्यावरील टीका ऐकली जाते, त्याचा प्रतिवाद केला जातो.

यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कितीही कटू असली तरी खरी परिस्थिती लोकांसमोर मांडली जाते. कोरोनामुळे एक लाख लोक मृत्युमुखी पडू शकतात, हे सांगण्यास व्हाईट हाऊस कचरत नाही आणि त्यांनी असे सांगितले म्हणून व्हाईट हाऊसला कोणी बेजबाबदार ठरवीत नाही. ही मृत्युसंख्या रोखण्यासाठी तुम्ही काय करीत आहात ते आम्हाला सांगा, असे विचारले जाते. व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट किती कमी आहेत, याचे आकडे दिले जातात. त्यांची संख्या वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रातून काय मदत पाहिजे तेही सांगितले जाते. मदत मिळाली, की जाहीर आभार नावानिशी मानले जातात. डेटाचा व विज्ञानाचा आधार घेऊन जनतेला विश्वासात घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई तेथे लढली जात आहे.

याउलट, पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेसाठी कधीच तयार नसतात. तिरसक प्रश्न त्यांना आवडत नाहीत आणि तिरकस प्रश्नांना तितक्याच तिरकसपणे बेधडक उत्तर देण्याची ट्रम्प यांच्यासारखी मानसिकता त्यांची नाही. त्यांचा संवाद एकतर्फी असतो. मेरे प्यारे देशवासियों असे ते म्हणतात व त्यांना देशाबद्दल प्रेम आहे यात शंकाच नाही; पण हे वाक्य म्हटल्यानंतरचे त्यांचे भाषण एकत्र कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीसारखे आदेश देणारे असते. जुन्या एकत्र कुटुंबातील वडील जसे मुलांशी वा अन्य कुटुंबीयांशी वागत, तो आविर्भाव त्यांच्या भाषणात असतो. पितृसत्ताक संघ परंपरेशी सुसंगत असे हे वागणे आहे; पण त्यामुळे माहितीचा ओघ आटतो. माझ्यावर विश्वास ठेवा, असे म्हणणे जुन्या जमान्यात ठीक होते. हुकूमशाही राजवटीतही ते ठीक असते; पण लोकशाहीत माहितीची देवाणघेवाण करूनच लोकसमूहाला बळकट करायचे असते. आदेश देऊन नव्हे. आरोग्य मंत्रालयाच्या रोजच्या पत्रकार परिषदेतही माहिती देण्यापेक्षा ती लपविण्याकडे वा गोलमाल उत्तरे देऊन टाळण्याकडे कल असतो.

कोरोना संकटाने पंतप्रधान मोदी यांच्यासमोर दोन सुवर्णसंधी आल्या आहेत. जनतेवरील आपल्या प्रभावाचा उत्तम वापर करून देशाला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे ते खेचू शकतात. डेटाचा वापर करून वास्तवाला धरून विचार करण्याची सवय ते जनतेला लावू शकतात. निदान तसा प्रयत्न करू शकतात. विज्ञानाकडे जनतेला आकृष्ट करण्याची उत्तम संधी कोरोनातून मिळालेली आहे. दुसरी सुवर्णसंधी आर्थिक क्षेत्रातील आहे. १९९१मध्ये देश जसा आर्थिक संकटात सापडला होता, तशीच वेळ आता येणार आहे. त्या वेळच्या आर्थिक पेचप्रसंगाचा नरसिंह राव व मनमोहनसिंग यांनी योग्य वापर करून घेतला व धाडसी निर्णय घेऊन देशाला एकदम आर्थिक उंचीवर नेले. मोदी ते करू शकतात, कारण त्यांच्याजवळ संसदेत बहुमत आहे व लोकांवर त्यांची पकड आहे. या दोन्ही गोष्टी नसूनदेखील राव व मनमोहनसिंग यांनी चमत्कार घडवून दाखविला. मात्र, त्यासाठी मोदींना स्वत:च्या विचारव्यूहातून बाहेर यावे लागेल.
                                                                                       (लेखक 'लोकमत ' च्या पुणे आवृत्तीचे संपादक आहेत.)

 

Web Title: We want a data culture with the culture of lamps....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.